२२ जून २०२५ : द्रास येथे ‘सरहद’ आणि भारतीय लष्कर आयोजित ‘शौर्यथॉन’चे उद्घाटन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. यावेळी येथील उपजिल्हाधिकारी रुग्णालयाला एका सिटी स्कॅन मशिन आणि रुग्णवाहिकेची गरज असल्याचे स्थानिकांनी एकनाथ शिंदे यांना सांगितले. ती मागणी पूर्ण करण्याचा शब्द एकनाथ शिंदे यांनी दिला होता.
२२ जून २०२६ : सिटीस्कॅन मशिन आणि रुग्णवाहीका द्रास येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल झालेली पाहून स्थानिकांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. त्या निमित्ताने महाराष्ट्र-काश्मीर-शिवसेना असे बंध अधिकच दृढ झाले. एकनाथ शिंदे प्रकृती अस्वस्थ्यामुळे त्या कार्यक्रमाला जाऊ शकले नाही. पण, त्यांनी दिलेला शब्द पूर्ण करण्याची संधी मला आणि माझे सहकारी या राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांना लाभली.
संजय नहार यांची ‘सरहद’ संस्था आणि भारतीय लष्कर यांच्या संयुक्त विद्यमाने लडाख येथे दरवर्षी ‘शौर्यथॉन’ हा उपक्रम राबवून साहसातून पर्यटनाला चालना दिली जाते. भारतीय नागरिकांना आपल्याच जवानांच्या शौर्याची जाणीव राहावी आणि त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करता यावी, या हेतूने हा पुढाकार घेतला जातो. या उपक्रमाच्या पाठीशी एकनाथ शिंदे ठामपणे उभे राहिले. यंदा या मॅरेथॉन स्पर्धेच्या उद्घाटनाला उपस्थित राहण्याचे भाग्य मला लाभले. या निमित्ताने लष्करातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याचा योग आला. त्यांनी आपले अनेक अनुभव सांगितले. जवानांच्या देशभक्तीची मन हेलावणारी अनेक उदाहरणे सांगितली. धारातीर्थी पडलेल्या जवानांची आपल्या कुटुंबियांना लिहिलेली अत्यंत भावनिक पत्रे ‘वॉर मेमोरियल’मध्ये वाचली. आपल्या जवानांच्या अतुलनीय शौर्याच्या, त्यांच्या बलिदानाच्या घटना प्रत्यक्ष ऐकल्या. खरोखरच अत्यंत अभिमानाचा आणि राष्ट्रप्रेम अधिक वृद्धिंगत करणारा तो दिवस होता.
काश्मीर म्हणजे बॉम्बस्फोट, गोळीबार, दहशत आणि भीतीची छाया असे काही मंडळींपुढे येणारे एक चित्र आणि भारताचे नंदनवन, निसर्गाचा वरदहस्त लाभलेला पृथ्वीवरील स्वर्ग, असे वर्णन करणारी दुसरी बाजू. या दोन्ही बाजू अनुभवत, सोसत ‘काश्मिरियत’ जपणारे, संवादासाठी आसुसलेले आणि आपल्या भूभागावर जीवापाड प्रेम करणारे येथील नागरिक ही काश्मीरची मुख्य ओळख आहे. मात्र कायमच दहशतीच्या चेहऱ्याने नकारात्मकता वाट्याला आलेल्या या नागरिकांना आता देशवासींकडून संवाद आणि आपुलकीचीच अपेक्षा आहे. आणि हाच संवादसेतू भक्कम करण्याचे काम वंदनीय शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासूनचा शिवसेना करत आली आहे.
सन १९९०च्या दशकात काश्मिरी पंडितांवर होणारा अन्याय, अत्याचार आणि रक्तरंजित घटनांच्या दाहकतेवर बाळासाहेबांनी आधाराची फुंकर घातली होती. विस्थापित काश्मिरी पंडितांना महाराष्ट्रात आश्रय दिला. त्यांच्या मुलांसाठी महाराष्ट्रातील वैद्यकीय आणि अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये ५ टक्के जागा आरक्षित करण्याचा निर्णय बाळासाहेबांनी घेतला. काश्मीर धुमसत असताना काही दहशतवाद्यांनी अमरनाथ यात्रा रोखण्याची धमकी दिली होती. तेव्हाही काश्मिरी पंडितांवर अन्याय झाल्यास मुंबईतून जाणारी हज यात्रा रोखण्याचा इशारा बाळासाहेबांनी दिला होता. काश्मिरी जनतेच्या पाठीशी ठाम उभे राहत त्यांना विश्वास देण्याचा, आपुलकीचा हा बाळासाहेबांचा वैचारिक वारसा एकनाथ शिंदे यांनी केवळ जपला नसून तो आणखी दृढ केला आहे.
भारत-पाकिस्तान सीमेवर तैनात जवानांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गेल्या वर्षी शिवसेनेच्या वतीने थेट लष्करी तळावर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तब्बल एक हजार शिवसैनिकांनी रक्तदान करून आपल्या जवानांशी खऱ्या अर्थाने एक रक्ताचे नाते निर्माण केले. ‘आम्ही पुणेकर’ संस्था आणि ४१ राष्ट्रीय रायफल मराठा बटालियन यांच्या माध्यमातून कुपवाडा येथील लष्कराच्या कॅम्पमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा स्थापित करण्यात आला आणि त्याचे अनावरण एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले होते. कारगिल ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वांत उंचावरील आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीती युद्धभूमी आहे. १९९९ मध्ये ‘ऑपरेशन विजय’ राबवून याच कारगिलच्या भूमीवर भारताने पाकिस्तानला धडा शिकवला होता. त्या ऐतिहासिक विजयाची आठवण आणि वीर सैनिकांच्या शौर्याची स्मृती म्हणून कारगिल युद्ध स्मारक येथे ‘लाइट अँड साऊंड शो’ तयार करण्यासाठी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना महाराष्ट्र सरकारने ती कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. लवकरच त्याच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होत आहे.
काश्मीर खोऱ्यात जेव्हा जेव्हा संकट आले, तेव्हा शिवसेना तेथे धावून गेली आहे. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या वेळी काश्मीरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांच्या मदतीसाठी एकनाथ शिंदे स्वतः तेथे गेले होते आणि विशेष विमानांची व्यवस्था करून शेकडो पर्यटकांना सुरक्षित आणले होते. याच हल्ल्यात पर्यटकांचा जीव वाचवताना स्वतःचे प्राण वेचणारे स्थानिक घोडेस्वार सय्यद आदिल हुसेन शाह यांच्या कुटुंबाला शिवसेनेने तात्काळ पाच लाख रुपयांची आर्थिक मदत केली. तसेच, अत्यंत हलाखीची परिस्थिती असलेल्या या कुटुंबाला नवे घरही बांधून दिले. काश्मीरच्या ऐतिहासिक लाल चौकातील गणेशोत्सवालाही एकनाथ शिंदे यांचे पाठबळ आहे. तिथे दोन्ही धर्मांचे नागरिक एकत्र येतात. संस्कृतीच्या धाग्याने बांधलेली ‘काश्मिरियत’ आणि ‘भारतीयत्व’ हेच तर आहे.
काश्मीरमध्ये जाणाऱ्या पर्यटकांमध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांची संख्या सर्वाधिक आहे. या पर्यटकांना हक्काचा आश्रय व मदत मिळावी, यासाठी श्रीनगर आणि लडाखमध्ये ‘महाराष्ट्र भवन’ उभारण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्य सरकारने श्रीनगर विमानतळाजवळ, बडगाम जिल्ह्यातील इचगाम येथे २.५ एकर जागा खरेदी केली असून, काश्मीर खोऱ्यात स्वतःचे राज्यभवन असणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरेल. काश्मीर असो किंवा लडाख असो, तिथे शिवसेनेला कुठलेही राजकारण करायचे नाही. परंतु, एकनाथ शिंदे यांनी राजकीय हितसंबंधांच्या पलीकडे जाऊन ‘हिमालयाच्या मदतीला धावून जाणारा सह्याद्री’ ही ओळख पुन्हा एकदा आपल्या कृतीतून सिद्ध केली आहे. आजवर दहशतीच्या सावटात जगणाऱ्या येथील नागरिकांनी २०१९मध्ये मोकळा श्वास अनुभवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू-काश्मीरचे ३७०वे कलम हटवल्यानंतर येथील परिस्थिती हळूहळू बदलू लागली. शस्त्रांची जागा संवादाने घेतली. चकमकींऐवजी शांततेचा आवाज मोठा होऊ लागला. ‘ऑपरेशन सिंदूर’सारख्या मोहिमेतून पाकिस्तानच्या नांग्या ठेचल्या जात आहेत. या सर्व प्रयत्नांना शिवसेनेने सदैव पाठिंबाच दिला आहे.
एकेकाळी सतत सीमेपलीकडील दहशतवाद्यांच्या हल्ल्याच्या दडपणाखाली असलेले काश्मीर आणि लडाख आता नव्याने उभे राहत असताना देशवासी म्हणून त्यांना साथ देणे ही आपली जबाबदारी आहे. काश्मीर हा फक्त भूभाग नाही, तर आपल्या देशाचा अभिमान आहे. त्यामुळे काश्मीर आर्थिक घडी बसविण्याच्या प्रयत्नात असताना अन्य राज्यांनी आपला मदतीचा हात पुढे करणे गरजेचे आहे. एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांच्या विचारांतून प्रेरणा घेत विश्वासाचा, संवादाचा, आपुलकीचा सेतू उभारला आहे. त्यांच्या प्रत्येक कृतीतून आता महाराष्ट्र-काश्मीर-शिवसेना हे बंध अधिक दृढ होत जातील, हा विश्वास आहे.
(लेखक शिवसेनेचे खासदार आहेत.)

