Headlines

Shiv Sena Turns 60: बदलती संस्कृती अन् कौशल्य – both factions of shiv sena celebrated the party 60th anniversary


शिवसेनेचा साठावा वर्धापन दिन दोन्ही शिवसेनांनी सालाबादाप्रमाणे साजरा केला. यात उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्यावर सहा खासदारांच्या फुटीचे सावट होते. उद्धव या फुटीवरून निर्वाणीचे बोलले. ‘माझ्यावर तुमचा विश्वास नसेल शिवसेना पक्षप्रमुखपद मी सोडतो. एखाद्या नव्या दमाच्या सामान्य शिवसैनिकाकडे हे पद द्या,’ असे आवाहनही त्यांनी केले.

शिवसैनिक हा भावनिक असतो. नेत्याच्या आदेशावर जीव ओवाळून टाकणारा असतो. अशा तरुणांचेच संघटन बाळासाहेब ठाकरे यांनी साठ वर्षांपूर्वी उभे केले. त्यामुळे बाळासाहेबांच्या हयातीत छगन भुजबळ, गणेश नाईक, राज ठाकरे, नारायण राणे आदी नेत्यांची बंडखोरी झाली तरी त्या घटना सरळपणे झाल्या नव्हत्या. शिवसैनिकांचा रोष त्यांना सहन करावा लागला होता. आता ती परिस्थिती नाही.

षण्मुखानंद सभागृहात उद्धव यांनी उपस्थितांना भावनिक आवाहन केले. केंद्रातील सत्तेच्या जीवावर फोडाफोडीचे जे राजकारण सुरू आहे, त्याच्यासमोर उभे राहावे लागेल, ऑपरेशन कमळ राबवावे लागेल, असा जोश उपस्थितांमध्ये भरू पाहिला; मात्र त्याचा परिणाम किती होईल हा मोठाच प्रश्न आहे. त्याच वेळी गोरेगावच्या नेस्को येथे एकनाथ शिंदे त्यांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला थेट आव्हान देत होते. ‘वाघ एकटा येतो, कुत्री भुंकतात’ वगैरे ते उबाठाला डिवचत होते. सहा खासदारांच्या फुटीबाबत शिंदे यांनी मेळाव्यात थेट काहीही बोलणे टाळले. मात्र, ‘ये तो ट्रेलर है पिक्चर अभी बाकी है’ असे म्हणत शिवसेना (उबाठा) पक्षात केवळ उभी नाही; तर सगळ्याच बाजूंनी जोरदार फूट घडवणार, असा शिवसेना संस्कृतीतला आवाज त्यांनी उद्धव यांना दिला आहे.

सिनेमात राजेश खन्नाचा काळ जाऊन अमिताभ बच्चन हीरो होण्याच्या काळात शिवसेनेला बहर आला. कामगारांच्या वस्त्यांमध्ये बेकार तरुणांचे लोंढेही वाढू लागले. छोट्या मोठ्या कारणांवरून होणाऱ्या मारामाऱ्या हे मुंबईच्या लालबाग, परळ, घोडपदेव वगैरे विभागाचे वैशिष्ट्य. मारामारी सुरू होण्यापूर्वी तरुणांचा घोळका दुसऱ्या घोळक्यासमोर जाऊन ‘आव्वाज’ असे ओरडून आव्हान देत असे.

बाळासाहेबांना इथल्या ‘लुम्पेन प्रॉलितरिएत’ची भाषा चांगली अवगत होती. त्याचीच त्यांनी घोषणा केली. अमिताभ स्टाईल ‘तिथल्या तिथे न्याय’ हे सेनेचे सूत्र होते. त्यामुळे शिवसेना तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाली. बाळासाहेब हे एकमेव नेते व त्यांचा आदेश म्हणजे अंतिम. त्या आदेशाबाबत विवेकाने विचार वगैरे अशक्य. शिवसेनेच्या जन्मापासून उद्धव ठाकरे हे त्याचे साक्षीदार असले तरी त्यांची सांस्कृतिक जडणघडण सामान्य शिवसैनिकाप्रमाणे झालेली नाही, हे लक्षात घ्यावे लागेल.

नव्या आर्थिक धोरणामुळे अर्थकारणाबरोबरच समाजाची सांस्कृतिक वीण पूर्णपणे बदलून गेली. राजकारणात पैशाचे महत्त्व अतोनात वाढले. आता केवळ नेतेच नाही तर कार्यकर्तेही व्यावसायिक विचार करू लागले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या यशाचे मोजमाप करताना या बाबीही लक्षात घ्याव्या लागतील. जनतेचे प्रश्न सोडवणे म्हणजे बहुतांश वेळा रोख रक्कम देऊन जनतेला नमस्कार करणे हे सोपे उत्तर काळानुरूप लोकप्रतिनिधींनी शोधले आहे. पैशांची सोय करण्याच्या विवंचनेत लोकप्रतिनिधी कायम असतात.

दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे राजीव गांधी यांनी १९८५ साली जो पक्षांतर बंदी कायदा आणला त्याबाबत ज्येष्ठ समाजवादी नेते व विचारवंत मधू लिमये यांचा जो आक्षेप होता, त्यातही या फुटीचे कारण लपलेले आहे. या कायद्यानंतर संसद वा विधिमंडळातील प्रतिनिधी वैयक्तिक विवेकाला जागू शकणार नाहीत, ते पक्षप्रमुखाने नेमलेल्या व्हिपचे गुलाम होतील व त्यांची वैधता पूर्णपणे अध्यक्षाच्या हातात जाईल, हे लिमयेंचे म्हणणे तंतोतंत खरे ठरले. पक्षांतर्गत लोकशाहीचा ऱ्हास व पैसा हेच लोकांचे प्रश्न सोडवण्याचे माध्यम झाल्याने संसदीय पक्षातील दोन तृतीयांश सदस्य फुटण्याचा अडथळाही सहज पार होऊ लागला. त्यात न्यायालयानेही संघटनेतील फुटीपेक्षा संसदीय पक्षातील फूटच ग्राह्य मानल्याने छोट्या पक्षांची मोठीच पंचाईत झालेली आहे. एकूणात शिवसेना उबाठाचे खासदार फुटल्याने माध्यमांमधील चर्चांपलीकडे राजकीय पाण्यावर तरंग उमटण्याची शक्यता कमीच. आवाज देण्याची क्षमता दोन्ही बाजूंनी गमावल्यासारखीच आहे. घाऊक संख्येने फोडण्याची व फुटून निघण्याची क्षमता हे मात्र लोकप्रतिनिधींनी आत्मसात केलेले नवे कौशल्य आहे, हे मात्र मान्य करावेच लागेल.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत