Headlines

Shafaat Khan: हरवलेल्या चावीची गोष्ट – shafaat khan special article on the story of lost key


-शफाअत खान

हल्ली खरं खोटं असं काही वेगळं नसतं असं म्हणतात. हे आता खरं वाटू लागलं आहे. खऱ्या खोट्यात भेद करता येत नाही. त्याची आता गरजही उरलेली नाही. खोटं खऱ्यापेक्षा जास्त खरं वाटू लागलं आहे. खरा आनंद खोट्यातूनच मिळतो, हे आता सगळ्यांनाच पटू लागलं आहे.

काही दिवसांपूर्वीची गोष्ट. रात्री उशिरा घरी परतलो. बंद दारासमोर उभा राहिलो. खिशात हात घातला. चाचपडून बघितलं. पण चावी सापडेना. अंगावर बरेच खिसे होते. काही चोर खिसे होते. काही सज्जन खिसे होते. सगळे खिसे तपासले. पण चावी काही सापडली नाही.

शेजारी-पाजारी झोपलेले होते. ते सहसा झोपलेलेच असतात. त्यांना सतत झोपेचीच स्वप्नं पडतात. त्यांना झोपेतून उठवणं, शेजारधर्माला धरून होणार नाही म्हणून मी त्यांची बेल वाजवली नाही. खाली बिल्डिंगचा वॉचमन शांत झोपला होता. तो स्वप्नात स्वतःच्या गावी पोहोचला होता. मी प्रेमाने हाका मारल्या. अडचणीत अडकलेल्या माणसाला प्रेमानेच वागावं लागतं. त्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. मी त्याला प्रेमाने हलवलं. गोंजारून बघितलं. पण तो आपल्या घरी मुलाबाळात रमला होता. त्याला प्रेमाने पुन्हा गावातून मुंबईत आणणं अवघड होतं. मी प्रेम बाजूला सारून आवाज चढवला.

आपल्या तमाशात एक बरी सोय असते. चलाख सोंगाड्या स्टेजवर दोन-चार चकरा मारतो आणि क्षणार्धात पृथ्वीवरून स्वर्गात पोहोचतो. माझ्या आवाजाने तो दचकून उठला. तिथल्या तिथे गोल गोल फिरला आणि पटकन स्वतःचं गाव, घर सोडून मुंबईत पोहोचला. मी चावी हरवल्याचं त्याच्या कानावर घातलं. पण त्याला कळेना. झोपेमुळे मलाही नीट समजावून सांगता येईना. बऱ्याच प्रयत्नानंतर तो मुंबईत स्थिरावला. त्याला इथलं, तिथलं कळू लागलं. स्थानिक माणसाची चावी हरवल्यामुळे घर असूनही त्याला स्वतःच्या घरात शिरता येत नाही, ही समस्या त्याच्या लक्षात आली. तो बोलू लागला. तो झोपेत तर बोलत नसेल ना, असा संशय आला. पण हल्ली सगळेच झोपेत बोलतात. झोपेतच मार्गदर्शन करतात. त्यांच्या बरळण्यातूनच समाजाला बळ मिळतं. समाज प्रगतीच्या दिशेने वाटचाल करतो. वॉचमनने बराच विचार करून योग्य मार्गदर्शन केलं.

दरवाजा उचकटायचा झाला तर सुतार उजवीकडे राहतो आणि दरवाजा उघडायचा झाला तर चावीवाला डावीकडे रात्रभर बसलेला असतो अशी माहिती मिळाली. मी डाव्या चावीवाल्याकडे जायचा निर्णय घेतला. डावीकडे बरीच शोधाशोध केली पण चावीवाला दिसला नाही. चावीवाला मुंबईत बसतो की वॉचमनच्या गावी डावीकडे बसतो, हे आपण आधीच विचारायला हवं होतं असं मनात येऊन गेलं. सगळी गल्ली उलथीपालथी केल्यावर एक टपरी दिसली. टपरीच्या बाहेरच्या फळीवर एकजण झोपलेला दिसला. चेहऱ्यावरून तो सुतार की चावीवाला हे पटकन ओळखता आलं नाही. पण त्याचा चेहरा जुन्या मोठ्या कुलूपासारखा दिसतो म्हणजे तो चावीवालाच असेल असा निर्णय घेऊन त्याला उठवला. तो दचकून उठला. तो खरोखरचा डुप्लिकेट चावी बनवणारा चावीवाला निघाला. शिवाय तो वॉचमनच्या गावचाच असल्याचं कळलं. हा आनंद वेगळा.

आम्ही दोघंही गोल गोल फिरून गावाकडचं बोलत घरी पोहोचलो. वॉचमन शांत झोपलेला होता. तो पुन्हा आपल्या गावी पोहोचला होता. चावीवाल्याने दरवाज्याला तपासलं. पिशवीतली एक जुनी चावी काढून, घुसून पुसून कुलपात घुसवली आणि पटकन दरवाजा उघडला. मीदेखील एक-दोनदा स्वतःच्या हाताने उघडून बघितला. दरवाजा पटकन, सहज उघडला. हरवलेल्या खऱ्या चावीपेक्षा ही चावी जास्त बरी वाटली. हल्ली डुप्लिकेट गोष्टीच जास्त बऱ्या असतात. खऱ्यापेक्षा खोटंच जास्त बरं असतं आणि खरंही असतं हे आता पटू लागलं आहे.

खरं म्हणजे खऱ्या खोट्याचा गोंधळ इथे संपायला हवा. पण चावीची गोष्ट इथे थांबत नाही.
मी सकाळी उठल्यावर रात्रीचा गोंधळ सांगण्यासाठी स्वामींना फोन केला. स्वामींना हे सगळं आधीच आंतरज्ञानाने कळल्याचं त्यांनी सांगितलं. स्वामी कोण- असा प्रश्न तुम्हाला पडू शकेल. स्वामी माझ्या वर्गात होते. घरच्यांची इच्छा म्हणून ते डॉक्टर होणार होते. पण त्यांनी सुमारे सातवीतच शाळा सोडली आणि ते सत्याचा शोध घेण्यासाठी अध्यात्माकडे वळले. आता त्यांनी मोठा दरबार थाटला आहे. दरबारात गर्दी असते. ते स्पर्शाने रोग बरा करतात असं म्हणतात. शेवटी त्यांनी आपल्या आईवडिलांची इच्छा पूर्ण केली हे महत्त्वाचं.

स्वामी माझ्या चावी प्रकरणावर बोलताना म्हणाले, ‘तू उगाच वणवण केलीस. मी मंत्र देतो. हा मंत्र डोळे बंद करून, गोल गोल फिरत तीनदा म्हणायचा. दरवाजा उघडेल.’ पूर्वी गडाचे दरवाजे उघडताना हा मंत्रच वापरत असं म्हटल्यावर माझा पटकन विश्वास बसला. मी मंत्राची खात्री करून घेण्यासाठी बाहेरून दरवाजा बंद केला. मंत्र म्हणत गोल गोल फिरलो. डोळे बंद असल्यामुळे दोनदा शेजाऱ्यांच्या दारावर आपटलो. नाकाला मार बसला. पण दरवाजा काही उघडला नाही. चावी आतच राहिली होती. निराश वाटू लागलं. खऱ्या खोट्याचा गोंधळ उडाला. मनात भले बुरे विचार येऊ लागले.

‘आता दिवस बदलले आहेत. खरी चावी हरवली आहे. डुप्लिकेट चावीशिवाय नशिबाचे दरवाजे उघडत नाहीत, अशी स्थिती झाली आहे.’ असा एक मोठा विचार मनात चमकून गेला. याला सत्याचा साक्षात्कार असं म्हणता येईल का- स्वामींना फोन करून विचारायला हवं. असो!

सत्य-असत्य, खरं-खोटं हे अवघड विषय आहेत. पण एका जुन्या गोष्टीतून हा गुंता उलगडून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. ती गोष्ट थोडक्यात अशी –
फार पूर्वी कुणीतरी एक राजा होऊन गेला. त्याच्या डोक्यात काहीतरी बिघाड झाल्यामुळे तो अजिबात खोटं खपवून घेत नसे. आता या गोष्टीवर विश्वास बसणार नाही. पण हा जुन्या गोष्टीतला राजा आहे, हे लक्षात ठेवूनच ही गोष्ट वाचावी लागेल.
तर राजा सत्याच्या नादी लागला. राजाने फतवा काढला. ‘जो खोटं बोलेल त्याला फासावर लटकवलं जाईल’, अशी दवंडी पिटली. सीमेवर रक्षक नेमले. ते राज्यात प्रवेश करणाऱ्यांची मुलाखत घेऊ लागले. कुणी खोटं बोलतो आहे असा संशय येताच त्याला फासावर लटकवू लागले. लोक खरं बोलू लागले. खऱ्याचा त्रास होऊ लागला. प्रजा खऱ्याला विटली. पण काही मार्ग सापडेना.
एकदा असाच कुणी एक गोष्टी सांगणारा राज्याच्या प्रवेशद्वाराशी आला. रक्षकांनी त्याला अडवला. चौकशी सुरू झाली. ‘कुठे जातो’ असं खडसावून विचारताच तो म्हणाला, ‘मी फासावर लटकायला चाललो आहे.’ या उत्तराने रक्षक गडबडले. म्हणाले, ‘हे खोटं आहे.’ गोष्टी सांगणारा म्हणाला, ‘हे जर खोटं असेल तर तुम्ही तुमच्या नियमाप्रमाणे मला फासावर लटकवा…’ रक्षक गोंधळले. तो फासावर चढायची घाई करू लागला. रक्षक म्हणाले, ‘हे तू खोटं बोलतो आहेस हे आम्हाला कळतंय. पण आम्ही तुला फासावर चढवला तर तू खरं बोलत होतास, असं होईल. खरं बोलणाऱ्या भल्या माणसाला आम्ही फासावर चढवला म्हणून आम्हाला फाशी होईल.

आता खोटाच जास्त खरा वाटू लागला आहे. राजाच ‘मला फासावर लटकवा’ असं म्हणू लागला आहे. गोंधळ उडतो. आता आपण खऱ्या खोट्याच्या नादी लागू नये एवढं मात्र खरं! असं म्हणता येईल.

मध्यंतरी आपले पंतप्रधान ट्रम्प साहेबांशी बोलताना मांडीवर कॉपी घेऊन बसलेले दिसले. ते कॉपी बघून हिंदीतून बोलत होते. हास्य-विनोद करत होते.
पूर्वीदेखील लोक चोरून मारून कॉप्या करत. परीक्षेत कॉप्या करताना घाबरायला होई. अपराधी वाटे. आता कॉपीला राजमान्यता मिळाली आहे. प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे.
परवा राहुल नार्वेकर नावाचे एक मराठी राजकारणी मराठी भाषणाची कॉपी घेऊन मैदानात उतरले होते. पण दगाफटका झाला. मराठी अक्षरं त्यांच्यावर उलटली. जोडाक्षरांनी घात केला. पूर्णविराम, स्वल्पविरामाने जागा बदलून हल्ला चढवला. कॉपीने त्यांचा बळी घेतला.
आता सर्वत्र स्वस्त झेरॉक्स कॉप्यांच्या टपऱ्या उगवलेल्या दिसतात. पण कॉपी उलटते, घात करते हे आपण लक्षात ठेवायला हवं.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत