Headlines

School Student Dies: डेअरीजवळ खेळणाऱ्या विद्यार्थ्याचा करुण अंत; वास्तुनुसार उभारलेला चौथा खांब जीवावर बेतला


डेअरीच्या इमारती जवळ खेळताना शाळकरी मुलाचा करुण शेवट झाला. वास्तुच्या हिशोबानं उभारण्यात आलेला इमारतीचा चौथा खांब त्याच्या निधनाचं कारण ठरला.

boy dies in dairy
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
बंगळुरू: इमारतीचा पिलर कोसळून एका शाळकरी विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. धनुष असं या मुलाचं नाव आहे. तो सरकारी शाळेचा विद्यार्थी होता. ही घटना कर्नाटकच्या तुमकुरु जिल्ह्यातील चिक्कनायक तालुक्यात ही घटना घडली.

धनुष नंदिनी डेअरीच्या इमारतीजवळ खेळत होता. त्याच वेळी इमारतीचा पिलर अचानक त्याच्या डोक्यावर पडला. धनुषला गंभीर इजा झाली. त्याचा जागीच शेवट झाला. धनुषच्या आकस्मिक मृत्यूनं त्याच्या कुटुंबाला जबर धक्का बसला.

नंदिनी डेअरीच्या इमारतीत घडलेली घटना अतिशय दुर्दैवी असल्याचं तुमकुरू मिल्क युनियनचे व्यवस्थापकीय संचालक थिम्मा नायक यांनी म्हटलं. ही इमारत जवळपास सात ते आठ वर्षांपूर्वी बांधण्यात आली होती. इमारतीची उभारणी वास्तुनुसार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

थिम्मा नायक यांनी दिलेल्या माहितीनुसार, इमारतीत चार पिलर असायला हवे होते. पण स्टील रिइन्फोर्समेंट केवळ तीन पिलर्सला देण्यात आलं होतं. चौथ्या पिलरला मजबुतीसाठी कोणताच आधार नव्हता. अशा प्रकारचं बांधकाम अवैध आणि अस्वीकार्य आहे. असोसिएशननं यामध्ये लक्ष घालायला हवं होतं. पण बहुधा त्यांना याची कल्पना नसावी.

घडलेली घटना अतिशय दुर्दैवी असल्याच्या भावना व्यवस्थापकीय संचालकांनी व्यक्त केल्या. या दुर्घटनेबद्दल त्यांनी शोक व्यक्त केला. ‘मुलाच्या मृत्यूला नेमकं कोण जबाबदार आहे, याचा निर्णय व्यवस्थापकीय समिती आणि सोसायटी घेईल. या प्रकरणाची योग्य चौकशी व्हायला हवी. कंत्राटदार कोण होता, त्यानं इमारत कशी बांधली, अपघात कसा घडला, याचा शोध घेतला जाईल. २१ तारखेला व्यवस्थापकीय समितीची बैठक होणार आहे. त्यात या मुद्द्यावर चर्चा होईल. त्यानंतर पुढील कारवाईचा निर्णय घेतला जाईल,’ असं व्यवस्थापकीय संचालकांनी सांगितलं.

धनुषच्या अकाली मृत्यूनं त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. नातेवाईक, शेजाऱ्यापाजऱ्यांवर शोककळा पसरली आहे. धनुषच्या मृत्यूस जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई व्हावी. या प्रकरणातील दोषींना लवकरात लवकर अटक व्हावी, अशी आग्रही मागणी धनुषच्या कुटुंबियांनी केली आहे.