Sachin Ahir: ठाकरेसेनेचे आमदार सचिन अहिर यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. अहिर यांना आपल्याकडे घेत शिंदेंनी आमदार आदित्य ठाकरेंभोवती चक्रव्यूह रचला आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई: विधान परिषदेच्या उपसभापतीच्या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून सचिन अहिर यांनी अर्ज भरला आहे. कालपर्यंत शिवसेना उबाठाचे उपनेते आणि विधान परिषदेचे आमदार असलेल्या सचिन अहिर यांनी ठाकरेंना धक्का दिला आहे. अहिर यांचा पक्षप्रवेश घडवून आणत उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी आमदार आणि माजी मंत्री आदित्य ठाकरेंना पाडण्यासाठी फिल्डींग लावली आहे.
गेल्याच आठवड्यात एकनाथ शिंदेंनी ऑपरेशन टायगर राबवत ठाकरेसेनेचे लोकसभेतील ९ पैकी ६ खासदार गळाला लावले. पक्षांतरबंदी कायद्याला बगल देण्यासाठी शिंदेंनी आकड्यांचं गणित जमवलं. पण सचिन अहिर यांना आपल्याकडे खेचून घेताना शिंदेंनी पक्षांतरबंदी कायद्यातील पळवाट शोधून काढली. सध्याच्या घडीला विधान परिषदेत ठाकरेसेनेचे ६ आमदार आहेत. पैकी सचिन अहिर यांनी पक्षाची साथ सोडली आहे. Sachin Ahir: सचिन अहिरांचं नाव घेताना शिंदे चुकले, सगळेच हसले; ठाकरेंना धक्का, 30 जूनचा योगायोगही सांगितला पक्षांतरबंदी कायदा काय सांगतो? वरिष्ठ वकील असिम सरोदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्षांतर बंदी कायद्यात दहाव्या परिशिष्टाच्या परिच्छेद ५ नुसार पक्षांतर बंदी कायद्यातून लोकसभा अध्यक्ष – उपाध्यक्ष, राज्यसभा उपसभापती, राज्याच्या विधान परिषदेच्या सभापती – उपसभापती आणि विधान सभेच्या अध्यक्ष – उपाध्यक्ष या पदांवर नियुक्त झालेल्या व्यक्तींना सूट देण्यात आली आहे. त्यामुळे सचिन अहिर एकटे आमदार पक्ष सोडून गेले तरीही पक्षांतर बंदी कायद्याच्या परिच्छेद ५ नुसार अहिर यांना अपात्रतेपासून संरक्षण आहे.
वरळीत समीकरणं बदलणार २०१९ मध्ये आदित्य ठाकरे यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. त्या निवडणुकीपूर्वी म्हणजेच जून २०१९ मध्ये सचिन अहिर यांनी राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केला. सचिन अहिर १९९९, २००४ आणि २००९ मध्ये वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडून गेले होते. २०१४ मध्ये त्यांचा शिवसेनेच्या सुनील शिंदेंनी पराभव केला. २०१९ मध्येही शिंदे यांनाच उमेदवारी निश्चित मानली जात होती. पण आदित्य ठाकरेंनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला. त्यांनी वरळीतून लढण्याचं ठरवलं. त्यांच्यासाठी शिंदे यांनी माघार घेतली. त्याच्या बदल्यात शिंदे यांना विधान परिषदेवर संधी देण्यात आली.
सचिन अहिरांचा पक्षांतराचा इतिहास आदित्य ठाकरे यांचा विजय सोपा व्हावा यासाठी सचिन अहिर यांना राष्ट्रवादीतून शिवसेनेत आणलं गेलं. त्या बदल्यात त्यांना २०२२ मध्ये विधान परिषदेवर संधी दिली गेली. त्यांचा कार्यकाळ २०२८ पर्यंत असेल. तो संपण्याआधीच त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. आता सचिन अहिर यांना आपल्याकडे घेत शिंदेंनी आदित्य ठाकरेंच्या वरळीच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला आहे. वरळीत शिंदेंना मजबूत चेहरा मिळाल्यानं २०२९ मध्ये या मतदारसंघातील लढत आदित्य यांच्यासाठी सोपी नसेल. Sachin Ahir : अरुण गवळींचा भाचा, मुंबईत सर्वात मोठी दहीहंडी उत्सवासाठी ओळखलं जाणारं नाव; ठाकरेंना धक्का देणारे सचिन अहिर कोण आहेत? आदित्य ठाकरेंसाठी अवघड पेपर २०२४ मध्ये आदित्य ठाकरेंना शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार मिलिंद देवरा यांनी कडवं आव्हान दिलं. २०१९ मध्ये ६७ हजारांनी निवडून आलेले आदित्य ठाकरेंचं मताधिक्क्य २०२४ मध्ये जेमतेम ९ हजारांवर आलं. सुनील शिंदे, सचिन अहिर असे विधानसभेचे माजी आणि विधान परिषदेचे विद्यमान आमदार दिमतीला असताना वरळीत आदित्य ठाकरेंची दमछाक झाली. यातील सचिन अहिर आता शिंदेंकडे गेले आहेत. त्यामुळे २०२९ मध्ये आदित्य यांची कसोटी लागेल.
लेखकाबद्दलकुणाल गवाणकरकुणाल गवाणकर हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. मे २०२२ पासून ते मटा ऑनलाईनमध्ये काम करत आहेत. प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल अशा तिन्ही माध्यमांचा एकत्रित १४ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठिशी आहे. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचं लेखन करण्याचा अनुभव आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि त्यासंदर्भातील बातम्या यावरही त्यांचा हातखंडा आहे.
पत्रकारितेतील अनुभव
बीएमएमचं शिक्षण घेत असताना सकाळ वृत्तपत्रातून त्यांनी बातमीदारीला सुरुवात केली. वयाच्या १९ व्या वर्षी ते सकाळमध्ये अंशकालीन बातमीदार म्हणून रुजू झाले. शहरातील मुलभूत समस्या, लोकांना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या अडचणी यावर त्यांनी वृत्तांकन केलं. त्यांनी केलेल्या बातम्यांमुळे काही समस्या सुटण्यास मदत झाली. मुंबईच्या दहिसर येथील गोदावरी ही मराठी माध्यमाची शाळा बंद होणार होती. त्यामुळे गरीब घरातील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. हा प्रश्न त्यांनी बातमीच्या माध्यमातून मांडला. त्यामुळे ही शाळा वाचली. त्याबद्दल तिथल्या शिक्षकांनी ‘सकाळ’चं कौतुक केलं होतं.
मालाडमधील एका खासगी संस्थेला दहिसरमध्ये नाममात्र दरात रुग्णालयासाठी दिलेली जागा, तिथे त्यांनी नियम मोडून खासगी वापरासाठी, श्रीमंत रुग्णांसाठी केलेली व्यवस्था, त्या रुग्णालयाचं दोन आमदारांनी केलेलं उद्घाटन, या सगळ्याबद्दल सखोल माहिती देणारी वृत्तमालिका विशेष गाजली. आमदारांनी सार्वजनिक निधीचा खासगी इमारतींमध्ये केलेला वापर, नियम धाब्यावर बसवून केलेली कामं या बातम्यांचीदेखील विशेष चर्चा झाली. जनतेचे प्रश्न मांडण्याचं काम त्यांनी सातत्यानं केलं.
‘जय महाराष्ट्र’ च्या माध्यमातून २०१३ मध्ये टीव्ही मीडियात पाऊल टाकलं. सुरुवातीला फास्ट न्यूजच्या बुलेटिनची जबाबदारी सांभाळली. त्यानंतर जनरल बुलेटिन प्रोड्युसर म्हणून काम केलं. ‘मोहीम’ या प्राईम टाईममधील विशेष कार्यक्रमासाठी प्रोड्युसर म्हणून काम पाहिलं, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीशी संबंधित कार्यक्रमांचं संकलन केलं.
टीव्ही ९ मराठी वृत्तवाहिनीत स्पेशल पॅकेज लिहिण्याची जबाबदारी पार पडली. स्पेशल रिपोर्ट या प्राईम टाईम शोचा प्रोड्युसर म्हणून काम केलं. एकाच विषयाचे विविध पैलू प्रेक्षकांना उलगडून सांगण्याचं कौशल्य या शोमधून त्यांनी आत्मसात केलं.
लोकसत्ताच्या माध्यमातून त्यांनी २०१६ मध्ये ‘डिजिटल’ क्षेत्रात पदार्पण केलं. महाराष्ट्र, देश आणि आंतरराष्ट्रीय बातम्या करण्याची जबाबदारी त्यांना मिळाली. मुंबईसह महत्त्वाच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, त्यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांनी इथे मिळाली. डिजिटल माध्यमात पहिल्यांदाच न्यूजरुम बुलेटिनचा प्रयोग झाला. त्यात त्यांनी अनेकदा सूत्रसंचालनाची भूमिका बजावली. २०१७ मध्ये ‘लव्ह डायरीज’ नावाची प्रेमकथांना समर्पित असलेली मालिका सुरु करण्यात आली. त्यातील अनेक कथा त्यांनी लिहिल्या होत्या. या मालिकेतील बऱ्याचशा कथांचं कौतुक झालं.
लोकमत डिजिटलमध्ये त्यांनी २०१८ ते २०२२ अशी चार वर्षे काम केलं. लोकसभा, विधानसभा निवडणूक, प्रचारसभा, निकाल यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांना मिळाली. पाच राज्यांच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, निकालांचं विश्लेषण करण्याची, घडामोडींचे विविध कंगोरे उलगडून वाचकांपुढे ठेवण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली. जोक सेक्शनपासून ते अमेरिकेच्या व्हिसाशी संबंधित मालिकेपर्यंत सर्वदूर मुशाफिरी करण्याची संधी त्यांना इथे मिळाली. आकर्षक मथळ्यांमुळे त्यांच्या बातम्या वाचकांच्या पसंतीस उतरल्या.
२०२२ पासून महाराष्ट्र टाइम्ससाठी काम करताना त्यांनी राज्य ते राष्ट्रीय स्तरावरील राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, क्रीडा या क्षेत्रातील बातम्यांना प्राधान्य दिलं. बातमी मागील बातमी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सातत्यानं केला. घडामोडींचं विश्लेषण करणारे लेख त्यांनी लिहिले. एकनाथ शिंदे यांचं बंड, राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट, त्यामुळे बदललेलं राजकारण या नाट्यमय घडामोडींवर त्यांनी विस्तृत लिखाण केलं. सखोल माहिती घेऊन घडामोडींचं विश्लेषण करण्याची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली. घटनांमागील रंजक घडामोडी, वर्तमानातील बातम्यांची पार्श्वभूमी, त्यांचे होणारे परिणाम, सत्ताकारणासाठी सुरु असलेले शह-काटशह यावर त्यांनी सविस्तर लिखाण केलं. भाजपचे माजी खासदार आणि वरिष्ठ नेते किरीट सोमय्या यांना भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन रोखठोक सवाल करणारा त्यांचा व्हिडीओ समाज माध्यमांवर विशेष गाजला.
शैक्षणिक पात्रता
कुणाल गवाणकर यांनी २०१३ मध्ये पाटकर महाविद्यालयातून बीएमएमची पदवी संपादन केली. शालेय आणि बारावीपर्यंतचं शिक्षण दहिसरमधील शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीत झालं. विद्यार्थीदशेत असतानाच त्यांना लिखाणाची गोडी लागली. मराठी भाषेवर प्रभुत्व असल्यानं त्यांनी निबंध स्पर्धेत अनेक पारितोषिकं जिंकली. बारावीच्या बोर्ड परीक्षेमेध्ये मराठी विषयात कनिष्ठ महाविद्यालयातून सर्वाधिक गुणांनी उत्तीर्ण होण्याचा मान त्यांनी पटकावला. त्यानंतर त्यांनी पत्रकारिकेचं शिक्षण घेतलं. शिक्षण घेत असतानाचा त्यांनी या क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली होती.… आणखी वाचा