Ram Mandir Donation Controversy: तमाम हिंदू भाविकांसाठी श्रद्धा आणि अस्मितेचा विषय असलेल्या रामलल्लाच्या दानपेट्या लुटण्याचा हा प्रकार गंभीर आणि वेदनादायी. देशवासीयांची मान शरमेने खाली घालणारा.

मंदिराच्या दानपात्रात भाविकांनी अर्पण केलेला पैसा, दागिने आणि संपत्तीचा गैरव्यवहार झाल्याचे आरोप काही दिवसांपासून सुरू आहेतच; परंतु आता त्यात तथ्य असल्याचे समोर आल्याने मंदिराचे व्यवस्थापन बघणारे श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासच आरोपीच्या पिंजऱ्यात आहे. या गैरव्यवहाराचा गुन्हा नोंदविणे दूर, साधी तक्रारही अद्याप दाखल झालेली नाही; परंतु स्थानिक पोलिस, तसेच राज्य सरकारने नेमलेल्या विशेष चौकशी समितीने काही संशयितांना हेरले, त्यांच्या घरझडतीत लाखो रुपये मिळाल्याने आर्थिक घोटाळ्यावर एकप्रकारे शिक्कामोर्तबच झाले. त्यामुळे ही केवळ राजकीय चिखलफेक आणि रामलल्लाची बदनामी असल्याचा दावा करणाऱ्यांची बोलतीच बंद झाली आहे. आरोपांत ‘राम’ नसता, तर एव्हाना ‘जय श्रीराम’चा सामूहिक प्रतिध्वनीही ऐकू आलाच असता. राम जन्मभूमीनिर्माण समिती आणि विश्व हिंदू परिषदेने जलदगती चौकशीची मागणी करून ‘हे आरोप म्हणजे हिंदुधर्माचा आरोप’ वगैरे भाषा करणाऱ्यांचे दात घशात घातले आहेत.
राम मंदिराशी निगडित कोणताही मुद्दा भाजपसह हिंदुत्ववादी नेत्यांसाठी राष्ट्रीय ठरत असतो, म्हणून देणग्यांतील कथित गैरव्यवहारापासून हा पक्ष तसेच राज्य आणि केंद्र सरकारलाही नामानिराळे राहता येणार नाही. सरकारने भिडभाड न बाळगता याचा सोक्षमोक्ष लावावा, दोषींना कठोर शासन करावे, जेणेकरून देवालयांतील हुंडीवर दरोडा घालण्याच्या प्रकारांनाही चाप लागू शकेल.
बाकी अयोध्येचा राम अलीकडेच जगभरातील श्रीमंत देवालयांच्या यादीत आला आहेच; यापुढे त्याचा कारभार अधिक पारदर्शी असावा, प्रत्येक रुपयाचा चोख हिशेब ठेवला जाऊन भाविकांचे दान सत्पात्री लागावे. तसे घडल्यास प्रभू श्रीरामचंद्राच्या आदर्श आयुष्याप्रमाणे या मंदिराचा सर्वांना हेवा वाटेल, त्याचा आदर्श संपूर्ण जगापुढे शेकडो वर्षे टिकू शकेल.

