► वृत्तसंस्था नवी दिल्ली
बॉलिवूड अभिनेता राजपाल यादवला दिल्ली उच्च न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी त्याला चेक बाऊन्स प्रकरणात तीन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. एम. एस. मुरली प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडने दाखल केलेल्या खटल्यात न्यायमूर्ती स्वरणा कांता शर्मा यांच्या न्यायालयाने हा निकाल दिला.
राजपाल यादवला त्याचे वचन पूर्ण करण्यासाठी आणि कंपनीची थकबाकी भरण्यासाठी अनेक संधी देण्यात आल्या होत्या, परंतु वारंवार आश्वासन देऊनही त्याने पैसे भरले नाहीत, असे न्यायालयाने म्हटले आहे.
राजपालला दोषी ठरवून, न्यायमूर्ती स्वरणा कांता शर्मा यांनी सत्र न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेत बदल केला. न्यायालयाने राजपाल यादवला सर्व सात प्रकरणांमध्ये तक्रारदाराला 1.05 कोटी देण्याचे निर्देश दिले. याव्यतिरिक्त तक्रारदाराला 1.04 लाख आणि 75,000 रुपये देण्याचा आदेश जारी करण्यात आला, तर राज्याला 25,000 रुपये द्यावे लागतील.
उच्च न्यायालयाने राजपाल यादवच्या पत्नी, राधा यादव यांना प्रत्येक प्रकरणात तक्रारदाराला 5,51,380 रुपये देण्याचे निर्देशही दिले. राजपाल यादवने आधीच जमा केलेले 2.25 कोटी अंतिम रकमेमध्ये समायोजित केले जातील, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
यापूर्वी, मे 2024 मध्ये, एका सत्र न्यायालयाने राजपाल यादवला याच चेक बाऊन्स प्रकरणात सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. नंतर त्यांच्या वकिलाने दोन्ही पक्षांमध्ये सामंजस्य होईल असे न्यायालयाला आश्वासन दिल्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिली. हे प्रकरण दिल्ली उच्च न्यायालयाच्या मध्यस्थी केंद्राकडेही वर्ग करण्यात आले होते.
वारंवार हमी, पण पैसे भरण्यात अपयश
न्यायालयाकडे वेळ मागितल्यानंतर आणि तडजोडीचे आश्वासन देऊनही राजपाल यादवने ठरलेली रक्कम जमा केली नव्हती. न्यायालयाने हेही नमूद केले की, त्याने 2.5 कोटी रुपये हप्त्यांमध्ये भरण्याची परवानगी मागितली होती, परंतु त्याने त्याचे पालन केले नाही. या परिस्थितीचा विचार करून उच्च न्यायालयाने अभिनेत्याला तीन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.
