Moshi Garbage Depot Accident : मोशी कचरा डेपो दुर्घटनेत २९ वर्षीय नागेश गायकवाड यांच्या मृत्यूचा धक्का कुटुंब पचवत असतानाच आणखी एक हादरा बसला. पतीनिधनानंतर तणावात असलेल्या २३ वर्षीय पत्नी सोनाली गायकवाड यांनी आयुष्याची अखेर केली. त्यामुळे चार वर्षांची श्रेया आणि दीड वर्षांची प्रिया या दोन मुली, वृद्ध आई-वडील यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

पतीच्या मृत्यूच्या धक्क्यातून सोनाली सावरलेल्या नव्हत्या. नागेश यांच्या निधनानंतर त्या मानसिक तणावात आणि दुःखी असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. याच मानसिक तणावातून त्यांनी टोकाचे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र त्यांनी जीव देण्यामागील नेमके कारण तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.
दोन मुली दुसऱ्या खोलीत; दिराने दरवाजा तोडला
बुधवारी रात्री सोनाली गायकवाड यांनी राहत्या घरात गळफास घेतला. त्यावेळी त्यांच्या दोन चिमुकल्या मुली घरातील दुसऱ्या खोलीत होत्या. मुली रडत असल्याचे लक्षात आल्यानंतर सोनाली यांच्या दिराने खोलीतून आवाज दिला. मात्र आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
परिस्थिती संशयास्पद वाटल्याने दिराने खोलीचा दरवाजा तोडला. त्यावेळी सोनाली यांनी गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.
Ghatkopar Landslide : डोळ्यात स्वप्नं घेऊन आले, बहिणीच्या परिवारासह मुंबई फिरले, नियतीचा क्रूर घाला, चौकोनी कुटुंबाचा चटका लावणारा शेवटसोनाली यांचे दीर तसेच सासू-सासरे घरातील बाजूच्या खोलीत राहत असल्याची माहिती समोर आली आहे. कुटुंबीयांच्या उपस्थितीत असतानाही ही दुर्दैवी घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
महिनाभरातच दोन्ही पालक गमावले
गायकवाड दाम्पत्याला दोन मुली आहेत. काही दिवसांपूर्वीच या दोन चिमुकल्यांनी वडील नागेश गायकवाड यांना गमावले होते. वडिलांच्या निधनाच्या दुःखातून कुटुंब सावरत असतानाच आता आई सोनाली यांचाही मृत्यू झाला आहे.
अवघ्या महिनाभराच्या कालावधीत आई-वडील दोघांनाही गमावल्याने या दोन चिमुकल्या मुलींवर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या या मुलींच्या भवितव्याबाबतही आता प्रश्न निर्माण झाला आहे. या घटनेने परिसरातील नागरिकांमध्येही हळहळ व्यक्त केली जात आहे.
लेकींच्या भविष्यासाठी झटणारा हात थांबलासंजय गांधीनगर, मोशी
संजय गांधीनगर, मोशी येथील रहिवासी असलेले २९ वर्षीय नागेश सर्जेराव गायकवाड तीन वर्षांपासून कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करीत होते. दुर्घटनेच्या वेळी प्रशासकीय इमारतीत असताना कचऱ्याचा ढिगारा कोसळला आणि त्याखाली दबून त्यांचा मृत्यू झाला. बारावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर कुटुंबाला हातभार लावण्यासाठी नागेश यांनी नोकरी स्वीकारली होती. स्वतःचे घर उभे करणे आणि मुलींना शिकवणे हे त्यांचे ध्येय होते, मात्र एका मागून एक घडलेल्या घटनांनी सर्व काही उद्ध्वस्त झाले आहे.
एमआयडीसी भोसरी पोलिसांकडून तपास
या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी भोसरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, सोनाली यांच्या आत्महत्येमागील नेमके कारण काय होते, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.
मोशी दुर्घटनेत नऊ कामगारांचा मृत्यू
जुलै महिन्यात पुणे जिल्ह्यातील मोशी कचरा डेपो दुर्घटनेत नऊ कामगारांचा मृत्यू झाला होता. केवळ नऊ कामगारांचे जीव घेतले नाहीत, तर नऊ कुटुंबांचा आधार, स्वप्ने आणि उद्याची आशाही हिरावून घेतली. कुणाच्या चिमुकल्यांच्या डोक्यावरचे वडिलांचे छत्र हरपले, कुणाचा नव्याने फुललेला संसार अर्ध्यावर मोडला, तर कुणाच्या वृद्ध आई-वडिलांचा एकमेव आधार कायमचा निघून गेला. कष्टाच्या कमाईवर संसाराचा गाडा ओढणारे हे कर्ते पुरुष गेल्याने अनेक कुटुंबांचा आर्थिक कणा क्षणात मोडकळीस आला. या घटनेने सर्वत्र हळहळ आणि संतापाची भावना व्यक्त केली जात आहे.

