Headlines

Pune Engineer Heramb Karmarkar Dies in Strait of Hormuz Ship Attack; होर्मुझमध्ये जहाजावरील हल्ल्यात पुणेकर तरुणाने प्राण गमावले, मरीन इंजिनिअर हेरंब करमरकर यांचा करुण अंत


Strait of Hormuz Ship Attack Pune Engineer Death : ​हेरंब करमरकरचा आपल्या कुटुंबाशी भारतीय प्रमाणवेळेनुसार रविवारी पहाटे २:४९ वाजता शेवटचा संपर्क झाला होता; त्यावेळी त्यांनी आपण सामुद्रधुनी सुरक्षितपणे पार केल्याचे कळवले होते.

Strait of Hormuz Ship Attack Pune Engineer Heramb Karmarkar Death Maharashtra Times
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
पुणे : होर्मुझच्या सामुद्रधुनीत दोन जहाजांवर इराणने केलेल्या हल्ल्यांमध्ये एका भारतीयाचा मृत्यू झाला, तर १० जण जखमी झाले आहेत. ‘एमव्ही जीएफएस गॅलेक्सी’ या कंटेनर जहाजावरील ‘थर्ड इंजिनिअर’ हेरंब करमरकर यांचा मृत्यू झाल्याची पुष्टी मंगळवारी त्यांच्या कुटुंबीयांनी केली. रविवारी ‘स्ट्रेट ऑफ होर्मुझ’ येथे जहाजावर एका प्रक्षेपकाचा मारा झाल्यानंतर ते बेपत्ता झाले होते.

प्रक्षेपकाच्या हल्ल्यात इंजिन रुमला आग

मालवाहू जहाज ‘एमव्ही जीएफएस गॅलेक्सी’ भारतीय प्रमाणवेळेनुसार रविवारी पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास ओमानच्या जलसीमांजवळून जात असताना एका प्रक्षेपकाचा त्याला फटका बसला. या आघातामुळे जहाजाच्या इंजिन रुममध्ये आग लागली आणि जहाज गतिहीन झाले. त्यानंतर, कर्मचाऱ्यांनी जहाज नांगरुन उभे केले आणि ‘लाइफबोट्स’च्या साहाय्याने सुरक्षित बाहेर पडले.

हल्ल्यानंतर हेरंब झालेले बेपत्ता

दुर्घटनाग्रस्त जहाजावर ११ भारतीयांसह एकूण २४ जणांचे कर्मचारी-पथक होते. ‘रॉयल नेव्ही ऑफ ओमान’ने सुरक्षित स्थलांतर केल्यानंतर सुमारे दोन तासांनी त्यापैकी २३ जणांची सुटका करण्यात आली. हल्ला झाला तेव्हा हेरंब हे इंजिन रुमजवळ असावेत असा अंदाज आहे. ते एकमेव व्यक्ती होते ज्यांचा काहीही थांगपत्ता लागत नव्हता. मरीन इंजिनिअर असलेले हेरंब करमरकर मूळ पुण्याचे होते.

दुर्घटनेच्या काही मिनिटं आधीच कुटुंबाशी संपर्क

हेरंब यांचा आपल्या कुटुंबाशी भारतीय प्रमाणवेळेनुसार रविवारी पहाटे २:४९ वाजता शेवटचा संपर्क झाला होता; त्यावेळी त्यांनी आपण सामुद्रधुनी सुरक्षितपणे पार केल्याचे कळवले होते. त्यांची ही सागरी मोहीम तीन महिन्यांहून अधिक काळापासून सुरु होती आणि त्यानंतर ते लवकरच भारतात परतणार होते.
Maharashtra TimesCrime News : केतन अग्रवाल केसची पुनरावृत्ती, जिजूच्या प्रेमात उर्मिलाने नीरजचा जीव घेतला, जंगलात बोलावून भयंकर प्रकार
या हल्ल्यांमुळे होर्मुझ सामुद्रधुनीवरील नियंत्रणावरुन अमेरिका-इराण यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचल्याचे अधोरेखित झाले असून, त्याच्या झळा भारताला बसत आहेत. भारताने इराणी दूतावासाच्या उपप्रमुखांना बोलावून या हल्ल्यांबाबत तीव्र निषेध नोंदवला.

अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त अरब अमिरातीची (यूएई) ‘अल बाहिया’ आणि ‘मोम्बासा’ ही व्यापारी जहाजे होर्मुझच्या दक्षिणेकडील मार्गिकेवरून जात असताना इराणने क्षेपणास्त्र हल्ले केले. दोन्ही जहाजांवर मिळून ३० भारतीय खलाशी होते.

परराष्ट्र मंत्रालयाकडून निषेध

‘भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने मोहम्मद जवाद होसेनी यांना बोलावून या घटनेचा निषेध केला. पश्चिम आशियात शांतता व स्थिरता प्रस्थापित करण्यासाठी हिंसाचार त्वरित थांबवून संवाद आणि मुत्सद्देगिरीचा मार्ग स्वीकारण्याचे आवाहनही भारताने पुन्हा केले’, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

२८ फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर सुरू झालेल्या संघर्षामध्ये पश्चिम आशियात आत्तापर्यंत १४ भारतीयांचा मृत्यू झाला आहे.

Khadse vs Gulabrao Patil | गुलाबराव पाटलांसारखा राजकारणात कधी खंड पडला नव्हता, खडसेंची प्रतिक्रिया

‘होर्मुझची सामुद्रधुनी ओलांडत असताना ‘अल बाहिया’ आणि ‘मोम्बासा’ या जहाजांवर झालेल्या हल्ल्यांबाबत भारत अत्यंत चिंतित आहे. या दोन्ही जहाजांवरील एकूण ४६ कर्मचाऱ्यांपैकी ३० जण भारतीय खलाशी होते. यातील ‘अल बाहिया’वरील १२ भारतीय नागरिकांपैकी एकाचा मृत्यू झाला, अन्य एक जण जखमी झाला आहे. ‘मोम्बासा’वरील १८ भारतीय नागरिकांपैकी नऊ जण जखमी झाले असून, त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे’, असे परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हटले आहे.

‘खलाशांना लक्ष्य करणाऱ्या आणि होर्मुझ सामुद्रधुनीसारख्या आंतरराष्ट्रीय जलमार्गांमधून होणाऱ्या मुक्त व सुरक्षित जलवाहतुकीत अडथळा आणणाऱ्या या हल्ल्यांचा आणि हिंसक कृत्यांचा आम्ही तीव्र निषेध करतो’, असेही यात नमूद करण्यात आले आहे.

भारतीय खलाशांना सर्वतोपरी मदत

भारतीय खलाशाच्या मृत्यूबद्दलही परराष्ट्र मंत्रालयाने शोक व्यक्त केला असून, जखमी खलाशी लवकरात लवकर बरे व्हावेत, अशा सदिच्छा व्यक्त केली. ‘‘यूएई’मधील भारतीय दूतावास परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. तसेच, प्रभावित भारतीय खलाशांना शक्य ती सर्व मदत मिळावी यासाठी आखाती देशातील संबंधित प्राधिकरणांच्या संपर्कात आहेत’, असेही मंत्रालयाने म्हटले आहे.
Maharashtra TimesJayant Patil : भाजपश्रेष्ठींचा विरोध मावळावा, जयंत पाटलांचे फडणवीसांना साकडे? ‘वर्षा’वर तासभराच्या बैठकीने चर्चांना उधाण
दरम्यान, ‘अल बाहिया’ आणि ‘मोम्बासा’ या जहाजांना होर्मुझच्या सामुद्रधुनीतील दक्षिण नौवहन मार्गावरून जात असताना ओमानच्या प्रादेशिक जलक्षेत्रात दोन इराणी क्रूझ क्षेपणास्त्रांद्वारे लक्ष्य करण्यात आल्याचे ‘यूएई’च्या संरक्षण मंत्रालयाने सोशल मीडियावर नमूद केले आहे. दोनच दिवसांपूर्वी सायप्रसचा ध्वज असलेल्या ‘जीएफएस गॅलेक्सी’ या मालवाहू जहाजावर इराणने हल्ला केला होता. यात एक भारतीय कर्मचारी बेपत्ता झाला होता. अमेरिका आणि इराण यांच्या या वाढत्या हल्ल्यांमुळे दोन्ही देशांमधील युद्ध संपुष्टात येण्याची आशा धुसर होताना दिसत आहेत.

अनिश बेंद्रे

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.आणखी वाचा