कैलास मानसरोवर यात्रा करोनाकाळापासून बंद होती. ही यात्रा पुन्हा सुरू झाल्यानंतर महाराष्ट्रातील अनेक पर्यटक या यात्रेला जाण्यासाठी उत्सुक होते. महाराष्ट्रासह भारतातील पर्यटकांना नेपाळमार्गे कैलास मानसरोवरपर्यंत जाण्याचा मार्ग अधिक सोयीस्कर आणि आर्थिकदृष्ट्याही किफायतशीर आहे. त्यामुळे नेपाळमधून तिबेटमध्ये या यात्रेसाठी जाणाऱ्यांची संख्या अधिक असते. बुधवारी सकाळी आलेल्या पुरामध्ये कस्टम आणि इमिग्रेशन केंद्र पूर्ण वाहून गेल्याने सकाळच्या वेळी इमिग्रेशनसाठी उपस्थित असलेले पर्यटक या लोंढ्यासोबत गेल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. या भागामध्ये इंटरनेट सेवाही आता उपलब्ध नसल्याने यात्रेकरुंशी संपर्क होत नसल्याने नातेवाईक हतबल झाले आहेत.
नेपाळला पुराचा विळखा, तरीही सिलिंडरसाठी आटापिटा; LPG साठी जीव धोक्यात का घातला जातोय?डोंबिवली पूर्वेकडील कासा रिओ परिसरात राहणारे ज्येष्ठ नागरिक सुनील सुभेदार हे हिल्स अन्ड ट्रेल्स कंपनीमार्फत २३ ऑगस्ट ते ५ सप्टेंबरदरम्यानच्या कालावधीसाठी कैलास मानसरोवर परिसरात गेले होते. त्यांचा २५ ऑगस्टला शेवटचा संपर्क झाला होता. मात्र, आता संपर्क होत नसल्याने
त्यांच्या कुटुंबीयांनी सरकारला मदतीचे आवाहन केले आहे. कल्याण पश्चिमेकडे राहणारे संजय राजमल पाटील आणि नलिनी पाटील यांचाही संपर्क होत नसल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली.
अलिबागजवळील चौल येथील जय गिरनारी शिवदत्त मंदिर ट्रस्टच्या वतीने नेपाळ येथे दर्शन व पर्यटनासाठी गेलेले रायगड जिल्ह्यातील ३७ भाविक अडकले आहेत. मात्र, सर्व भाविक सुरक्षित असून त्यांची प्रकृती उत्तम आहे. त्यांच्यासोबत दोन डॉक्टरही असल्याने आरोग्याच्या दृष्टीने कोणतीही अडचण नसल्याचे सांगण्यात आले.
अखेरचा कॉल, मग फोन बंद; अर्धवट मेसेजनं धडधड वाढली; नेपाळमध्ये आप्त अडकलेल्यांची आपबितीनेपाळ सरकार, पर्यटन विभाग तसेच महाराष्ट्र सरकार यांच्याकडून रात्री उशिरापर्यंत पर्यटक बेपत्ता असल्याची माहिती देण्यात येत होती. महाराष्ट्रातील विविध टूर ऑपरेटर, साहसी पर्यटक, गिर्यारोहक यांच्याकडूनही या नातेवाइकांना कोणत्याच मार्गाने या यात्रेसाठी गेलेल्या यात्रेकरुंबद्दल माहिती मिळत नव्हती. राज्य आपत्कालीन संचालन केंद्राने दिलेल्या माहितीनुसार सागा, मानसरोवरजवळ महाराष्ट्रातील ११४ नागरिक अडकले असून त्यातील ५३ नागरिक सुरक्षित होते. रिचा टूर्स प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेद्वारे दोन गाड्यांमधून पर्यटक मानस सरोवर येथे गेले होते. त्यापैकी एका गाडीत जवळपास ३७ जण सुरक्षित आहेत, असे राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.
या व्यतिरिक्त राज्यातील १५० नागरिक मानसरोवरजवळ सुरक्षित असल्याचेही राज्य आपत्कालीन संचालन केंद्राद्वारे सांगण्यात आले.
नेपाळ, लडाख, भुतान येथे कार्यरत असलेल्या एका पर्यटन व्यावसायिकांनी पूरस्थिती निर्माण होण्याच्या अवघा एक तास आधी तिथे पोहोचलेल्या एका ओळखीच्या पर्यटकाने इमिग्रेशन केंद्र येथून एक फोटो पाठवल्याचे सांगितले. मात्र त्यानंतर या पर्यटकाचा संपर्क होत नसल्याने हा आनंदाचा क्षण शेअर केल्यानंतर पुढे काय, याचा अंदाजच येत नसल्याची प्रतिक्रिया पर्यटक व्यावसायिकांनी दिली.
अवघ्या काही क्षणांमध्ये प्रत्यक्ष परिस्थिती समजण्याचा मार्गच बंद झाल्याने या नातेवाइकांसमोर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. रुसावागढी येथील इमिग्रेशन केंद्र हे पाच मजली असून त्यावरून पाण्याचा लोंढा आल्याने त्या पाण्याच्या लोंढ्याची ताकद किती अफाट असेल, याचा अंदाज वर्तवता येतो, असे ईशा टूर्सचे आत्माराम परब यांनी सांगितले. दिवसभर विविध भागांमधून यात्रेकरूंच्या नातेवाइकांचे फोन येत असून बेपत्ता या माहितीशिवाय कोणतीही अधिकृत माहिती त्यांना देता येत नसल्याची खंत परब यांनी व्यक्त केली. या केंद्रावर सकाळी ८.३० ते १० पर्यंत सर्वाधिक गर्दी असते असे ज्येष्ठ गिर्यारोहक उमेश झिरपे यांनी सांगितले. या वेळेत तिबेटमध्ये जाणारी तसेच तिबेटहून यात्रेवरून माघारी परतणारी लोक प्रवास करतात. लोंढा ज्यावेळी आला ती सकाळची वेळ होती. त्यामुळे इमिग्रेशन केंद्रामध्ये सर्वाधिक गर्दी होती. त्यामुळेच यात्रेकरू मोठ्या संख्येने बेपत्ता असल्याचे झिरपे म्हणाले.
Pakistan Fire : पाकिस्तानच्या बाल रुग्णालयात भीषण स्फोट, १६ पैकी १५ नवजात अर्भकांचा जागीच मृत्यूहेल्पलाइन क्रमांक
नेपाळमध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे महाराष्ट्रातील नागरिकांसाठी हेल्पलाइन क्रमांक जारी करण्यात आले आहेत. मंत्रालयातील नियंत्रण कक्षात २४ तास हा कक्ष कार्यरत असून ज्यांना कुठल्याही प्रकारच्या मदतीची गरज आहे, त्यांनी खालील क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
राज्य नियंत्रण कक्ष हेल्पलाइन :
१०७० (टोल-फ्री क्रमांक)
नियंत्रण कक्ष
+९१-९३२१५८७१४३
अधिकृत ई-मेल :
controlroom@maharashtra.gov.in
माहिती नोंदवण्यासाठी लिंक : https://geospatial.mahaseoc.in
/Sahayata_gulf/
३० देशांतील नागरिकांचा समावेश
सुमारे ५९० पर्यटक बेपत्ता असल्याचे नेपाळ पर्यटन मंडळाने म्हटले आहे. त्यात ४७६ परदेशी पर्यटक आणि ११४ नेपाळींचा समावेश आहे. बेपत्ता परदेशी पर्यटकांमध्ये अमेरिका, कॅनडा, दक्षिण आफ्रिका, ब्रिटन, इटली, दक्षिण कोरियासह ३० देशांतील पर्यटकांचा समावेश आहे.
हेलिकॉप्टर, ड्रोनद्वारे बचावकार्य
नेपाळ आणि तिबेटच्या सीमेवरील जलप्रलयाने हाहाकार उडाला आहे. या प्रलयामुळे नेपाळ आणि तिबेटमध्ये विध्वंस घडवला असून, मृतांची संख्या गुरुवारी ३६२वर पोहोचली. त्यात नेपाळमधील ३५९, तर तिबेटमधील तिघांचा समावेश आहे. अद्यापही दीड हजारांहून अधिक जण बेपत्ता आहेत. पूरग्रस्त भागांत विध्वंसाच्या खुणा दिसू लागल्या असून, मदतकार्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. तिबेटमधून बुधवारी आलेल्या महापुरामुळे मध्य नेपाळमध्ये मोठा विध्वंस घडवला. त्याचा अनेक शहरे, गावे, पूल, जलविद्युत प्रकल्पांना मोठा फटका बसला. महापुरामुळे विध्वंसाची व्याप्ती मोठी असल्याचे गुरुवारी स्पष्ट झाले. या प्रलयामुळे नेपाळमध्ये ९१० जण, तर तिबेटमध्ये ५५८ जण बेपत्ता झाले आहेत. नेपाळमध्ये विविध पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये ८०० जणांची सुटका करण्यात आली आहे. हेलिकॉप्टर, ड्रोनच्या साह्याने मदतकार्य सुरू आहे.

