Headlines

Nepal Flood: नेपाळला पुराचा विळखा, तरीही सिलिंडरसाठी आटापिटा; LPG साठी जीव धोक्यात का घातला जातोय?


नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुरात आतापर्यंत ३५९ जणांनी जीव गमावला आहे. ८०० ते ९०० जण अजूनही बेपत्ता आहे. एकीकडे ही परिस्थिती असताना दुसरीकडे एलपीजी सिलिंडरसाठी लोक जीव धोक्यात घालत आहेत.

nepal flood lpg
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
काठमांडू: नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुरात मृत्यूमुखी पडलेल्यांचा आकडा ३५९ वर पोहोचला आहे. अद्यापही ८०० ते ९०० जण बेपत्ता आहेत. हा आकडा पाहता मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. नेपाळमधील बरेसचे भाग पाण्याखाली गेलेले असताना सिलिंडरसाठी लोक जीव धोक्यात घालत आहेत. पूर परिस्थितीत सिलिंडरसाठी आयुष्य पणाला लावणाऱ्या नेपाळी नागरिकांचे व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.

पूर परिस्थितीत सिलिंडरसाठी नेपाळी जनतेची धावाधाव सुरू आहे. सिलिंडरसाठी अनेकांचा आटापिटा चालला आहे. एक जण दोन खांद्यांवर दोन सिलिंडर नेताना दिसत आहे. तर दुसरीकडे पुराच्या पाण्यात बाकी सगळ्या वस्तूंकडे दुर्लक्ष करून सिलिंडरसाठी जीव धोक्यात घातला जात आहे. नेपाळी जनतेच्या वर्तनावर अनेकांनी सोशल मीडियावर टीका केली आहे. पण नेपाळमधलं वास्तव वेगळं आहे.

nepal flash floods

सिलिंडरसाठी इतका आटापिटा कशाला?

नेपाळमध्ये असलेल्या एलपीजी संकटामुळे सिलिंडरसाठी लोकांचा आटापिटा सुरू असल्याचं दिसतं. नेपाळ बऱ्याच महिन्यांपासून एलपीजी तुटवड्याचा सामना करत आहे. मार्च-एप्रिल २०२६ पासूनच देशात एलपीजी संकट आहे. यातून मार्ग काढण्यासाठी सरकारनं वेगवेगळे उपाय केले. पण तरीही परिस्थितीत फारशी सुधारणा झालेली नाही. सिलिंडरमध्ये केवळ ७.१ किलो गॅस भरून देण्याचा पर्यायही वापरून पाहण्यात आला आहे.

nepal lpg crisis

नेपाळ विद्यार्थी संघाचे नेते रिकामी सिलिंडर घेऊन आंदोलन करत असल्याची बातमी काठमांडू पोस्टनं १६ ऑगस्टलाच दिली होती. एलपीजीच्या तुटवड्यामुळे काठमांडूसह देशाच्या बऱ्याच भागांमध्ये भीषण स्थिती असल्याचा दावा त्यांनी केला होता. ग्राहकांना एलपीजी सिलिंडर मिळताना अडचणी येत असून त्यांना तासनतास रांगा लावाव्या लागत होत्या. त्यामुळे लोकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत होता.

राजधानी काठमांडूमध्ये एलपीजी सिलिंडरसाठी रांगा लागत असल्याचं वृत्त १५ ऑगस्टला रॉयटर्सनं दिलं होतं. प्रशासनाकडून काठमांडूमध्ये पाच ठिकाणी सिलिंडरची विक्री केली जात होती. अशा स्थितीत अत्यावश्यकता असलेले ग्राहक त्यांचा नागरिकत्वाचा किंवा राष्ट्रीय ओळखपत्र दाखवून एलपीजी सिलिंडर खरेदी करत होते.