Nagpur Crime News : तरुण-तरुणीने हॉटेलमध्ये रुम बुक केली होती. रात्री साडेनऊच्या सुमारास किंकाळ्या ऐकू आल्या. नागपूरच्या स्टेरिअस हॉटेलमध्ये नेमकं काय घडलं? तरुणाच्या चौकशीतून काय माहिती समोर येणार?

नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, शिवानी आणि किरण हे काल मंगळवारी मनीषनगरातील अजित बेकरीमागील एका हॉटेलमध्ये आले होते. दोघांनी हॉटेलमधील रूम क्रमांक 302 भाड्याने घेतली. काही वेळ दोघे रूममध्ये होते. मात्र, रात्री साडेनऊच्या सुमारास अचानक रूममधून मोठ्या आवाजात किंकाळ्या ऐकू येऊ लागल्या. त्यामुळे हॉटेल कर्मचाऱ्यांसह शेजारील रूममधील व्यक्तींनी तातडीने रूमकडे धाव घेतली. रूममध्ये प्रवेश केल्यानंतर समोरचं दृश्य पाहून सर्वांनाच धक्का बसला. शिवानी रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडली होती, तर तिच्या शेजारी किरणही गंभीर जखमी अवस्थेत पडला होता. रूममध्येच रक्तानं माखलेला चाकू आढळून आला. शिवानीच्या शरीरावर चाकूचे अनेक घाव होते. हॉटेल व्यवस्थापनाने तातडीने बेलतरोडी पोलिसांना घटनेची माहिती दिली.
दोघेही रेल्वे कर्मचारी
माहिती मिळताच बेलतरोडी पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी दोघांनाही तातडीनं रुग्णालयात हलवलं. मात्र, डॉक्टरांनी शिवानीला मृत घोषित केले. किरणवर तातडीने उपचार सुरू करण्यात आले असून तो गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती आहे. मृतक शिवानी राजानंद गजभिये (वय 28 ) ही अजनीतील शताब्दी चौक परिसरात राहत होती. तर जखमी किरण संजय आत्राम हा अजनीतील रेल्वे वसाहतीत राहत असल्याचं सांगण्यात येत आहे. दोघेही रेल्वे कर्मचारी असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.
घटनेमध्ये वेगवेगळे पैलू
दरम्यान, दोघांमध्ये लग्नाच्या मुद्द्यावरून वाद झाला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. हा वाद मिटवण्यासाठी किंवा काहीवेळ एकत्र घालवण्यासाठी दोघे हॉटेलमध्ये आले असावेत, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, रूममध्ये नेमकं काय घडलं? याचा तपास अद्याप सुरू आहे. पोलिसांच्या प्राथमिक संशयानुसार, रूममध्ये दोघांमध्ये वाद झाला असावा. वाद विकोपाला गेल्यानंतर किरणने शिवानीवर चाकूने अनेक वार केले असावेत. त्यानंतर त्याने स्वतःलाही चाकूने जखमी करून आत्महत्येचा प्रयत्न केला असावा, असा पोलिसांचा संशय आहे. किरणने चाकू सोबत आणला होता का? याचाही तपास सुरू असून हल्ला पूर्वनियोजित होता का, हा प्रश्नही पोलिसांसमोर आहे.
गळ्यात मंगळसूत्र, बेडवर गुलाबाच्या पाकळ्या आणि फुगे
घटनास्थळी शिवानीच्या गळ्यात मंगळसूत्र असल्याचं दिसून आलं. तिच्या भांगातही रक्त आढळलं. किरणने स्वतःला जखमी केल्यानंतर तिच्या भांगात कुंकवाऐवजी स्वतःचं रक्त लावलं असावं, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, याबाबत पोलिसांकडून अधिकृत पुष्टी झालेली नाही. हॉटेलच्या रूममध्ये बेड गुलाबाच्या पाकळ्या आणि फुग्यांनी सजवण्यात आला होता. त्यामुळे दोघे नेमक्या कोणत्या कारणासाठी हॉटेलमध्ये आले होते? याचाही तपास केला जात आहे. काही वेळापूर्वी रूममध्ये असलेलं वातावरण आणि त्यानंतर घडलेला रक्तरंजित प्रकार यामुळे या घटनेचं गूढ अधिक वाढलं आहे.
बेलतरोडी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून चाकूसह इतर पुरावे ताब्यात घेतले आहेत. हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. दोघांमधील संबंध, लग्नाचा मुद्दा, घटनेपूर्वी झालेला वाद आणि किरणने केलेला हल्ला पूर्वनियोजित होता का? याचा तपास पोलीस करत आहेत.

