Headlines

Kalyan Taxi Driver gives lift to two women blackmail over ransom Crime News; दोन तरुणींनी लिफ्ट मागितली, गाडीत बसताच 10 हजारांची मागणी, खोट्या तक्रारीची धमकी, कल्याणमधील चालकाला भयंकर अनुभव


Crime News : मध्यरात्री घरी परतणाऱ्या टॅक्सी चालकाला दोन तरुणींनी लिफ्ट मागून लुबाडण्याचा प्रयत्न केला. टॅक्सीत बसल्यानंतर काही अंतरावर या तरुणींनी चालकाकडे १० हजारांची मागणी केली. नकार दिल्यास गैरवर्तनाचा आरोप करण्याची धमकी दिल्याचाही आरोप चालकाने केला आहे

Kalyan Cab Driver Blackmail Maharashtra Times
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. वृत्तसेवा, कल्याण : प्रवासी भाडे सोडून मध्यरात्री घरी परतणाऱ्या टॅक्सी चालकाला दोन तरुणींनी लिफ्ट मागून लुबाडण्याचा प्रयत्न केल्याची घटना कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवर घडली. टॅक्सीत बसल्यानंतर काही अंतरावर या तरुणींनी चालकाकडे १० हजार रुपयांची मागणी केली. नकार दिल्यास गैरवर्तनाचा आरोप करण्याची धमकी दिल्याचा आरोप चालकाने केला आहे. या प्रकरणी चालकाने कोन पोलिस ठाण्यात दोन अज्ञात तरुणींविरोधात तक्रार दाखल केली आहे. या घटनेनंतर रात्री-अपरात्री प्रवास करणाऱ्या चारचाकी आणि दुचाकी चालकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

पैसे द्या नाहीतर गैरर्वतनाची तक्रार

खासगी प्रवासी वाहतूक करणारे सचिन शेंडगे दिवा येथे प्रवासी भाडे सोडून परतीच्या प्रवासाला निघाले होते. गोविंदवाडी बायपासवर पोलिस ठाण्याजवळील चहाच्या टपरीसमोर उभ्या असलेल्या दोन तरुणींनी त्यांच्या गाडीला हात दाखवून लिफ्ट मागितली. शेंडगे यांनी आपण भिवंडीला जाणार नसून त्याआधीच वळणार असल्याचे सांगितले.

त्यावर त्या तरुणींनी त्यांना पुढील चौकात सोडण्याची विनंती केली. मात्र दुर्गाडी चौकात पोहोचण्यापूर्वीच या तरुणींनी चालकाकडे १० हजार रुपयांची मागणी केली. शेंडगे यांनी पैसे देण्यास नकार देत थेट पोलिस मदत कक्षाशी संपर्क साधला. त्यानंतर या तरुणींनी चालकावर गैरवर्तनाचा आरोप करण्याची धमकी देत त्याला घाबरवण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

शिवीगाळ करत गाडीतून उडी

चालकाने मोबाइलवर या प्रकाराचे चित्रीकरण सुरू केले आणि गाडी पोलिस ठाण्याच्या दिशेने वळवली. दरम्यान, या तरुणींनी शिवीगाळ करत गाडीतून उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिस मदत कक्षाला कॉल गेल्यानंतर गस्तीवरील पोलिस वाहन मदतीसाठी रवाना झाले. कोन परिसरात समोरून पोलिसांची गाडी येताना दिसताच चालकाने गाडीचा वेग कमी केला. त्याचवेळी दोन्ही तरुणींनी चालत्या गाडीतून उडी मारून पळ काढला.

छत्रपती संभाजीनगरमध्ये अपहरण करून मागितले दहा लाख

दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर येथे प्रवासी म्हणून रिक्षात बसलेल्या पाच जणांच्या टोळीने रिक्षाचालकाचे अपहरण करून त्याला तलवार व चाकूचा धाक दाखवत लुटल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपींनी चालकाच्या पत्नीकडून ‘फोन-पे’वर १५ हजार रुपयांची खंडणी उकळली आणि त्यानंतर १० लाख रुपयांच्या अतिरिक्त खंडणीची मागणी करत चालकाला जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणात दक्ष नागरिकांच्या सतर्कतेमुळे एमआयडीसी वाळूज पोलिसांनी त्वरित कारवाई करत टोळीतील तीन सदस्यांना ताब्यात घेतले आहे. ही घटना ११ ऑगस्ट रोजी रात्री साडेसात वाजताच्या सुमारास जोगेश्वरी परिसरातील दत्त मंदिराच्या मागे घडली.

नक्की काय घडले?

गंगापूर तालुक्यातील सिद्धेश्वर कॉलनीतील रिक्षाचालक गणेश सदाशिव कदम (वय ३८) हे ११ ऑगस्ट रोजी सायंकाळी आपली रिक्षा घेऊन पंचवटीहून रांजणगावकडे जात होते. नगरनाका येथून बसलेल्या दोन प्रवाशांनी जोगेश्वरीकडे जाताना आपल्या आणखी तीन साथीदारांना फोस्टर कंपनीमागे बोलावून घेतले. पाचही जण एकत्र आल्यानंतर त्यांनी कदम यांना तलवार व चाकूचा धाक दाखवून मारहाण केली. आरोपींनी कदम यांना बळजबरीने रिक्षात डांबून जोगेश्वरीतील दत्त मंदिरामागे नेले.

पतीला जिवंत पाहायचे तर १५ हजार पाठवा

त्यानंतर त्यांच्याकडून १५ हजार उकळले, १० लाखांची पुन्हा मागणी आरोपींनी कदम यांच्याकडील २,८०० रुपये रोख आणि मोबाईल हिसकावून घेतला. त्यानंतर त्यांच्या मोबाईलवरून त्यांच्या पत्नीला फोन करून “पतीला जिवंत पाहायचे असेल तर १५ हजार रुपये पाठवा,” अशी धमकी दिली. भीतीपोटी पत्नीने १५ हजार रुपये ऑनलाइन पाठवले. पैसे मिळूनही आरोपींनी कदम यांना सोडले नाही. त्यांना वाळूजमार्गे रामराई तलावाजवळ नेऊन पुन्हा १० लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली.

अनिश बेंद्रे

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.आणखी वाचा