► वृत्तसंस्था वॉशिंग्टन डी. सी., तेहरान
अमेरिका आणि इराण यांच्यातील शस्त्रसंधी अकाली संपुष्टात आल्यानंतर दोन्ही देशांनी एकमेकांच्या स्थानांवर पुन्हा जोरदार हल्ला केला आहे. अमेरिकेने इराणच्या 90 महत्वाच्या स्थानांवर क्षेपणास्त्रे आणि युद्धविमाने यांच्या साहाय्याने हल्ला केला. या हल्ल्यांमध्ये इराणची राजधानी तेहरानच्या रेल्वेलाईनला लक्ष्य करण्यात आले.
ही रेल्वे लाईन तेहरानपासून इराणचे दिवंगत धार्मिक नेते आयातोल्ला खमेनेई यांच्या दफन स्थापानपर्यंत जाते. ही लाईन उडविण्यात आल्याने दफनविधीसाठी जाणाऱ्या नागरीकांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.
इराणने अमेरिकेच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर दिल्याचा दावा केला आहे. कुवेत आणि बहारीन दसेच दुबई येथील अमेरिकेच्या काही सैनिकी आस्थापनांवर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात अमेरिकेची रडार यंत्रणा आणि दूरसंचार यंत्रणा उध्वस्त करण्यात आली, असे इराणचे म्हणणे आहे. तथापि, अमेरिका आणि या आखाती देशांनी हा दावा फेटाळला आहे. इराणने डागलेली अनेक क्षेपणास्त्रे आणि ड्रोन्स आकाशातच निकामी करण्यात आली, असे या देशांचे म्हणणे आहे. इराणची अमेरिकेच्या हल्ल्यांमध्ये मात्र मोठी हानी झाली, असेही प्रतिपादन करण्यात आले.
समझोता हवा आहे, पण…
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी इराणला शांतता चर्चा हवी आहे, असे प्रतिपादन केले आहे. मात्र, शांतता करार झाला, तरी इराण तो पाळेलच यांची शाश्वती नाही. त्यामुळे अमेरिकेने शांतता चर्चा थांबविलाr असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. आम्ही चर्चा करण्यास नेहमीच सज्ज आहोत. पण इराणच्या नेत्यांची वर्तणूक पाहता चर्चा यशस्वी होईल असे वाटत नाही, अशी पुस्तीही त्यांची जोडली आहे.
इराणच्या 90 स्थानांवर हल्ले
अमेरिकेने गुरुवारी इराणच्या 90 सेना आस्थापनांवर विमान हल्ले केले आहेत. या हल्ल्यांमध्ये इराणची मोठी हानी झाल्याचे अमेरिकेने प्रतिपादन केले. होर्मोजगान प्रांताच्या कुहेस्तक या स्थानी अमेरिकेच्या हल्ल्यात मोठी आग लागली असून तेथील जनतेने पलायन केले आहे. अमेरिकेच्या हल्ल्यात 10 इराणी नागरीकांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत 20 सैनिकही मारले गेले आहेत. अमेरिकेने आमचे सैनिक मारल्याने आता आम्ही त्यांच्या एकाही सैनिकाला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी इराणने दिली आहे. यापुढे अमेरिकेशी चर्चा केली जाणार नाही, अशी घोषणा इराणचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्बास अराघची यांनी गुरुवारी केल्याने दोन्ही देशांमधील चर्चा आता पूर्णपणे ठप्प झाल्याचे दिसते, असे तज्ञांचे मत आहे.
भारतीय नौका माघारी
होर्मुझच्या सामुद्रधुनीत पुन्हा तणाव निर्माण झाल्याने भारताची तेलवाहक नौका माघारी फिरली आहे. ‘लीला वादीनार’ नामक ही नौका कुवेतमधून 20 लाख बॅरल कच्चे इंधन तेल घेऊन भारताकडे निघाली होती. तथापि, होर्मुझ सामुद्रधुनीत ते ओमानच्या नजीक पोहचल्यानंतर त्याच्यावर हल्ला होण्याची शक्यता वाढली. परिणामी, धोका टाळण्यासाठी नौकेला माघारी फिरविण्यात आले. आता ही नौका पुन्हा कुवैतच्या बंदरावर गेली असल्याची माहिती देण्यात आली आहे. सध्या भारताच्या आठ तेलवाहक नौका या सामुद्रधुनीत अडकल्याची माहिती दिली गेली.
