India- Pakistan Indus Water Treaty: पाकिस्तानात गंभीर होत चाललेल्या पाणीप्रश्नास जलवाटप कराराची स्थगिती – म्हणजे पर्यायाने भारत जबाबदार आहे, अशी आवई पाकिस्तान उठवत असले तरी त्याच देशाची पाण्याबाबतची नियोजनशून्यता त्याच्या मुळाशी आहे.
indus waters treaty(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
इतिहास आणि वर्तमान यांपासून काहीच शिकायचे नाही, असा विडाच जणू पाकिस्तानने उचललेला असावा. या देशाचा इतिहास विखारी भारतद्वेषाचा. हा इतिहास वर्तमानात देखील सातत्याने प्रकटत असतो. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात पाकिस्तानचे बगलबच्चे असलेल्या दहशतवाद्यांनी काश्मीरमधील पहलगाम येथे नृशंस हल्ला करून २६ पर्यटकांची हत्या केली. त्यानंतर भारताने तातडीने आक्रमक पावले टाकून उभय देशांदरम्यानचा सिंधू जलवाटप करार स्थगितीचे शस्त्र उपसले. या संदर्भात पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री आणि पर्यावरणमंत्री अशा दोन जबाबदार मंत्र्यांनी आगखाऊ विधाने नुकतीच केली. त्या पार्श्वभूमीवर, ‘सिंधू जलवाटप करार स्थगितच आहे आणि जोवर पाकिस्तान दहशतवादाला आश्रय देणे थांबवत नाही, तोवर तो स्थगितच राहील,’ असे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्त रणधीर जयस्वाल यांनी पाकिस्तानला ठणकावले.
सिंधू जलवाटप करार भारताने स्थगित करणे हा पाकिस्तानने स्वतः स्वतःच्या पायावर मारून घेतलेला धोंडा आहे. डोक्यावर कमालीचे कर्ज, आकाशाला भिडलेली महागाई, बलुचिस्तानातील चळवळ अशा समस्यांचा पाकिस्तान चारही बाजूंनी सामना करीत आहे.
शरीफ सरकारवर तेथील सामान्यांचा रोष उफाळून आलेला आहे. अशा स्थितीत मूळ समस्यांवरून सामान्यांचे लक्ष विचलित करण्यासाठी पाकिस्तानातील आजवरचे प्रत्येक सरकार जी क्लृप्ती वापरत आली तीच या सरकारने वापरली… भारतविरोध. दहशतवादाला सर्वंकष आश्रय देण्याचे थांबवणे दूरच, उलट सिंधू जलवाटप करारावरून त्या सरकारमधील मंत्र्यांनी भारतावर केलेली आगपाखड हा त्याचाच एक भाग.
एक उल्लेखनीय बाब म्हणजे दोन्ही देशांदरम्यान संवादाचा मार्ग पुन्हा खुला व्हावा, असे आवाहन दोन्ही देशांतील काही मान्यवरांनी नुकतेच केले. असा संवाद होऊच नये, असा एक कट्टर, विखारी मतप्रवाह पाकिस्तान सरकारात आहे. पाकिस्तानी मंत्र्यांच्या आगपाखडीमागे असा काही मतप्रवाह नसणारच, असे छातीठोकपणे सांगणे कठीण. असे नसेल तर ठीकच; पण जर असेल तर विखारी इतिहासाची पाने वर्तमानातही सतत उलगडत राहणारा पाकिस्तान यातून काहीही साध्य करू शकणार नाही, हे निश्चित.
किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.
शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा