नागपुरात एका खरात तब्बल 40 कोब्राची पिल्ले आढळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. पण सर्पमित्रांच्या तत्परतेने सर्व सापांच्या पिलांना पकडण्यात आलं आणि सुरक्षितस्थळी सोडण्यात आलं आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
नागपूर : नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील नेरला गावात एका घरातून तब्बल 40 कोब्रा सापांची पिल्ले आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. राजू ढोमने यांच्या घरात ही घटना घडली आहे. एकाच ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने कोब्रा सापांची पिल्ले आढळल्यामुळे काही काळ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, सर्पमित्र आणि वन विभागाच्या तत्परतेमुळे सर्व नागांची पिल्ले सुरक्षितपणे पकडून त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, पावसाळ्याच्या सुरुवातीमुळे बिळांमध्ये पाणी साचल्याने अनेक सर्प आणि इतर सरपटणारे प्राणी मानवी वस्त्यांकडे वळत आहेत. अशाच परिस्थितीत नेरला गावातील राजू ढोमने यांच्या घरात अचानक नागांची पिल्ले दिसू लागली. घराच्या एका भागात मोठ्या संख्येने पिल्ले असल्याचे लक्षात येताच कुटुंबीयांनी कोणताही धोका न पत्करता तातडीने सर्पमित्रांना याची माहिती दिली.
सर्पमित्रांना मोठं यश
घटनेची माहिती मिळताच चाचेर येथील ‘वाईल्ड चॅलेंजर ऑर्गनायझेशन’चे सर्पमित्र तथा प्राणीमित्र रतन कुंभरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. घरामध्ये एकाच ठिकाणी मोठ्या संख्येने नागांची पिल्ले असल्याने बचाव मोहीम अत्यंत सावधगिरीने राबवावी लागली. कोणत्याही सापाला किंवा नागरिकांना इजा न होता सर्व 40 कोब्रांची पिल्ले सुरक्षितपणे पकडण्यात पथकाला यश आले.
वन विभागाकडून घटनेचा पंचनामा
यानंतर संपूर्ण घटनेची माहिती रामटेक वन विभागाला देण्यात आली. सहाय्यक वनसंरक्षक (एसीएफ) गोविंद कुमार लूचे आणि रेंज ऑफिसर राहुल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पंचनामा केला. वन्यजीव संरक्षणाच्या नियमांचे पालन करत सर्व कोब्रांची पिल्ले सुरक्षितपणे त्यांच्या नैसर्गिक अधिवासातील जंगलात सोडण्यात आली. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.
सर्पमित्रांचं मोलाचं आवाहन
पावसाळ्यात साप मानवी वस्तीत आढळण्याच्या घटना वाढतात. अशा वेळी घाबरून जाऊन सापाला मारण्याचा किंवा स्वतः पकडण्याचा प्रयत्न करणे धोकादायक ठरू शकते. प्रशिक्षित सर्पमित्र किंवा वन विभागाशी तात्काळ संपर्क साधल्यास सापांनाही इजा होत नाही आणि नागरिकांचीही सुरक्षितता कायम राहते. तसेच, सर्पदंश झाल्यास कोणतेही घरगुती उपाय किंवा अंधश्रद्धेचा आधार न घेता तातडीने जवळच्या शासकीय अथवा मान्यताप्राप्त रुग्णालयात उपचारासाठी जावे, असे आवाहनही सर्पमित्रांनी केले आहे.
वन विभागाचे महत्त्वाचं आवाहन
सहाय्यक वनसंरक्षक (एसीएफ) गोविंद कुमार लूचे यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली. “आज सर्पमित्रांनी चांगलं काम केलं आहे. त्यांनी 40 नागाची पिल्ले रेस्क्यू करुन आणली आहे. ही सर्व पिल्ले आम्ही नैसर्गिक आधिवासात सोडत आहोत. सर्व नागरिकांना विनंती आहे की, पावसाळा सुरु झालेला आहे. सापांच्या बिळात पाणी जातं. त्यामुळे ते बाहेर निघतात. साप हा शेतकऱ्यांचाच मित्र आहे. कारण साप उंदीर आणि किडे खातो. त्यामुळे आपण त्यांना मारु नका. आपल्या परिसरात साप आढळल्यास वन विभागाला किंवा सर्पमित्राला माहिती कळवावी”, असं आवाहन वन विभागाचे अधिकारी गोविंद कुमार लूचे यांनी केलं आहे.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा