Headlines

Heavy rainfall alert issued for mumbai and four districts orange alert in pune; पावसाचे पुन्हा कमबॅक! मुंबईसह चार जिल्ह्यांमध्ये मुसळधार कोसळणार; हवामान खात्याचा इशारा


म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: महामुंबई परिसरात गुरुवारपासून पावसाचा जोर थोडा वाढू शकेल, असा अंदाज असताना मुंबईमध्ये सोमवारी रात्रीपासूनच पाऊस वाढायला सुरुवात झाली. महामुंबई परिसरात मंगळवारी दिवसभर पावसाची उपस्थिती होती. त्यामुळे काही रस्त्यांवर पाणी साचलेले दिसून आले. याचा परिणाम मुंबईच्या रस्ते व रेल्वे वाहतुकीवर झाला.

मुंबईत कुलाबा येथे मंगळवारी स. ८.३०पर्यंतच्या २४ तासांमध्ये १४ मिलीमीटर, तर सांताक्रूझ येथे २०.८ मिमी पावसाची नोंद झाली. यामुळे सांताक्रूझ येथे २००० मिमी पावसाचा टप्पा ओलांडला, तर कुलाबा येथे १६७५.८ मिमी पावसाची आत्तापर्यंत नोंद झाली आहे. रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने मंगळवारी दिवसभरात फारशी उसंत घेतली नाही. सांताक्रूझ येथे स. ८.३० ते सायं. ५.३०पर्यंत ४३.८ मिमी, तर कुलाबा येथे २४.४ मिमी पावसाची नोंद झाली. यामुळे तापमानात घट झाली. सांताक्रूझ येथे २७.१ तर, कुलाबा येथे २७.६ अंश से. कमाल तापमान होते.

सध्या मध्य आणि लगतच्या उत्तर द्वीपकल्पीय भारतावरून, समुद्रसपाटीपासून ३.१ ते ७.६ किमी उंचीवर शिअर झोन (विरुद्ध दिशेने वाहणारे वारे) कायम आहे, हा पट्टा उंचीनुसार दक्षिणेकडे झुकलेला आहे. मान्सून ट्रफ आता बिकानेर, वायव्य मध्य प्रदेश व लगतच्या भागातील कमी दाबाचे क्षेत्र, सीधी, रांची आणि दिघा यांतून जात आग्नेयेकडे पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारले आहे. वायव्य मध्य प्रदेश आणि लगतच्या भागातील कमी दाबाचे क्षेत्र मंगळवारी सकाळी ०८.३० वाजता त्याच भागात कायम होते. संबंधित चक्राकार वाऱ्यांची स्थिती समुद्रसपाटीपासून ५.८ किमी उंचीपर्यंत विस्तारलेली असून, ती उंचीनुसार दक्षिणेकडे झुकलेली आहे. यांच्या संयुक्त परिणामामुळे महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाचे वातावरण आहे. महामुंबईच्या काही भागांसह पुणे, सातारा घाट परिसरात मंगळवारी दिवसभर पावसाची संततधार होती.

आजही जोरदार हजेरी

मुंबईसह, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये तुरळक ठिकाणी बुधवारी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. पुणे घाट परिसराला बुधवारी ‘ऑरेंज ॲलर्ट’ आहे.