Gold-Silver Rate Today August 3, 2026: गेल्या काही महिन्यांत अमेरिकन डॉलरची वाढती ताकद आणि ट्रेझरी बाँड यील्ड्समधील वाढीमुळे सोने आणि चांदीच्या तेजीला खीळ बसली. तसेच मध्यपूर्वेत अमेरिका-इराण यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर सोन्या-चांदीच्या किंमतीत प्रचंड चढउतार झाले ज्यामुळे सर्वसामान्यांची धाकधूक वाढली असून आता सणासुदीच्या दिवसांत सोनं-चांदी खरेदी करणं फायदेशीर ठरणार की नाही? असा प्रश्न लोकांना पडला आहे.

इराणवरील हल्ल्याला डोनाल्ड ट्रम्प यांचा ब्रेक
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी MCX वर सोमवारी सकाळी व्यवहार सुरू होण्याआधी इराणवरील नवीन लष्करी हल्ला सध्यापुरता स्थगित केला असून, लवकरच अणुकरार घडवून आणण्याच्या प्रयत्नांवर लक्ष केंद्रित केले. अशाप्रकारे, ट्रम्प यांच्या निर्णयानंतर सोमवारी आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात लक्षणीय वाढ झाली असून ट्रम्प यांनी अणुकराराबद्दल विधान करताच कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण झाली, ज्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये पुन्हा हालचाल वाढली.
सोन्या-चांदीचा आजचा दर काय
सोने आणि चांदीच्या किमतीत जानेवारीच्या शेवटच्या दिवसापासून मोठी अस्थिरता दिसून आली आहे. गेल्या सहा महिन्यांत सोन्याचा भाव उच्चांकावरून अंदाजे 40 रुपयांनी उताराला आहे तर, चांदीची चकाकीही ऑल-टाइम हायवरून तब्बल दोन लाखांनी कमी झाली आहे. अशा स्थितीत, गुंतवणूकदारांची धडधड वाढली तर खरेदीदरांमध्ये योग्य वेळेबाबत संभ्रम पाहायला मिळत आहे.
यादरम्यान, सोमवार (3 ऑगस्ट रोजी) सकाळी कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल 5 डॉलरपेक्षा जास्त घसरल्या आणि क्रूडचा भाव कमी झाल्यामुळे महागाईबद्दल बाजारातील चिंता कमी झाली, ज्याचा परिणाम सोन्याच्या किमतींवरही झाला. MCX वर सकाळी 9.15 वाजता सोन्याचा वायदा दर 0.13 टक्के किंचित वाढीसह 1.43 लाखांवर स्थिर राहिला तर, चांदीच्या फ्युचर्स किमती 0.42 टक्के वाढून 2.17 लाख रुपयांच्या आसपास व्यवहार करत आहे.
31 जुलैची डेडलाइन चुकली, आता इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करायला 5000 रुपयांचा दंड बसणार; कोणाला मोफत भरता येणार?
दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट गोल्डची किंमत 4,067.06 डॉलरपर्यंत वाढली. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत लवकरच करार होण्याची आशा व्यक्त केली आणि नवीन हल्ला पुढे ढकलला. यामुळे महागाई आणि उच्च व्याजदरांविषयीची चिंता काही प्रमाणात कमी झाली ज्यामुळे सोन्याच्या दरवाढीला बळ मिळाले.
सोन्यावर अजूनही दबाव का?
अमेरिका आणि इराण संघर्ष सुरू झाल्यापासून दोन्ही मौल्यवान धातूंवर दबाव राहिला आहे. युद्धामुळे महागाई वाढण्याची भीती निर्माण झाली. महागाई वाढल्यास जगातील प्रमुख मध्यवर्ती बँकांना व्याजदर वाढ करणे भाग पडेल. सोन्याला पारंपरिकरित्या महागाईच्या विरोधात सुरक्षित गुंतवणूक मानले जाते, पण व्याजदर उच्च असताना सोन्याचे आकर्षण कमी होते कारण त्यावर कोणतेही व्याज मिळत नाही.

