Commodity Market Prediction: पश्चिम आशियातील युद्धामुळे तेलाच्या किंमतीवर थेट परिणाम झाला आहे, तर दुसरीकडे या जागतिक संकटातही सोन्या-चांदीच्या दरात घसरगुंडी सुरूच राहिली. जानेवारी महिन्यातील उच्चांकावरून आता सोन्याची किंमत 36000 रुपयांपेक्षा जास्त घसरली आहे तर, आता साल 2026 मधील उर्वरित महिन्यात सोन्याची किंमत वाढणार की घसरणार याबाबत महत्त्वाचा अहवाल समोर आला आहे.

सोन्याच्या दरात घसरगुंडी, चांदीची बिकट अवस्था
आता परिस्थिती अशी झाली आहे की जानेवारीपासून सोन्याच्या किमतीत 36000 रुपयांपेक्षा जास्त घसरण झाली तर, चांदीची स्थिती त्याहूनही वाईट आहे. चांदीचा भाव आतापर्यंतच्या उच्चांकावरून 2 लाख रुपयांनी स्वस्त झाला आहे. या दरम्यान, सोने खरेदीदारांसाठी एक दिलासादायक बातमी आहे.
सोन्याची किंमत आणखी वाढणार की घसरणार?
तुम्हालाही यावर्षी सोने खरेदी करायचे असेल आणि यंदा दर वाढणार की घसरणार, या संभ्रमात असाल तर अलीकडेच जारी झालेल्या अहवालातून दिलासा मिळेल. या वर्षी सोन्याच्या किमतीत लक्षणीय वाढ होणार नाही, असे ताज्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.
सोन्याच्या किमतीचा अंदाज
सोन्याच्या दराला उतरती कळा लागली असून यादरम्यान किंचित रिकव्हरीही होताना दिसत असली तरी Gold Rate जानेवारी 2026 मधील आतापर्यंतच्या उच्चांकीपर्यंत पुन्हा झेप घेतील याची शक्यता कमी आहे. आंतरराष्ट्रीय बाजारावर लक्ष ठेवणाऱ्या फिच सोल्युशन्सच्या संशोधन विभाग, BMI ने आपल्या ताज्या अहवालात सोन्याच्या किमतींबद्दल धाडसी दावा केला आणि म्हटले की, 2026 मध्ये सोन्याच्या किमतीत लक्षणीय वाढ होण्याची शक्यता नाही. BMI ने सोन्याच्या सरासरी किमतीचा आपला अंदाजही 4600 डॉलरवरून 4400 डॉलरपर्यंत कमी केला आहे.
सोन्याची किंमत घसरणीचे कारण काय
जागतिक बाजारात सध्या सोन्याची किंमत 4,037.33 डॉलर्सच्या आसपास व्यवहार करत आहे. अहवालात सोन्याच्या किमतीत मागील किमतीपेक्षा 9% पर्यंत दरवाढीचा अंदाज वर्तवला गेला आहे, पण लक्षणीय वाढ होण्याची शक्यता कमी असून BMI ने मजबूत डॉलर, व्याज दरवाढ, भू-राजकीय तणावाची भीती, महागाई व मागणी आणि सुधारत्या जागतिक अर्थव्यवस्था ही करणे देऊन यावर्षी सोन्याच्या किमतीतील सुस्तीची शक्यता वर्तवली.
2026 मध्ये सोने स्वस्त होणार?
मात्र, लक्षात घ्या की सोन्याच्या किमतीत मोठी घसरण होईल, असा या अहवालातून अर्थ काढणेही चुकीचे ठरेल. जगभरातील मध्यवर्ती बँकांकडून सातत्यपूर्ण खरेदी किमतीला आधार देत असून चीन, पोलंड आणि भारतासह अनेक देशांमधील मध्यवर्ती बँका आपला राखीव निधी वाढवण्यासाठी सातत्याने सोन्याची खरेदी करत आहेत.
चांदी 2 लाख रुपयांनी स्वस्त झाली
गुरुवारी MCX वर दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतीत घसरणीचा कल कायम राहिला, विशेषतः चांदीच्या किमतीत लक्षणीय घट झाली आणि उच्चांकावरून जवळपास 2 लाख रुपये किलोनी स्वस्त झाली. सध्या MCX वर चांदी 2.19 लाख रुपये किलोच्या आसपास आहे, जी जानेवारी महिन्यात 4,20,048 रुपयांवर पोहोचलेली.
(Disclaimer : सोन्या-चांदीमधील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते, तुम्ही सोने किंवा चांदीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर आधी तुमच्या भरवशाच्या आर्थिक तज्ञाचा सल्ला अवश्य घ्या.)

