Gold Rate Correction: सोन्याच्या किमती घसरणपंथीला आल्या आहेत. MCX असो वा सराफा बाजार, सर्वत्र सोन्याच्या किमतीत घसरण थांबायचं नाव घेत नाही. सोन्याच्या किमतीत सतत घट होत असूनही भारतीय बाजारात खरेदी वाढत नाही. एप्रिल ते जून 2026 दरम्यान सोन्याची मागणी 70% हून जास्त कमी झाली आहे.

सोन्याच्या किमती घसरणपंथीला
अख्ख्या जून महिन्यात सोन्याची किमतीत 15 हजार रुपयांनी घसरण झाल्यावर जुलैच्या दोन दिवसात काहीशी रिकव्हरी होताना दिसत आहे. 1 जुलै रोजी सोने 1900 तर, चांदीच्या किमतीत 6000 रुपयांनी वाढ झाली. फेब्रुवारी ते जून 2026 दरम्यान 24 कॅरेट सोन्याचा भाव तब्बल 36000 रुपायांनी उतरला, जो 29 जानेवारी रोजी 1.76 लाख रुपये 10 ग्रॅमच्या उच्चांकावर होता. आता 2 जुलै रोजी सोन्याची किंमत 1.44 लाखांवर व्यवहार करत असली तरीही सोन्याच्या खरेदीत वाढ झालेली नाही.
सोने स्वस्त तरीही खरेदी फिकी का?
सोन्याच्या दरात घट होऊनही खरेदीत वाढ झालेली नाही. IBJA च्या अहवालानुसार गेल्या तीन महिन्यात सोन्याची मागणी 70 टक्क्यांनी कमी झाली आहे. आयात शुल्कात वाढ झाल्यापासून देशांतर्गत बाजारातील मागणी मंदावल्याचा अंदाज आहे. 13 मे रोजी सरकारने सोन्यावरील आयात शुल्क 6% वरून 15% पर्यंत वाढवलेले, ज्याचे विपरीत परिणाम सोन्याच्या खरेदीवर दिसून आला.
पंतप्रधान मोदींकडून सोने न खरेदी करण्याचे आवाहन
पण आयात शुल्क वाढ करण्याआधी पंतप्रधान मोदींनी देशवासियांना सोने न खरेदी करण्याचे आवाहन केले होते. पंतप्रधानांच्या या आवाहनाचा परिणाम दिसून आला आणि लोक नवीन सोनं खरेदी करण्याऐवजी जुनं सोने विकू लागले. तसेच सरकारने आयात शुल्क वाढवल्यानंतर लोक नवीन सोने खरेदी करण्याबाबत सावधगिरी बाळगताना दिसत आहेत. एप्रिल-जून 2026 मध्ये भारतीयांनी सुमारे 50 टन जुने सोने विकून कॅश मिळवला तर, सोन्याचे भाव आणखी खाली येतील अशी लोकांना भीती वाटत आहे.
सोन्याची किंमत 4000 डॉलर खाली
आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या भारतीय मार्केटच्या तुलनेने सध्या स्वस्त सोने मिळत असून अमेरिकी बाजारात सोन्याचा भाव 4,000 डॉलर्सच्या आसपास व्यवहार करत आहे. 1 जुलै रोजी सोन्याची किंमत 3,987.48 डॉलरपर्यंत उतरलेली, पण गुरुवारी (2 जुलै) रोजी पुन्हा 4000 डॉलर प्रति औंसवर उसळली. मध्य पूर्वेतील तणाव आणि अमेरिकेतील उच्च व्याजदरांच्या अपेक्षेमुळे सोन्याला घसरणीचे डोहाळे लागले आहे.
मागणीतील घसरणीचा काय परिणाम होईल?
सोन्याच्या मागणीत घट झाल्यामुळे एकीकडे सरकारच्या तिजोरीवरील भार हलका होऊन परकीय चलन साठ्याची बचत होत असली तरीही, लाखो सराफांना नुकसान सहन करावं लागत आहे. देशांतर्गत सराफा बाजार दबावाखाली आले असून सोन्याच्या मागणीतील प्रचंड घसरणीमुळे लाखो लोकांच्या रोजगाराला धोका निर्माण झाला आहे, छोटे कामगार विशेषतः चिंतेत सापडले असताना लहान-मोठे सर्व सराफांची धाकधूक वाढत आहे.
2026 मध्ये किती स्वस्त झालं सोनं
देशांतर्गत फ्युचर्स बाजार, MCX वर, सोन्याची किंमत उच्चांकावरून 50,000 रुपयांनी स्वस्त झाली आहे. वर्षाच्या सुरुवातीला जानेवारी महिन्यात सोन्याचा भाव 1,92,991 रुपये 10 ग्रॅमवर उसळला होता, जो आता घसरणीसह 1.44 लाखांच्या आसपास व्यवहार करत आहे. दुसरीकडे, जागतिक बाजारात सोन्याचा दर सात महिन्याच्या नीचांकीवर कमी झाला आहे. सध्या देशांतर्गत बाजारात 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,38,876 रुपये प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोने 1,27,772 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 1,08,576 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली आहे.
सोन्याचा दर आणखी कमी होणार?
सध्या जागतिक बाजार अमेरिकेच्या मध्यवर्ती बँक, फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर धोरणावर बारकाईने लक्ष ठेवून आहे. गुंतवणूकदारांना यावर्षी व्याजदर वाढण्याची अपेक्षा आहे, पण अलीकडच्या फेड अध्यक्षांच्या विधानानंतर व्याजदर वाढीची अपेक्षा कमी झाली परिणामी भविष्यात किमती वाढण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे सध्या सध्या यूएस डॉलर इंडेक्स मजबूत असून ट्रेझरी यील्ड्ससुद्धा उच्च पातळीवर आहे आणि ही परिस्थिती पुढील काही दिवस कायम राहण्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
सोने-चांदीच्या गुंतवणूकदारांचा अजूनही खरेदीला थांबा
सोने आणि चांदीच्या दरात गेल्या काही दिवसांपासून चढ-उतार होत असून आता खरेदी करावी की थांबावे? हा प्रश्न प्रत्येक गुंतवणूकदाराच्या मनात घोंघावत आहे. सध्याच्या अस्थिर बाजारात घाई न करता सोने आणि चांदीत नफा कमवण्याच्या उद्देशाने हुशारीने निर्णय घ्यावा असे बाजार तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

