Success Story of Gaurav Mehta: जयपूरचे रहिवासी गौरव मेहता यांनी आपल्या मालकीची गाडी विकून 30 लाखांमध्ये भारतातील पहिला-वहिला कस्टमाइज्ड घड्याळांचा व्यवसाय सुरू केला. हा ब्रँड 40 हून अधिक देशांमध्ये विस्तारला असून दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा महसूल कमावतो.

छंदाचे व्यवसायात रूपांतर
व्यवसायाच्या सुरुवातीला मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागला आणि त्यावेळी, भारतातील उच्च श्रेणीच्या घड्याळांच्या बाजारात परदेशी कंपन्यांचे वर्चस्व होते. याशिवाय भारतीय घड्याळे परदेशी ब्रँड्सइतकी चांगली नसतात, असाही एक समज होता, पण तरीही गौरव यांनी आपल्या छंदाचे व्यवसायात रूपांतर करण्याचा निर्धार केला.
गाडी विकून 30 लाख रुपये व्यवसायांत गुंतवले
2013 मध्ये गौरव यांनी व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्या गॅरेजमधील गाडी विकून 30 लाख रुपये उभे केले. गौरव यांनी आपली BNW कार विकली आणि मित्रांकडून पैसे उसने घेतले. सुरुवातीला घड्याळ बनवण्याची कला समजून घेण्यासाठी त्याने नाणे तज्ञ आणि घड्याळ निर्मात्यांसोबत काम करून सखोल संशोधन केले.
फेसबुकवर झालेली पहिली विक्री
2013 मध्ये गौरवने जयपूर वॉच कंपनीच्या नावे फेसबुक पेज तयार केले आणि सशुल्क जाहिरात चालवायला सुरुवात केली. दिल्लीतील एका ग्राहकाने घड्याळे न पाहताच 2 घड्याळे खरेदी केली बुक केली, ज्यामुळे गौरवला मोठे प्रोत्साहन मिळाले.
23000 रुपयांचे कलेक्शन विकले
त्यानंतर, मुंबईतील एका बड्या कलेक्टिबल्स वस्तूंच्या दुकानाने जयपूर वॉच कंपनीने बनवलेली घड्याळे विकायला सुरुवात केली आणि पहिल्याच महिन्यात अंदाजे 23000 रुपयांचा पहिले कलेक्शन विकले. त्यानंतर ताज आणि ओबेरॉय ग्रुपच्या काही हॉटेल्समध्ये घड्याळे विकणे सुरू केले. 2015 मध्ये बेंगळुरूमध्ये एक उत्पादन युनिट उभारण्यासाठी अंदाजे 1.2 कोटींची गुंतवणूक केली, जी 2017 मध्ये नफ्यात आली.
जयपूर वॉच कंपनीच्या घडाळ्यांचे वैशिष्ट्य
जुनी नाणी, हाताने रंगवलेली चित्रे, टपालाची तिकिटे, देव-देवतांच्या प्रतिमा, सुलेखन आणि मौल्यवान खड्यांनी सजवलेल्या डायल अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वैशिष्ट्यपूर्ण डिझाइनसाठी जयपूर वॉच कंपनीची उत्पादने ओळखली जातात.
जयपूर वॉच कंपन्यांच्या घडाळ्यांची किमती किती
या घडाळ्यांची किंमत अंदाजे 15,000 रुपये ते 24 लाख रुपयांपर्यंत असून 24 लाखांचे घड्याळ एका विशेष ग्राहकासाठी बनवलेले, ज्यामध्ये सोने आणि हिऱ्यांपासून फुलासारखी रचना तयार केली गेलेली. कंपनीने किंग जॉर्ज सहावे यांच्या जुन्या नाण्यांचा वापर करून 35 घड्याळांचा संग्रह देखील तयार केला तर, जयपूरचे महाराजा सवाई मानसिंग दुसरे यांच्या जुन्या नाण्यांपासून 50 घड्याळांचे कलेक्शन बनवले आहे.
पंतप्रधान मोदींच्या मनगटावर झळकले घड्याळ
2025 च्या अखेरीस गौरवच्या व्यवसायात आणखी एक महत्त्वाचा टप्पा आला. यावेळी, पंतप्रधानांच्या मनगटावर जयपूर वॉच कंपनीचे घड्याळ प्रसार माध्यमांमध्ये झळकले. सुरुवातीला गौरवला विश्वास बनला नाही, पण त्यानंतर टीमने अधिकृत फोटो तपासले आणि पंतप्रधानांच्या मनगटावर त्यांच्याच ब्रँडचे घड्याळ असल्याचे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे ही कोणतीही सशुल्क जाहिरात मोहीम, सेलिब्रिटींची जाहिरात किंवा जनसंपर्क मोहीम नव्हती पण त्यानंतर, कंपनीची ऑनलाइन मागणी झपाट्याने वाढली आणि पहिल्यांदाच ऑनलाइन विक्रीने ऑफलाइन किरकोळ विक्रीला मागे टाकले.
40 हून जास्त देशांमध्ये विस्तारलाय व्यवसाय
कंपनीच्या व्यवसायापैकी सुमारे 70% व्यवसाय ऑनलाइन विक्रीतून होतो, तर स्वित्झर्लंड आणि जपानसह 40 हून अधिक देशांमधून कंपनीला ऑर्डर्स मिळतात. कंपनीने गेल्या वर्षी सुमारे 25 कोटींचा महसूल नोंदवला असून यावर्षी 75 ते सुमारे 80 कोटी रुपये महसूल मिळवण्याचे उद्दिष्ट आहे.

