फॅटी लिव्हरप्रमाणेच ‘फॅटी पॅनक्रियाज’ हा देखील वाढता पण दुर्लक्षित आजार आहे. स्वादुपिंडात जास्त चरबी साचल्यामुळे इन्सुलिनची निर्मिती कमी होऊन टाईप २ मधुमेह, पॅनक्रियाटायटिस आणि स्वादुपिंडाच्या कर्करोगाचा धोका वाढू शकतो. या समस्येची कारणे, सुरुवातीची लक्षणे, निदान, कोणाला जास्त धोका असतो आणि योग्य आहार-व्यायामाच्या मदतीने यापासून बचाव कसा करता येतो, याविषयी जाणून घ्या.

‘फॅटी पॅनक्रियाज’ म्हणजे काय आणि ते का चिंतेची बाब आहे?
स्वादुपिंड हा आपल्या पोटाच्या वरच्या भागात आणि जठराच्या मागे असलेला एक अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे. तो अन्न पचवण्यासाठी लागणारे पाचक रस आणि रक्तातील साखर नियंत्रित करणारे ‘इन्सुलिन’ नावाचे संप्रेरक तयार करतो.
- कार्यात अडथळा : वयानुसार स्वादुपिंडात थोड्या प्रमाणात चरबी साचणे सामान्य आहे, परंतु प्रमाणाबाहेर साचलेली चरबी या अवयवाच्या नेहमीच्या कार्यात अडथळा आणते.
- मधुमेहाचा धोका (Type 2 Diabetes) : अतिरिक्त चरबीमुळे इन्सुलिन तयार करणाऱ्या पेशींचे नुकसान होते. यामुळे शरीरात इन्सुलिनची निर्मिती घटते आणि इन्सुलिन रेझिस्टन्स (Insulin Resistance) वाढून टाईप २ मधुमेह होतो.
- इतर आजारांचे संकेत : फॅटी पॅनक्रियाज ही समस्या सहसा लठ्ठपणा, फॅटी लिव्हर, मेटाबॉलिक सिंड्रोम आणि हृदयविकारांसोबत दिसून येते, ज्यामुळे शरीराच्या एकूणच चयापचय क्रियेवर प्रतिकूल परिणाम होतो.
फॅटी पॅनक्रियाजचा धोका कोणाला सर्वाधिक असतो?
काही घटक आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे स्वादुपिंडात चरबी साचण्याचा धोका वाढतो:
- लठ्ठपणा आणि वजन : अतिवजन, पोटावर अतिरिक्त चरबी असणे.
- चयापचयाशी संबंधित आजार : टाईप २ मधुमेह, प्री-डायबिटीज, उच्च रक्तदाब, तसेच रक्तातील कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइड्सची पातळी जास्त असणे.
- चुकीची जीवनशैली : शारीरिक हालचालींचा अभाव (Sedentary Lifestyle), जंक फूड, साखरेची पेये आणि सॅच्युरेटेड फॅट्सचा अतिवापर.
- व्यसन आणि वय : धुम्रपान करणे, अति-मद्यपान आणि वाढते वय.
- फॅटी लिव्हरचे रुग्ण : ज्यांना ‘नाफ्लड’ (NAFLD – Non-Alcoholic Fatty Liver Disease) आहे, त्यांना फॅटी पॅनक्रियाज होण्याचा धोका खूप जास्त असतो.
लक्षणे आणि निदान
लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. सुरुवातीच्या काळात फॅटी पॅनक्रियाज अत्यंत सुप्त असतो. परंतु, स्वादुपिंडाचे कार्य मंदावल्यावर खालील लक्षणे दिसू शकतात.
- पोटाच्या वरच्या भागात सतत किंवा अचानक वेदना होणे.
- जेवणानंतर मळमळणे किंवा उलट्या होणे.
- कोणत्याही कारणाशिवाय अचानक वजन कमी होणे
- शौच कडक होतो
फॅटी पॅनक्रियाजपासून बचाव कसा करावा?
आनंदाची बाब म्हणजे फॅटी पॅनक्रियाजचा थेट संबंध आपल्या जीवनशैलीशी आहे. त्यामुळे योग्य सवयी लावून यावर नियंत्रण मिळवणे किंवा ते पूर्णपणे पूर्ववत करणे शक्य आहे:
- वजन नियंत्रण : शरीराचे वजन नियंत्रित ठेवा. तुमचे ५ ते १० टक्के वजन कमी केल्यास अवयवांवरील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मोठी मदत होते.
- नियमित व्यायाम : आठवड्यातून किमान १५० मिनिटे मध्यम स्वरूपाचा शारीरिक व्यायाम किंवा जलद चालणे आवश्यक आहे.
- पोषक आहार : आहारात फळे, भाज्या, धान्य, प्रथिने (Lean Proteins) आणि हेल्दी फॅट्सचा समावेश करा. प्रक्रिया केलेले अन्न (Processed Food), गोड पदार्थ आणि रिफाइंड कार्ब्स कमी करा.
- व्यसनमुक्ती : धुम्रपान आणि मद्यपान पूर्णपणे सोडा.
निदान कसे केले जाते?
फॅटी पॅनक्रियाज ओळखण्यासाठी कोणतीही थेट रक्ततपासणी उपलब्ध नाही. बहुतांश वेळा इतर आजारांच्या तपासणीसाठी जेव्हा इमेजिंग टेस्ट केल्या जातात, तेव्हा याचे निदान होते.
- इमेजिंग टेस्ट : सोनोग्राफी, सीटी स्कॅन, एमआरआय किंवा एंडोस्कोपिक अल्ट्रासाऊंड.
- रक्ततपासणी : रक्तातील साखर, कोलेस्ट्रॉल, यकृताची कार्यक्षमता आणि पॅनक्रियाटिक एन्झाईम्स तपासण्यासाठी ब्लड टेस्ट केल्या जातात.
डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?
जर तुम्हाला पोटाच्या वरच्या भागात सतत वेदना होत असतील, पचनाचा त्रास होत असेल, अकारण वजन घटत असेल किंवा रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवणे कठीण जात असेल, तर त्वरित तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. विशेषतः ज्यांना लठ्ठपणा, मधुमेह किंवा फॅटी लिव्हरचा त्रास आहे, त्यांनी वेळोवेळी आरोग्य तपासणी करून घेणे गरजेचे आहे.
‘फॅटी पॅनक्रियाज’ ही एक अशी आरोग्य समस्या आहे ज्याकडे आता गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. सुरुवातीला लक्षणे नसली तरी दीर्घकाळात यामुळे मधुमेह, पॅनक्रियाटायटिस आणि स्वादुपिंडाच्या कर्करोगाचा धोका निर्माण होऊ शकतो. संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि वजनावर नियंत्रण ठेवून तुम्ही तुमच्या स्वादुपिंडाचे आरोग्य उत्तम राखू शकता आणि भविष्यातील गंभीर आजारांपासून स्वतःचा बचाव करू शकता!
आम्ही या लेखाचे पुनरावलोकन कसे केले
आमची टीम आरोग्य आणि वेलनेसविषयी सतत नवे व उपयुक्त लेख तयार करते. प्रत्येक लेख वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्याने लिहिला जातो, त्यामुळे दिलेली माहिती विश्वासार्ह आणि अचूक असते.
- नवीन आवृत्ती
- Aug 03, 2026, 03:40 PMMedically Reviewed byDr. Dr Sonali Gautam
- Aug 03, 2026, 03:40 PMWritten byप्रतीक्षा सुनील मोरेमहाराष्ट्रटाइम्स.कॉम
