Headlines

Eknath Shinde talks on Mumbai Mayor deal with Devendra Fadnavis; शिवसेनेला मुंबईचं महापौरपद कधी? शिंदेंनी आतली बातमी सांगितली; म्हणाले, फडणवीसांशी पाचपैकी सव्वा वर्षाबाबत चर्चा


Shiv Sena BJP Mumbai Mayor : सध्या भाजपकडे मुंबईचे महापौरपद असल्याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारले असता, भाजप व आमच्यात यापूर्वीच चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.

Eknath Shinde Devendra Fadnavis Maharashtra Times (6)
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : अडीच वर्षांनंतर मुंबई महापालिकेचे महापौरपद सव्वा वर्षासाठी शिवसेनेकडे असेल, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी स्पष्ट केले. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आधीच चर्चा करुन हा निर्णय घेतल्याचेही शिंदे यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी नंदनवन निवासस्थानी गुरुवारी मुंबई महापालिका पत्रकारांशी विविध मुद्द्यांवर संवाद साधला. या वेळी त्यांनी महापौरपदाबाबत माहिती दिली. सध्या भाजपकडे मुंबईचे महापौरपद असल्याबाबत उपमुख्यमंत्र्यांना विचारले असता, भाजप व आमच्यात यापूर्वीच चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.

अडीच वर्षांनंतर पुढील सव्वा वर्ष शिवसेनेचा महापौर असेल, असे त्यांनी स्पष्ट केले. सध्या महापौरपद अडीच वर्ष भाजपकडे असून, पुढील अडीच वर्षापैकी सव्वा वर्ष महापौरपद शिवसेनेला आणि त्यानंतरचे सव्वा वर्ष पद भाजपकडे असणार आहे.

खड्डे बुजवण्यासाठी ४० ते ४२ कोटी

मुंबईतील विविध नागरी प्रश्न सोडवण्यासाठी मुंबई महापालिका आणि सत्ताधारी कटिबद्ध असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. मुंबईतील रस्ते काँक्रीटीकरणाची कामे वेगाने पूर्ण होत असून, त्यामुळे खड्ड्यांचे प्रमाण आणि त्यावरील खर्चही कमी झाल्याचा दावा शिंदे यांनी केला. ‘पूर्वी दरवर्षी ४०० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च खड्डे बुजवण्यासाठी व्हायचा. आता हाच खर्च ४० ते ४२ कोटी रुपयांवर आला आहे’, असे शिंदे यांनी सांगितले. पुढील वर्षात मुंबईतील सर्व रस्ते काँक्रीटीकरण होऊन खड्डेमुक्त होतील, असेही त्यांनी सांगितले.

Maharashtra TimesMumbai News : भांडुपमध्ये दहाव्या मजल्यावरुन नवविवाहिता पडली, पण झाडावर अडकून बचावली; मांडीत फांदी घुसली, फायर ब्रिगेडने कौशल्याने उतरवलं

गिरणी कामगारांनाही मुंबईत मोठ्या प्रमाणात घरे

मुंबईतील जुन्या इमारती व झोपड्यांच्या पुनर्विकासावर आम्ही लक्ष केंद्रीत केले आहे. गिरणी कामगारांनाही मुंबईत मोठ्या प्रमाणात घरे उपलब्ध होणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. मुंबईत सांडपाण्यावर प्रक्रिया करून अन्य वापरासाठी पाणी वापरण्याचा प्रकल्पही गतीने होत असल्याचे ते म्हणाले. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे, मुंबई महापालिका गटनेते अमेय घोले उपस्थित होते.

रेसकोर्सच्या भागाला ‘किनारा’लगत जोडणी

महालक्ष्मी रेसकोर्सचा काही भाग मुंबई सागरी किनारा मार्गाच्या मोकळ्या जागांशी जोडण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याचे शिंदे यांनी सांगितले. नेव्हिल डिसोझा फुटबॉल मैदानाच्या वापराबद्दल त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. या मैदानाचे क्रिडांगण आरक्षण असून, ते बदलण्याच्या प्रस्तावाला नुकतीच स्थायी समितीच्या बैठकीत आणि नंतर महापालिका सभागृहात मंजुरी देण्यात आली होती. तेथे प्रदर्शन केंद्र उभारण्याचा प्रस्ताव आहे.

वांद्रेतील विविध फुटबॉल क्लब, स्थानिकांसह राजकीय पक्षांनी विरोध केला आहे. हा प्रस्ताव रद्द करावा, यासाठी शिवसेना उबाठाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी आणि काँग्रेसने आंदोलनही केले. या प्रस्तावाबाबत विचारले असता, हा प्रस्ताव जरी मंजूर झाला असला तरीही नागरिकांकडून हरकती व सूचना मागविण्याची प्रक्रिया अद्याप बाकी आहे, असे शिंदे यांनी सांगितले.

Maharashtra TimesCrime News : समलिंगी डेटिंग ॲपवर मैत्री, निर्जन जागी भेटायला बोलवायचे, कुणी नसल्याचं पाहून डाव साधायचे, दोघांना अटक

‘फुटबॉल मैदानावर बांधकाम नाही’

वांद्रे पश्चिममधील रिक्लेमेशन येथे ८४५० चौरस मीटर क्षेत्राचे नेव्हिल डिसोझा फुटबॉल मैदानाचा वापरबदलाचा प्रस्ताव मंजूर झाला असला तरी या मैदानावर कोणतेही बांधकाम केले जाणार नसल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. शहरातील मोकळ्या जागा वाढवण्याचे नियोजन आहे. त्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले.