DY Patil: पुणे, मुंबई, कोल्हापूरसह अनेक शहरांत जागतिक दर्जाच्या विद्यापीठांची आणि रुग्णालयांची निर्मिती केली. ग्रामीण आणि गरजू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची कवाडं खुली करून देऊन त्यांनी हजारो तरुणांच्या भविष्याला आकार दिला.
ज्ञानेश्वर यशवंतराव पाटील हे नाव देशभर परिचित होतं ते डॉ. डी. वाय. पाटील म्हणून. भविष्याचा वेध घेत राज्याच्या शिक्षण क्षेत्राला देशात आघाडीवर घेऊन जाण्यात त्यांचं महत्त्वाचं योगदान होतं. २२ ऑक्टोबर १९३५ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील कसबा बावडा इथं जन्मलेले पाटील यांचे वडील साधे शेतकरी; पण सामाजिक बांधिलकीचे संस्कार घरातून झाले. त्यांनी स्थानिक पातळीवरून आपलं सार्वजनिक आयुष्य सुरू केलं. पुढं कोल्हापूरचे महापौर आणि दोनदा आमदारही झाले.
डी. वाय. पाटील यांची खरी ओळख निर्माण झाली ती त्यांनी शिक्षण क्षेत्रात घडवून आणलेल्या आमूलाग्र बदलांमुळे. १९८० च्या दरम्यान राज्यात वैद्यकीय किंवा इंजिनीअरिंगचं शिक्षण घ्यायचं तर हाताच्या बोटावर मोजता येतील एवढीच सरकारी कॉलेजं होती. तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी ही अडचण ओळखून राज्यात खासगी विनाअनुदानित संस्था सुरू करण्यासाठी धोरण आखलं. पाटील यांना यातून आपली वाट गवसली आणि त्यांनी ‘डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ सोसायटी’ची स्थापना केली. इंजिनीअरिंग, वैद्यकीय, व्यवस्थापन आणि तंत्रज्ञान अशा विविध शाखांचं दर्जेदार जाळं त्यांनी उभं केलं.
आपल्या प्रशासकीय कौशल्याच्या आणि सामाजिक योगदानाच्या बळावर त्यांनी घटनात्मक पदांवरही यशस्वी काम केलं. त्यांनी त्रिपुरा आणि बिहारचे राज्यपाल म्हणून जबाबदारी सांभाळताना त्या राज्यांतील शैक्षणिक संस्थांचा दर्जा सुधारण्यावर आणि विद्यापीठांच्या कारभारात सुसूत्रता आणण्यावर विशेष भर दिला. त्यांनी उभं केलेलं शैक्षणिक साम्राज्य आणि आरोग्य क्षेत्रातील काम हा त्यांचा जिवंत वारसा आहे. एक संवेदनशील नेता, शिक्षणमहर्षी आणि मार्गदर्शक म्हणून त्यांचं योगदान महाराष्ट्राच्या सदैव स्मरणात राहील. त्यांना विनम्र श्रद्धांजली!
किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.
शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा