Headlines

DY Chandrachud: रशियाकडून चंद्रचूड यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी; शेकडो मिलियन डॉलर्सच्या वादात माजी CJIची एन्ट्री


भारताचे माजी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्याकडे रशियानं महत्त्वाची जबाबदारी दिली आहे. शेकडो मिलियन डॉलरच्या आर्बिट्रेशन केसमध्ये चंद्रचूड यांची एन्ट्री झाली आहे.

chadrachud
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मॉस्को: भारताचे माजी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांची रशिया-युक्रेन वादाशी संबंधित एका मोठ्या आंतरराष्ट्रीय आर्बिट्रेशन केसमध्ये एन्ट्री झाली आहे. युक्रेनची सरकारी बँक ओशचाडकडून गुंतवणूक वाद प्रकरणात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणात रशियाची बाजू मांडण्यासाठी चंद्रचूड यांची नियुक्ती झाली आहे. रशियाच्या विरोधात युक्रेनच्या सरकारी बँकेनं शेकडो मिलियन डॉलरचा दावा दाखल केला आहे.

हा वाद रशिया आणि युक्रेन यांच्यात झालेल्या १९९८ मध्ये झालेल्या द्विपक्षीय गुंतवणूक समझोत्याच्या अंतर्गत सुरू असलेल्या आर्बिट्रेशन कार्यवाहीशी संबंधित आहे. ओशचाड बँकेचा दावा युक्रेनच्या डोनेत्स्क, लुहांस्क, खेरसॉन आणि जापोरिज्जिया परिसरातील आपल्या मालमत्ता आणि आर्थिक व्यवहारांमध्ये झालेल्या कथित नुकसानाशी संबंधित आहे. २०२२ मध्ये रशियानं हाती घेतलेल्या लष्करी मोहिमेमुळे या मालमत्तांचं आणि व्यवसायाचं नुकसान झाल्याचा बँकेचा दावा आहे.

chandrachud

या प्रकरणाची सुनावणी तीन सदस्यीय आर्बिट्रेशन ट्रिब्युनल करेल. कोस्टा रिकाच्या आर्बिट्रेटर आणि माजी व्यापार मंत्री डायाला जिमेनेज यांची रशिया आणि ओशचाड बँकेनं संयुक्तपणे लवादाच्या अध्यक्षपदी निवड केली आहे. तर ग्रीसचे आर्बिट्रेटर आणि नॅशनल सिक्युरिटी ऑफ सिंगापूरचे प्रोफेसर स्टावरोस ब्रेकॉलाकिस यांची नियुक्ती ओशचाड बँकेकडून करण्यात आली आहे. तर रशियानं भारताचे माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या खांद्यावर जबाबदारी दिली आहे.

विशेष म्हणजे रशियानं चंद्रचूड यांना याआधीही आर्बिट्रेटर म्हणून काम करण्याचा प्रस्ताव दिला होता. रशियाशी संबंधित अन्य गुंतवणूक वादांमध्ये आर्बिट्रेटर बनण्याचे प्रस्ताव चंद्रचूड यांनी नाकारले होते. यामध्ये विंटरशॉल डीआ आणि युक्रेनची सरकारी पॉवर ट्रान्समिशन कंपनी उक्रेनर्गोशी संबंधित प्रकरणांचा समावेश आहे.

विंटरशॉल प्रकरणात चंद्रचूड यांना पर्मनंट कोर्ट ऑफ आर्बिट्रेशननं नियुक्ती संबंधी भूमिका दिली होती. पण रशियाकडून संपर्क साधण्यात आल्याची माहिती समोर आल्यावर त्यांनी स्वत:ला या भूमिकेपासून वेगळं केलं.

ग्लोबल आर्बिट्रेशन रिव्ह्यूनुसार डी. वाय. चंद्रचूड यांनी २०२५ मध्ये भारतातील गुंतवणूकदार आणि राज्यं यांच्यातील वाद आणि आर्बिट्रेशन व्यवस्थेवरही भाष्य केलं होतं.

कुणाल गवाणकर

लेखकाबद्दलकुणाल गवाणकरकुणाल गवाणकर हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. मे २०२२ पासून ते मटा ऑनलाईनमध्ये काम करत आहेत. प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल अशा तिन्ही माध्यमांचा एकत्रित १४ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठिशी आहे. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचं लेखन करण्याचा अनुभव आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि त्यासंदर्भातील बातम्या यावरही त्यांचा हातखंडा आहे.

पत्रकारितेतील अनुभव
बीएमएमचं शिक्षण घेत असताना सकाळ वृत्तपत्रातून त्यांनी बातमीदारीला सुरुवात केली. वयाच्या १९ व्या वर्षी ते सकाळमध्ये अंशकालीन बातमीदार म्हणून रुजू झाले. शहरातील मुलभूत समस्या, लोकांना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या अडचणी यावर त्यांनी वृत्तांकन केलं. त्यांनी केलेल्या बातम्यांमुळे काही समस्या सुटण्यास मदत झाली. मुंबईच्या दहिसर येथील गोदावरी ही मराठी माध्यमाची शाळा बंद होणार होती. त्यामुळे गरीब घरातील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. हा प्रश्न त्यांनी बातमीच्या माध्यमातून मांडला. त्यामुळे ही शाळा वाचली. त्याबद्दल तिथल्या शिक्षकांनी ‘सकाळ’चं कौतुक केलं होतं.

मालाडमधील एका खासगी संस्थेला दहिसरमध्ये नाममात्र दरात रुग्णालयासाठी दिलेली जागा, तिथे त्यांनी नियम मोडून खासगी वापरासाठी, श्रीमंत रुग्णांसाठी केलेली व्यवस्था, त्या रुग्णालयाचं दोन आमदारांनी केलेलं उद्घाटन, या सगळ्याबद्दल सखोल माहिती देणारी वृत्तमालिका विशेष गाजली. आमदारांनी सार्वजनिक निधीचा खासगी इमारतींमध्ये केलेला वापर, नियम धाब्यावर बसवून केलेली कामं या बातम्यांचीदेखील विशेष चर्चा झाली. जनतेचे प्रश्न मांडण्याचं काम त्यांनी सातत्यानं केलं.

‘जय महाराष्ट्र’ च्या माध्यमातून २०१३ मध्ये टीव्ही मीडियात पाऊल टाकलं. सुरुवातीला फास्ट न्यूजच्या बुलेटिनची जबाबदारी सांभाळली. त्यानंतर जनरल बुलेटिन प्रोड्युसर म्हणून काम केलं. ‘मोहीम’ या प्राईम टाईममधील विशेष कार्यक्रमासाठी प्रोड्युसर म्हणून काम पाहिलं, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीशी संबंधित कार्यक्रमांचं संकलन केलं.

टीव्ही ९ मराठी वृत्तवाहिनीत स्पेशल पॅकेज लिहिण्याची जबाबदारी पार पडली. स्पेशल रिपोर्ट या प्राईम टाईम शोचा प्रोड्युसर म्हणून काम केलं. एकाच विषयाचे विविध पैलू प्रेक्षकांना उलगडून सांगण्याचं कौशल्य या शोमधून त्यांनी आत्मसात केलं.

लोकसत्ताच्या माध्यमातून त्यांनी २०१६ मध्ये ‘डिजिटल’ क्षेत्रात पदार्पण केलं. महाराष्ट्र, देश आणि आंतरराष्ट्रीय बातम्या करण्याची जबाबदारी त्यांना मिळाली. मुंबईसह महत्त्वाच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, त्यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांनी इथे मिळाली. डिजिटल माध्यमात पहिल्यांदाच न्यूजरुम बुलेटिनचा प्रयोग झाला. त्यात त्यांनी अनेकदा सूत्रसंचालनाची भूमिका बजावली. २०१७ मध्ये ‘लव्ह डायरीज’ नावाची प्रेमकथांना समर्पित असलेली मालिका सुरु करण्यात आली. त्यातील अनेक कथा त्यांनी लिहिल्या होत्या. या मालिकेतील बऱ्याचशा कथांचं कौतुक झालं.

लोकमत डिजिटलमध्ये त्यांनी २०१८ ते २०२२ अशी चार वर्षे काम केलं. लोकसभा, विधानसभा निवडणूक, प्रचारसभा, निकाल यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांना मिळाली. पाच राज्यांच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, निकालांचं विश्लेषण करण्याची, घडामोडींचे विविध कंगोरे उलगडून वाचकांपुढे ठेवण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली. जोक सेक्शनपासून ते अमेरिकेच्या व्हिसाशी संबंधित मालिकेपर्यंत सर्वदूर मुशाफिरी करण्याची संधी त्यांना इथे मिळाली. आकर्षक मथळ्यांमुळे त्यांच्या बातम्या वाचकांच्या पसंतीस उतरल्या.

२०२२ पासून महाराष्ट्र टाइम्ससाठी काम करताना त्यांनी राज्य ते राष्ट्रीय स्तरावरील राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, क्रीडा या क्षेत्रातील बातम्यांना प्राधान्य दिलं. बातमी मागील बातमी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सातत्यानं केला. घडामोडींचं विश्लेषण करणारे लेख त्यांनी लिहिले. एकनाथ शिंदे यांचं बंड, राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट, त्यामुळे बदललेलं राजकारण या नाट्यमय घडामोडींवर त्यांनी विस्तृत लिखाण केलं. सखोल माहिती घेऊन घडामोडींचं विश्लेषण करण्याची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली. घटनांमागील रंजक घडामोडी, वर्तमानातील बातम्यांची पार्श्वभूमी, त्यांचे होणारे परिणाम, सत्ताकारणासाठी सुरु असलेले शह-काटशह यावर त्यांनी सविस्तर लिखाण केलं. भाजपचे माजी खासदार आणि वरिष्ठ नेते किरीट सोमय्या यांना भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन रोखठोक सवाल करणारा त्यांचा व्हिडीओ समाज माध्यमांवर विशेष गाजला.

शैक्षणिक पात्रता
कुणाल गवाणकर यांनी २०१३ मध्ये पाटकर महाविद्यालयातून बीएमएमची पदवी संपादन केली. शालेय आणि बारावीपर्यंतचं शिक्षण दहिसरमधील शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीत झालं. विद्यार्थीदशेत असतानाच त्यांना लिखाणाची गोडी लागली. मराठी भाषेवर प्रभुत्व असल्यानं त्यांनी निबंध स्पर्धेत अनेक पारितोषिकं जिंकली. बारावीच्या बोर्ड परीक्षेमेध्ये मराठी विषयात कनिष्ठ महाविद्यालयातून सर्वाधिक गुणांनी उत्तीर्ण होण्याचा मान त्यांनी पटकावला. त्यानंतर त्यांनी पत्रकारिकेचं शिक्षण घेतलं. शिक्षण घेत असतानाचा त्यांनी या क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली होती.आणखी वाचा