विदर्भाच्या सामाजिक आणि राजकीय पटलावर तब्बल अर्धशतक ‘ बीटी ’ ही नाममुद्रा अधीराज्य गाजवीत होती. त्यांचं चारित्र्य स्वच्छ, त्यांचे कपडे शुभ्र, त्यांचं मन नितळ, पारदर्शक. त्यांचा व्यवहार इतका सचोटीचा होता की, आपण कुणाच्या पाठिंब्यावर निवडून आलो, यापेक्षा आपण कुणासाठी आणि कशासाठी निवडून आलो याची स्पष्टता त्यांच्या विचारात अधिक होती. शिक्षण, सिंचन आणि अनुशेष हे त्यांच्या जिव्हाळ्याचे विषय. यांच्या मध्ये जो कुणी येईल तो त्यांचा विरोधक असे. त्यांच्यावर तुटून पडत.
‘बीटी’ यांचं मूळ नाव भाऊराव तुळशीराम देशमुख. अमरावती जिल्ह्यातील बेलोरा गावातला जन्म. बालपणापासूनच बुद्धिवान आणि धाडसी. नववीत असताना त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या समर्थनार्थ असे काही भाषण ठोकले की भलेभले प्रभावित झाले. उमेदवारीच्या काळात त्यांनी पत्रकारिता केली. नंतर राज्यशास्त्राचे प्राध्यापक झाले. सॉक्रेटीस, प्लेटो, ऑरिस्टॉटल यांचे राजकीय तत्वज्ञान त्यांच्या जिभेवर खेळत असे.
प्राध्यापकांचे प्रश्न, समस्या त्यांना नागपूर युनिव्हर्सिटी टीचर्स असोशिएशन (नुटा) संघटनेकडे घेऊन गेल्या. काही काळ संघटनेचे उपाध्यक्ष आणि पुढे तब्बल ३७ वर्षे ते ‘नुटा’चे अध्यक्ष होते. प्राध्यापकांसारख्या बुद्धिवादी जमातीचे सलग इतके वर्षे नेतृत्व करणे सोपे नव्हे. अडचणीतील लोकांना हात देणे, त्यांच्यासाठी कुठल्याही पातळीपर्यंत संघर्ष करणे, पाठपुरावा करणे, त्यात सातत्य ठेवणे ही त्यांच्या कामाची पद्धत. नागपूर असो की अमरावती, त्यांच्या काळात ‘नुटा’चा आवाज गाजत असे.
१९८०साली ते पदवीधर मतदारसंघातून आमदार झाले. त्यानंतर तब्बल ३० वर्षे ते पदवीधरांचे प्रतिनिधी म्हणून विधान परिषदेत गर्जत असत. निवडणूक लोकवर्गणीतून लढायची आणि त्याचा हिशेब द्यायचा हा त्यांचा शिरस्ता. त्यांच्याशी संबंधित प्रश्न असो नसो, चर्चा असो, नसो ते सभागृहात बसून असत. आपला अभ्यास करीत असत. शिक्षक, प्राध्यापक, सिंचन, अनुशेष असे विषय आले की ते सत्ताधाऱ्यांवर तुटून पडत. त्यांचे प्रश्न टोकदार असत. त्यात धार असे. ते आक्रमक झाले की, त्यांच्या आवाजाला एक वेगळीच किनार लाभत असे. नियम आणि कायद्यांचे हवाले देऊन त्यांनी कितीदा तरी सरकारला कोंडीत पकडले. राज्य सरकारचा पहिला ‘ उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार ’ त्यांना मिळाला तो उगीच नव्हे.
ते महाराष्ट्रवादी होते; पण विदर्भाच्या अनुशेषावरून त्यांनी सरकारला न्यायालयात खेचले. रुक्ष आकडेवारीचा अभ्यास करून त्यांनी विदर्भावरील अन्याय पुढे आणला. वैदर्भीय आमदारांची मोट बांधली. राज्यपालांना भेटून निर्देश काढायला लावले. केळकर समितीच्या अहवालावर त्यांनी लिहिलेले ‘केळकरी कारस्थान’ हे विश्लेषण अर्थतज्ज्ञाला लाजविणारे होते.
सिंचनावर त्यांचा विशेष कटाक्ष असे. ‘सोफिया’ला दिल्या जाणाऱ्या पाण्याने शेतकऱ्यांच्या सिंचनावर गदा येईल असे दिसताच त्यांनी आंदोलन केले. ती कंपनी एका बड्या नेत्याची होती. त्यांना थांबण्यासाठी ऑफर्स आल्या, ‘बघून घेऊ,’ म्हणून धमक्या आल्या. राजकीय कारकीर्द धोक्यात येईल असे सल्ले मिळाले. ऐकतील ते बीटी कसले. २०१०च्या निवडणुकीत एकीकडे एकसंघ राजकीय ताकद, अर्थशक्ती, साधन-संपदा आणि दुसरीकडे बीटी अशी लढत झाली. कर्तृत्वात बीटींपेक्षा खूप मागे असलेल्या एका नवख्या उमेदवाराने त्यांचा पराभव केला, तेव्हा सामान्यजन हळहळले. बीटींनी कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही; लोकशाहीला नमस्कार करीत ते शांतपणे बाजूला झाले.
ते उत्कृष्ट जलतरणपटू होते. संगीताचे जाणकार, संगीत नाटकांचे दर्दी होते. शिक्षक होते, संघटक होते, लेखक- पत्रकार होते. लोकप्रतिनिधी होते. त्यांचं कर्तृत्व पुढच्या पिढीपर्यंत कसे पोहोचेल माहिती नाही. पुढे कदाचित ‘बीटी’ हे दोन शब्द कापसाच्या वाणासाठीच ओळखले जातील. बीटी कापसापेक्षाही शुभ्र होते हे वास्तव कुणालाच पुसता येणार नाही.

