Headlines

Apply For Passport: पासपोर्टची सोपी प्रक्रिया – passport application process online by sitting home and saves time


Passport Online Application Form: पासपोर्ट फॉर्म भरणे ऑनलाइन केल्याने अत्यंत अतिशय सोपे झाले आहे. आपण घरबसल्या सहज पासपोर्ट फॉर्म भरू शकता आणि पासपोर्ट कार्यालयाला सादर करण्याची वेळ आणि तारीख मिळवू शकता. पोलिस पडताळणीसाठी संबंधित मंत्रालयाने पासपोर्ट पोलिस ॲप विकसित केले आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीचे रेकॉर्ड त्यांना क्षणार्धात कम्प्युटरवर मिळू शकते.

passport
पासपोर्ट(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
-उमाकांत तासगावकरअनेकांना सुट्ट्यांमध्ये बाहेर म्हणजे विशेषत: परदेशी जाण्याचे नियोजन करायचे असते, तेव्हा तयारी पासपोर्टपासून सुरू होते. दस्तावेजाच्या नावातच त्याचे कार्य दडलेले आहे. जे पत्र आपणास दोन देशातील सीमा पार करण्यास मदत करते तो पासपोर्ट म्हणजेच पारपत्र. आधार कार्ड ही जशी आपली आपल्या देशातील ओळख असते तसेच पासपोर्ट ही आपली आंतरराष्ट्रीय ओळख असते. कोणतीही सीमा अथवा आंतरराष्ट्रीय हद्द, मग ती हवाई सीमा असो वा समुद्री, रस्ते अथवा रेल्वे, पासपोर्ट असल्याखेरीज पार करता येत नाही. सध्या दिल्या जाणाऱ्या पासपोर्टची मुदत दहा वर्षे असते व प्रत्येक दहा वर्षांनी त्याचे नूतनीकरण करावे लागते.

पासपोर्टचे अनेक प्रकार आहेत परंतु आपण फक्त सामान्य माणसाला नेहमी लागणारा आणि दिल्या जाणारा सामान्य रंगाच्या पासपोर्टबद्दलच बोलणार आहोत. नुकताच परराष्ट्र खात्याने पासपोर्ट हा तुमच्या नागरिकत्वाची ओळख नसून हे फक्त प्रवासाकरता लागणार दस्तावेज आहे असं म्हणून सर्व देशात एकच खळबळ उडवून दिली. अर्थात यामुळे लोकांमध्ये बराच गोंधळ निर्माण झाला आहे तो अजूनही तसाच आहे. मी स्वतः परराष्ट्र खात्याच्या अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता त्यांनी दोन-चार दिवसात आमचा खुलासा येईल असे सांगितले होते परंतु, अद्याप तो काही आलेला दिसत नाही.

सध्या पासपोर्ट काढणे हे पूर्वी इतके कठीण काम राहिले नाही. भारत सरकारच्या परराष्ट्र खात्याने यामध्ये अनेक सुधारणा केल्या आहेत. त्या नेमक्या कोणत्या आहेत हे जाणून घेण्याकरता मी विभागीय पासपोर्ट अधिकारी स्वप्नील थोरात यांची भेट घेतली. त्यांनीही अत्यंत आपुलकीने मला सर्व माहिती दिली.

काही वर्षांपूर्वी प्रत्येक ठिकाणी किंवा जिल्ह्यात पासपोर्ट कार्यालये नव्हती आणि पासपोर्ट काढण्याची सुविधाही नव्हती. त्यासाठी लोकांना दूर राजधानीच्या ठिकाणी जावे लागे आणि आपल्या कामकाजाचा बराचसा वेळ खर्च करावा लागे. ही परिस्थिती बदलण्यासाठी सरकारने देशात एकंदर सदतीस विभागीय पासपोर्ट कार्यालये स्थापन केली आहेत. यांचे एक मोठे भौगोलिक क्षेत्र असते व त्यांचा प्रमुख हा विभागीय पासपोर्ट अधिकारी असतो. विभागीय पासपोर्ट अधिकाऱ्यांचे नियंत्रण त्यांच्या भौगोलिक कक्षेत येणाऱ्या सर्व पासपोर्ट कार्यालयांवर असते. हे नियुक्त केलेले विभागीय पासपोर्ट अधिकारी सर्वसामान्यपणे भारतीय परराष्ट्र सेवेतील असतात.

सध्या भारतात ९३ पासपोर्ट सेवा केंद्रे तसेच ४५२ पोस्ट ऑफिसतर्फे पासपोर्ट सेवा दिली जाते. एकूण देशात ५४५ पासपोर्ट सेवा केंद्रे आहेत. यामध्ये ४५२ टपाल कार्यालये आणि ९३ पासपोर्ट सेवा केंद्रांचा ही समावेश आहे. थोडक्यात प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आणि मोठ्या शहरांमध्ये नागरिकांना पासपोर्ट मिळण्याची सोय केलेली आहे.

काही कारणाने आपला पासपोर्ट परदेशात हरवलाच तर आता जवळपास प्रत्येक देशात आपले दूतावास आहे आणि यासंदर्भात ते आपणास सर्व मदत करेल, फक्त तुम्ही तिथपर्यंत पोहोचले पाहिजे. देशात किंवा परदेशात जर तुमचा पासपोर्ट हरवला तर अर्थातच तुम्हाला नवीन पासपोर्ट घ्यावा लागतो आणि संबंधित कार्यालयाला सर्व कागदपत्रांसह योग्य ती माहिती द्यावी लागते. तसेच त्यावेळी देशात किंवा परदेशात लागू असलेली पासपोर्टची फी म्हणजेच पासपोर्ट शुल्क भरावे लागते मगच आपणास नवीन पासपोर्ट मिळू शकतो. अर्थात त्यासाठी पासपोर्ट कार्यालयाने अथवा परदेशातील आपल्या दूतावासाने विचारलेल्या प्रश्नांची आपल्याला सयुक्तिक उत्तर देणे आवश्यक आहे. संबंधित अधिकाऱ्यांचे जर समाधान झाले तर आपणास नवीन पासपोर्ट मिळू शकतो. परदेशातील प्रमुख अडचण म्हणजे तुम्ही ज्या शहरात असाल त्या शहरांमध्ये भारताचा दूतावास असेलच असे नाही. त्यामुळे आपणास दूतावास ज्या शहरात आहे त्या शहरापर्यंत जावे लागेल. हे बऱ्याचदा खर्चिक असू शकते आणि पासपोर्ट करता भरावे लागणारे शुल्क हेही परकीय चलनात द्यावे लागते. ते अर्थातच भारतीय चलनापेक्षा महाग असते. या सर्व बाबींची काळजी घेऊन शक्यतो आपला पासपोर्ट न हरवणे हेच उत्तम.

पासपोर्ट फॉर्म भरणे ऑनलाइन केल्याने अत्यंत अतिशय सोपे झाले आहे. आपण घरबसल्या सहज पासपोर्ट फॉर्म भरू शकता आणि पासपोर्ट कार्यालयाला सादर करण्याची वेळ आणि तारीख मिळवू शकता. पोलिस पडताळणीसाठी संबंधित मंत्रालयाने पासपोर्ट पोलिस ॲप विकसित केले आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीचे रेकॉर्ड त्यांना क्षणार्धात कम्प्युटरवर मिळू शकते. यामुळे पोलिस पडताळणीलाही वेळ लागत नाही आणि हे काम चटकन होऊ शकते. पोलिस पडताळणीची खरी अडचण होते म्हणजे ज्यांची घरे पुनर्विकासा करता गेली आहेत आणि जे लोक आपले स्वतःचे घर सोडून दुसऱ्या घरात दुसऱ्या घरात भाड्याने राहत आहेत त्यांची असते, कारण तुम्ही कोणत्याही घरात सलग दोन वर्षे राहिले पाहिजे, अशी पासपोर्ट ऑफिसची अपेक्षा आहे. भाड्याचे घर असेल तर घरमालकांनी पासपोर्ट काढण्याकरता ना हरकत प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे.

पासपोर्ट मिळण्याकरता तुमची ओळख आणि नागरिकत्व सिद्ध करणारी अनेक कागदपत्रे द्यावी लागतात. यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, प्राप्तिकराचे पेपर्स त्याचप्रमाणे तुमचे घर सिद्ध करणारी कागदपत्रे, तुम्ही जिथे नोकरी करता अथवा व्यवसाय करता ते सिद्ध करणारी कागदपत्रे, आपला जन्म दाखला तसेच शैक्षणिक पात्रता सिद्ध करणारी कागदपत्रे द्यावी लागतात. पासपोर्ट अधिकाऱ्याला त्यातील कोणतेही कागदपत्र योग्य वाटले नाही तर तो आपणास अधिक खुलासा मागू शकतो.

ज्यांना लवकर पासपोर्ट हवा आहे त्यांच्यासाठी जास्त फी भरून तत्काळ सेवा उपलब्ध आहे. सध्याच्या सुधारलेल्या परिस्थितीत साधा पासपोर्ट साधारण १५ ते ३० दिवसांत व तत्काळ पासपोर्ट तीन ते सात दिवसांत मिळू शकतो. अनेक जण जास्त फी भरून याचा बराच फायदा घेतात. सध्या सामान्य पासपोर्टसाठी रुपये २५०० रु. आणि तत्काळ सेवेसाठी रुपये ५५०० रु. शुल्क आकारले जाते. पासपोर्टसाठी वाढीव शुल्क एक जुलैपासूनच अमलात आलेले आहे.

आपल्याला सध्या मिळणारा पासपोर्ट हा ई पासपोर्ट बनवला जातो. या पासपोर्टला एक छोटीशी इलेक्ट्रॉनिक चीप लावलेली असते ज्यामध्ये पासपोर्ट धारकाची सर्व माहिती संकलित केलेली असते. पासपोर्ट अर्ज सादर करताना धारकाला स्वतः पासपोर्ट पासपोर्ट केंद्रात हजर राहावे लागते व आपले बायोमेट्रिक म्हणजेच बोटांचे ठसे आणि फोटो द्यावा लागतो अर्थात हे काम पासपोर्ट केंद्रच करते. याचा प्रमुख फायदा म्हणजे ज्यावेळेस आपण परदेशात उतरता त्यावेळेस परदेशी इमिग्रेशन अधिकाऱ्याला तुमची सर्व माहिती सहज उपलब्ध होते आणि तुमचा त्या देशातील प्रवेश अधिक सुलभ होतो. इमिग्रेशन अधिकारी जर तुमची अडवणूक करत असेल तर त्यालाही यामुळे आळा बसतो. पर्यटक आणि इमिग्रेशन अधिकारी यांच्यातील वाद टळतात.
—————————————————–
(लेखक पर्यटन क्षेत्रात कार्यरत आहेत.)

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा