Headlines

रिटायरमेंटच्या चर्चांमुळे रोहित इंग्लंडविरुद्ध दबावात खेळतोय? टीम इंडियाचे बॅटिंग कोच नेमकं काय म्हणाले?


Rohit Sharma News : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन वनडेत रोहित शर्माची बॅट शांत राहिल्यानंतर निवृत्तीच्या चर्चा रंगल्या आहेत. मात्र फलंदाजी प्रशिक्षक सितांशू कोटक यांनी रोहितच्या फलंदाजीबाबत भाष्य केले आहे.

rohit sharma retirement
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांत रोहित शर्माला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. त्यामुळे त्याच्या निवृत्तीबाबत विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. काही अहवालांमध्ये लॉर्ड्सवरील तिसरा वनडे हा रोहितच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील अखेरचा सामना ठरू शकतो, असा दावाही करण्यात आला. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. दरम्यान, दुसऱ्या वनडेनंतर भारताचे फलंदाजी प्रशिक्षक सितांशू कोटक यांनी रोहितच्या फॉर्मबाबत महत्त्वाचे वक्तव्य करत त्याच्यावर कोणताही दबाव नसल्याचे स्पष्ट केले.

‘रोहितसारख्या खेळाडूवर दबाव असू शकत नाही’

कार्डिफ वनडेनंतर पत्रकार परिषदेत रोहितच्या फॉर्मबद्दल प्रश्न विचारण्यात आला असता सितांशू कोटक म्हणाले, “रोहितसारख्या अनुभवी आणि मोठ्या खेळाडूवर दबाव असू शकत नाही. पहिल्या दोन सामन्यांत त्याला धावा करता आल्या नाहीत, पण त्यामुळे तो संघर्ष करतोय, असा निष्कर्ष काढता येणार नाही. मी खूप क्रिकेट खेळलो आणि पाहिलं आहे. अनेकदा फलंदाजांना सुरुवातीला अपेक्षित लय मिळत नाही. त्यावरून त्यांची गुणवत्ता ठरवता येत नाही.”

कोटक यांनी पुढे सांगितले की, कार्डिफमधील खेळपट्टीवर चेंडूला दुहेरी उसळी मिळत होती. त्यामुळे फलंदाजांना फटके खेळताना अडचणी आल्या आणि त्याचाही परिणाम भारतीय फलंदाजीवर दिसून आला.

Maharashtra TimesRohit Sharma-Virat Kohli : देशाला जिंकायची सवय लावणारे रोहित-कोहली लॉर्ड्सवर आणखी एक विक्रम रचणार, चाहत्यांसाठी कदाचित शेवटची पर्वणी

लॉर्ड्स वनडेबाबत चर्चांना उधाण

दरम्यान, 2027 च्या वनडे विश्वचषकाची तयारी लक्षात घेऊन भारतीय संघ भविष्यातील नियोजन करत असल्याची चर्चा आहे. काही माध्यमांच्या वृत्तानुसार, निवड समितीने रोहित शर्मा 2027 च्या विश्वचषकाच्या योजनांचा भाग नसल्याचे संकेत दिल्याचा दावा केला आहे. त्यामुळे 19 जुलै रोजी लॉर्ड्सवर होणारा तिसरा वनडे हा रोहितच्या कारकिर्दीतील अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना ठरू शकतो, अशा चर्चांना उधाण आले आहे. त्यातच रोहितचे आई-वडिलही हा सामना पाहण्यासाठी इंग्लंडला पोहचणार असल्याचे सांगण्यात येत आहे, मात्र बीसीसीआय किंवा स्वतः रोहित शर्मा यांनी याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही.

Maharashtra TimesIND vs ENG : 180 वर फक्त 3 विकेट, मग भारताचा डाव असा कसा कोसळला? इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूकलाही पडला प्रश्न, काय म्हणाला?

रोहित शर्माच्या भवितव्याबाबत सध्या अनेक तर्कवितर्क लावले जात असले, तरी अधिकृत निर्णयाची सर्वांनाच प्रतीक्षा आहे. लॉर्ड्सवरील तिसऱ्या वनडेनंतरच या चर्चांना पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष रोहितच्या कामगिरीसोबतच बीसीसीआयच्या पुढील भूमिकेकडे लागले आहे.