Headlines

Construction Crane Collapse in Mira Road Rescue Underway


मीरा रोड येथे मोठी दुर्घटना घडल्याची माहिती मिळत आहे. या दुर्घटनेत अनेक जण खाली दबल्याची भीती व्यक्त केली जात आहे. बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. बचावकार्य युद्ध पातळीवर सुरु आहे.

Mira road
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
भाविक पाटील, मीरा-भाईंदर : मीरा रोड येथे मोठी दुर्घटना घडली आहे. अकराव्या मजल्यावरुन क्रेन कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत आतापर्यंत एका जणाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर आणखी एक व्यक्ती गंभीर जखमी आहे. मीरा रोड येथे इमारतीचं बांधकाम सुरु होतं. पण या बांधकामादरम्यान मोठा अपघात घडला आहे. एक क्रेन थेट अकराव्या मजल्यावरुन बाजूच्या इमारतीच्या आवारात कोसळली आहे. ही क्रेन बाजूच्या सोसायटीतील पार्किंगमध्ये कोसळली आहे. या घटनेत अनेक चारचाकी गाड्यांचा चक्काचूर झाला आहे. तसेच अनेक जण या क्रेनखाली दबल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

क्रेन कोसळल्याच्या घटनेची माहिती मिळताच पोलीस, अग्निशामक दल, महापालिकेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. संबंधित घटना ही गुरुवारी (16 जुलै) संध्याकाळच्या सुमारास घडली आहे. संध्याकाळच्या वेळी अनेक जण घराबाहेर कामानामित्त किंवा खरेदीसाठी बाहेर पडतात. यामुळे या घटनेत जीवितहानी झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अर्थात याबाबत अधिकृत अशी माहिती समजू शकलेली नाही. पण घटना खूप गंभीर आहे. सध्या युद्ध पातळीवर बचावकार्य सुरु असल्याची माहिती मिळत आहे.

काही जण जखमी झाल्याची शक्यता

मीरा रोडमध्ये निर्माणधीन इमारतीची क्रेन लगतच्या रहिवासी इमारतीच्या परिसरात कोसळल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली आहे. या अपघातात काही जण खाली दबून जखमी झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. घटनास्थळी स्थानिक पोलीस आणि अग्निशामक दल दाखल झाले आहे. त्यांच्याकडून बचाव कार्य केले जात आहे.

नेमकी घटना काय घडली?

मीरा रोडच्या विनय नगर भागात जेके आयरीस इमारत आहे. या इमारतीलगत एका विकासकाकडून इमारत उभारण्याचे काम सुरू आहे. या इमारतीच्या 16 व्या मजल्यावर बांधकाम साहित्य वर घेऊन जाणारी क्रेन अचानक लगत असणाऱ्या जेके आयरीस इमारतीच्या परिसरात गुरुवारी सायंकाळच्या सुमारास कोसळली.

पार्किंगमध्ये उभे असलेल्या वाहनांवर क्रेन कोसळल्यामुळे अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघातात एक तरुणाचा मृत्यू झाला आहे. तर आणखी एक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे . यासह इतरही काहीजण अडकल्याचा देखील अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे अग्निशमन दलासह स्थानिक काशिगाव पोलिसांकडून परिसरात शोध मोहीम राबवली जात आहे.

नागरिकांकडून कठोर कारवाईची मागणी

या प्रकरणी दोषींवर कठोरात कठोर कारवाईची मागणी होत आहे. यापूर्वी देखील विकासाच्या हलगर्जीपणामुळे रस्ता खचून मोठा अपघात झाल्याची घटना घडली होती.