Mumbai Metro 9: एप्रिल महिन्यात सुरू झालेल्या मेट्रो ९ मार्गावर प्रवासी मोठ्या संख्यने प्रवास करतात. या मार्गावरील काशिगाव मेट्रो स्थानकावरही प्रवाशांची संख्या मोठी आहे. स्थानकावर गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी दुसरा प्रवेशमार्ग सुरू केला आहे.
म. टा. वृत्तसेवा, मिरा-भाईंदर: काशिगाव मेट्रो स्थानकाचा वापर करणाऱ्या शेकडो प्रवाशांना अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. स्थानकात ये-जा करण्यासाठी दुसरा पर्यायी प्रवेशमार्ग सुरू करण्यात आला असून त्यामुळे एकाच मार्गावरील गर्दी आणि प्रतीक्षेचा मोठा प्रश्न सुटण्याची अपेक्षा आहे. मात्र, दुसऱ्या मार्गावरील जिन्याचे काम अद्याप पूर्ण झालेले नसल्याने प्रवाशांना त्याची प्रतीक्षा कायम आहे.
मिरा-भाईंदर-दहिसर मेट्रो सेवा एप्रिलपासून सुरू झाल्यानंतर मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांनी या सेवेला मोठा प्रतिसाद दिला आहे. रस्ते वाहतूककोंडी टाळून अल्पावधीत प्रवास करता येत असल्याने दररोज मोठ्या संख्येने नागरिक मेट्रोचा वापर करत आहेत. मात्र, काशिगाव मेट्रो स्थानकाचे काही काम अपूर्ण असल्याने स्थानकात प्रवेश आणि निर्गमनासाठी केवळ भाईंदरकडील एकाच मार्गाचा वापर करावा लागत होता. तिकीट स्कॅनिंगची सुविधाही एकाच ठिकाणी असल्याने सकाळ-सायंकाळच्या गर्दीच्या वेळी प्रवाशांच्या लांबच लांब रांगा लागत होत्या. मेट्रोचा प्रवास अवघ्या १० ते १५ मिनिटांत पूर्ण होत असला, तरी स्थानकातून बाहेर पडण्यासाठी किंवा प्रवेशासाठी १५ ते २० मिनिटे प्रतीक्षा करावी लागत होती.
दररोजच्या या गैरसोयीमुळे पर्यायी प्रवेशमार्ग तातडीने सुरू करण्याची मागणी प्रवाशांकडून होत होती. त्यानुसार पूजा पार्क परिसरातील दुसऱ्या प्रवेशमार्गाचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) हाती घेण्यात आले होते. हे काम पूर्ण झाल्यानंतर सोमवारी हा मार्ग प्रवाशांसाठी खुला करण्यात आला. नवीन प्रवेशमार्गासह अतिरिक्त तिकीट स्कॅनिंगची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
दुसऱ्या जिन्याची प्रतीक्षा कायम
दुसरा प्रवेशमार्ग सुरू झाला असला, तरी त्या बाजूला अद्याप एकच जिना उपलब्ध आहे. दुसऱ्या जिन्याच्या उभारणीसाठी आवश्यक भूसंपादन प्रक्रिया प्रलंबित असल्याने हे काम रखडले आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रवाशांना स्थानकात ये-जा करण्याची सुविधा आणखी सुलभ होणार आहे.
काशिगाव मेट्रो स्थानक गाठण्यासाठी किंवा स्थानकातून सायंकाळी कामावरून प्रवासांना परतताना रिक्षा किंवा बसद्वारे मिरा-भाईंदरकरांना प्रवास करावा लागत आहे. या प्रवासासाठी अपेक्षित बस उपलब्ध नसल्यामुळे रिक्षाने किंवा टॅक्सीने नागरिकांना घर गाठावे लागत आहे. यावेळी विशिष्ट दर निश्चित करण्यात आले नसल्याने मनमानी पद्धतीने प्रवाशांकडून भाडे आकारून त्यांची लूट केली जात आहे. ती थांबवण्याचीही मागणी होत आहे.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा