Headlines

पहलगाममध्ये ढगफुटीने हाहाकार


अचानक आलेल्या पुरामुळे अनेक वाहने पाण्याखाली : रस्त्याचे नुकसान, सर्व पर्यटक सुरक्षित

वृत्तसंस्था/ पहलगाम, श्रीनगर

दक्षिण काश्मीरमधील पहलगामच्या नाला आवोरा भागात ढगफुटीनंतर अचानक आलेल्या पुरामुळे प्रचंड विध्वंस झाला आहे. वेगाने वाहणाऱ्या पाण्याने आणि माती-दगडांच्या ढिगाऱ्यांनी परिसराचा बराचसा भाग व्यापला असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी पाणी साचले असून रस्ते आणि जोडमार्ग माती-दगडांनी भरले आहेत. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि बाधित भागांमध्ये बचाव व मदतकार्य करण्यासाठी अधिकारी आणि मदत पथके घटनास्थळी दाखल झाली आहेत.

जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिह्यात शनिवारी रात्री उशिरा झालेल्या ढगफुटीमुळे बिजबेहरा-पहलगाम रस्त्याचे मोठे नुकसान झाले. यात तूर्तास तरी कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याची नोंद नाही. सर्व स्थानिक रहिवासी आणि पर्यटकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. ढगफुटीमुळे पहलगाम-अवुरा-बिजबेहरा मार्गाचा मोठा भाग खराब झाल्यामुळे वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. रस्ता वाहून गेल्याने तो वाहतुकीसाठी असुरक्षित झाला आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित भागातील वीज आणि पिण्याच्या पाण्याचा पुरवठाही विस्कळीत झाला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने पर्यटकांना सुरक्षित ठिकाणी हलवले आहे. प्रशासनाने नुकसानीचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. हवामान पूर्ववत झाल्यावर रस्ता, वीज आणि पाणीपुरवठा पूर्ववत करण्याचे काम सुरू होईल.

रस्त्याच्या नुकसानीमुळे अनेक गावे आणि पर्यटनस्थळांशी संपर्क तुटला असून, त्याचा परिणाम स्थानिक रहिवासी, प्रवासी आणि पर्यटन उद्योगावर झाला आहे. स्थानिक रहिवाशांनी जिल्हा प्रशासनाकडे सध्याच्या अडचणी कमी करण्यासाठी लवकरात लवकर रस्ता, वीज आणि पाणीपुरवठा पूर्ववत करण्याची मागणी केली आहे. या घटनेमुळे पावसाळ्यात डोंगराळ प्रदेशात नैसर्गिक आपत्तींचा धोका पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. भविष्यात अशा घटनांचा प्रभाव कमी करण्यासाठी रस्त्यांची पायाभूत सुविधा मजबूत करण्याची आणि आपत्ती व्यवस्थापन प्रणाली सुधारण्याची गरज असल्याचे स्थानिकांनी सांगितले. परिस्थिती सामान्य होईपर्यंत लोकांनी बाधित भागांमध्ये अनावश्यक प्रवास टाळावा आणि प्रशासनाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

जम्मू-काश्मीरच्या डोंगराळ भागात मोठ्या प्रमाणावर होणारी जंगलतोड, वनजमिनीवरील अतिक्रमण, नैसर्गिक जलवाहिन्यांमध्ये अडथळा आणि पर्यटकांची गर्दी होणाऱ्या उंच भागांमधील अनियंत्रित कचरा विल्हेवाट ही ढगफुटीमुळे होणाऱ्या नुकसानीची प्रमुख कारणे समजली जात आहेत.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत