![]()
गडचिरोली पोलिसांनी महिला आणि बालकांवरील अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये पीडितांना जलद न्याय मिळवून देण्यासाठी एक कौतुकास्पद पाऊल उचलले आहे. चामोर्शी येथे एका ७ वर्षीय चिमुकलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणात, पोलिसांनी घटनेच्या अवघ्या १२ तासांत आरोपीला अटक केली आणि विक्रमी २८ दिवसांत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या गतिमान कारवाईमुळे कायदेशीर वर्तुळात गडचिरोली पोलिसांचे विशेष कौतुक होत आहे. ही घटना ०८ जून २०२६ रोजी चामोर्शी येथे घडली होती. आरोपी प्रज्वल ऊर्फ नारू सदाशिव भांडेकर (वय २५) याने पीडित चिमुकलीवर तिच्या घरातील स्लॅबच्या भिंतीचा फायदा घेऊन अत्याचार केला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन, पीडितेच्या आईच्या फिर्यादीवरून चामोर्शी पोलीस ठाण्यात अप.क्र. २८०/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता कलम ६४ (१), ६५ (२) आणि पॉक्सो कायद्याच्या कलम ४ व ६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच, पोलीस अधीक्षक एम. रमेश आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे यांनी तातडीने घटनास्थळाला भेट दिली. आरोपीचा शोध घेण्यासाठी तीन समांतर तपास पथके तयार करण्यात आली. तांत्रिक आणि भौतिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी अवघ्या १२ तासांच्या आत आरोपीला बेड्या ठोकल्या. काही महिन्यांपूर्वी पुणे ग्रामीण पोलिसांनी नसरापूर येथील एका बाल अत्याचार प्रकरणात केवळ १५ दिवसांत १,२०० पानांचे दोषारोपपत्र दाखल करून एक आदर्श निर्माण केला होता. त्याच धर्तीवर, गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या नेतृत्वाखालील तपास पथकाने कोणतीही कसर न सोडता २८ दिवसांत तपास पूर्ण केला. दुर्गम गडचिरोलीसारख्या भागात पोलिसांनी दाखवलेली ही तत्परता ऐतिहासिक मानली जात आहे. तपासादरम्यान आरोपी प्रज्वल भांडेकर याच्यावर यापूर्वी २०१९ मध्ये विनयभंग आणि ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल असल्याचे समोर आले. आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेता, त्याला कायद्यातून कोणतीही पळवाट मिळू नये यासाठी तपास अधिकारी सह पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे यांनी वैज्ञानिक आणि साक्षीदारांचे सबळ पुरावे गोळा केले. या पुराव्यांच्या आधारे अवघ्या एक महिन्यात (२८ दिवसांत) न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आले.
Source link
चामोर्शीतील चिमुकलीवरील अत्याचार: 28 दिवसांत आरोपपत्र दाखल:गडचिरोली पोलिसांकडून जलद तपास, पीडितेला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न
