कोल्हापुर – गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत.

शहरात आतापर्यंत 54 झाडे कोसळल्याची नोंद झाली असून, जिल्हाभरात सुमारे 252 झाडे पडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
शहरात पडलेल्या झाडांपैकी 32 धोकादायक वृक्ष महापालिकेच्या अग्निशमन विभागाने हटवले आहेत. सुमारे 22 टन लाकूड संकलित करण्यात आले असून त्याची विल्हेवाट लावण्याचे काम सुरू आहे.

विद्युत लाईनच्या आडवी येणाऱ्या झाडांची एकाच बाजूने तोड करणे, मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी ही परिस्थिती निर्माण झाली. नागरिकांनी धोकादायक झाडांपासून दूर राहावे आणि तातडीने महापालिकेला माहिती द्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

