Headlines

जुलै महिन्यात आयपीओंवर गुंतवणूकदारांची नजर


45 हजार कोटी रुपयांची होणार उभारणी, एसबीआय फंड मॅनेजमेंट, मणिपाल व झेप्टो आणणार आयपीओ

वृत्तसंस्था नवी दिल्ली 

जुलै महिन्यामध्ये विविध कंपन्यांचे आयपीओ शेअर बाजारात येण्यासाठी सज्ज  आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये आयपीओंची संख्या कमी दिसून आली होती. पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर विविध कंपन्यांनी आपले आयपीओ सादरीकरण करणे टाळले होते. याच दरम्यान जुलै महिन्यात विविध कंपन्या आपला आयपीओ आणून मिळून 45 हजार कोटी रुपये उभारण्याची योजना आखत असल्याचे समजते.

गुंतवणूक बँकर्सच्या माहितीनुसार विविध क्षेत्रातील कंपन्या आपला आयपीओ लॉन्च करण्यासाठी या महिन्यामध्ये प्रयत्न करतील. बाजारातील सध्याची स्थिती ही निवळलेली असून सेन्सेक्स आणि निफ्टी चढ उताराच्या पार्श्वभूमीवर मजबुती कायम राखण्याचा प्रयत्न करत आहे.

यांच्या आयपीओवर लक्ष

गेल्या आठवड्यात बाजारात तेजी होती. याच दरम्यान एसबीआय फंड मॅनेजमेंट यांचा आयपीओ या महिन्यात लॉन्च होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 14 ते 15 जुलैला हा आयपीओ गुंतवणूकीसाठी खुला होणार असल्याचे समजते. 21 जुलैला समभाग बाजारात सुचीबद्ध होऊ शकतो. कदाचित हा आयपीओ सर्वात मोठ्या मूल्याचा ठरू शकतो. 12000 ते 13000 कोटी रुपये आयपीओच्या माध्यमातून उभारण्याची योजना एसबीआय फंड्स मॅनेजमेंट यांची आहे. या पाठोपाठ मणिपाल हेल्थ एंटरप्राइझेस यांचाही आयपीओ बाजारात दाखल होऊ शकतो. मणिपाल या आयपीओच्या माध्यमातून 11 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिकची रक्कम उभारण्याची शक्यता वर्तवली जात आहे या पाठोपाठ झेप्टो ही कंपनी 8000 कोटी रुपयांचा आयपीओ आणण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या तीन आयपीओंचे मूल्य 40 हजार कोटी रुपयांवर पोहोचते. गजा कॅपिटल, नॅक पॅकेजिंग, इनोव्हेटिव्ह व्ह्dयू यासारख्या कंपन्याही आपला आयपीओ दाखल करू शकतात.

काय म्हणाल्या सोनिया दास गुप्ता

जे एम फायनान्शियलच्या व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ (इन्व्हेस्टमेंट बँकिंग) सोनिया दास गुप्ता यांच्या मते येणाऱ्या काळामध्ये आयपीओ दाखल करण्यासाठी कंपन्यांची लगबग वाढताना दिसणार आहे. जगभरामधील अनिश्चितता आता कमी झाली असून भारतीय गुंतवणूकदारांचा भरवसा बाजारावर पुन्हा एकदा दिसू लागला आहे. 2025 च्या दुसऱ्या सहा महिन्यांमध्ये म्हणजेच जुलै ते डिसेंबर या कालावधीत बाजारात चांगली तेजी पाहायला मिळाली होती. परंतु या कालावधीत आयपीओची संख्या म्हणावी तशी वाढीव दिसून आली नाही. पश्चिम आशियातील युद्धाचा तणाव आणि विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करण्याकडे केलेले दुर्लक्ष यामुळे बाजारातील स्थिती दोलायमान होती.

18 आयपीओ आजवर बाजारात लाँच

यावर्षी पाहता एप्रिलपर्यंत 18 आयपीओ सादर करण्यात आले आहेत पण यानंतरच्या मे महिन्यात मात्र एकाही कंपनीने आपला आयपीओ बाजारात उतरवला नाही. जाणकारांच्या मते पश्चिम आशियातील तणाव कमी झाला असून जागतिक पातळीवरची स्थिती आता सामान्य होऊ पाहते आहे. ही परिस्थिती पाहूनच गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास पुन्हा वाढीच्या दिशेने सरकलेला आहे.

सोनिया दास गुप्ता यांच्या मते गुंतवणूकदार अशाच कंपन्यांना पसंत करत आहेत ज्यांचा पाया मजबूत आहे. भविष्यात विकासाची शक्यता अधिक आहे आणि व्यवसायाची स्थिरता दीर्घकाळासाठी टिकणारी आहे, अशा कंपनीमध्येच गुंतवणूकदार गुंतवणूक करण्यासाठी इच्छुक आहेत.

 किती कंपन्यांना हिरवा कंदील

19 जूनपर्यंत पाहता शेअर बाजारातील नियामक सेबी यांनी जवळपास 173 कंपन्यांना आयपीओ सादरीकरणासाठी मंजुरी दिली आहे. या सर्व कंपन्यांच्या आयपीओच्या माध्यमातून एकंदर 2.7 लाख कोटी रुपये उभारण्याची योजना आहे. या दरम्यान आणखी 64 कंपन्यांना सेबीची मंजुरी मिळणे बाकी आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाचा म्हणजे एनएसई यांचा आयपीओ असून या पाठोपाठ जिओ प्लॅटफॉर्मचा आयपीओ देखील सर्वात मोठा ठरणार आहे. एनएसई आयपीओच्या माध्यमातून 30000 कोटी रुपयांची मोठी रक्कम उभारणार आहे.

 

 



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत