► वृत्तसंस्था कोलंबो
श्रीलंकेत कैद्यांमध्ये झालेल्या हिंसक संघर्षात 25 जण ठार झाल्याचे सोमवारी जाहीर करण्यात आले. तसेच सुमारे 100 जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मृतांमध्ये तुरुंग अधिकाऱ्यांचा समावेश असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. कारागृहातील कैद्यांमध्ये उफाळलेल्या हिंसाचारानंतर मदतीसाठी श्रीलंकेच्या लष्कराला पाचारण करण्यात आले होते.
परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कारागृह प्रशासनाने लष्करी मदतीची मागणी केली होती.
हिंसाचाराची घटना श्रीलंकेच्या नेगोंबो या किनारपट्टीवरील शहरातील कारागृहात घडली. हे कारागृह कोलंबोच्या उत्तरेला सुमारे 35 किलोमीटर अंतरावर आहे. संघर्षाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. दोषी ठरलेले कैदी आणि अटकेत असलेले कैदी यांच्यात रविवारी संघर्षाला सुरुवात झाली.
स्थानिक दूरचित्रवाणी वाहिनी ‘हिरू’नुसार, मृतांमध्ये कैदी आणि तुरुंग अधिकारी या दोघांचाही समावेश आहे. या हिंसक संघर्षादरम्यान काही कैद्यांनी तुरुंगातील शस्त्रे हिसकावून घेतल्यानंतर हिंसाचार वाढला आणि परिस्थिती जीवघेणी बनली, अशी माहिती देण्यात आली. लष्कराच्या हस्तक्षेपानंतर आता परिस्थिती नियंत्रणात आली असली तरी तणावपूर्ण स्थिती कायम आहे.
