Ayodhya-Badrinath Temple Donation Theft: अयोध्येतील राम मंदिराच्या देणग्यांमध्ये अफरातफरीचे आरोप होत असतानाच आता बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीने बद्रीनाथ धाममधील अर्पण केलेल्या देणग्यांबाबत अशाच आरोपांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

भारतातील मंदिरे किती श्रीमंत
भारतात तब्बल 8 ते 10 लाख मंदिरे आहेत, यापैकी अंदाजे चार लाख आणि त्यांचे विश्वस्त विविध राज्य सरकारांनी घालून दिलेल्या विशिष्ट धार्मिक कायदा आणि भारतीय विश्वस्त कायदा, 1882 नुसार थेट नियंत्रित केले जातात. या सर्व सरकारी आणि निम-सरकारी नियंत्रणाखालील मंदिरांची अंदाजित संपत्ती 9 लाख कोटी रुपयांपेक्षा म्हणजे अंदाजे 1.2 ट्रिलियन डॉलर्सपेक्षा जास्त असल्याचा अंदाज असून ही रक्कम मोठ्या राज्यांच्या वार्षिक अर्थसंकल्पापेक्षा जास्त आहे.
कोणत्या राज्यात सर्वाधिक मंदिरे
दक्षिण भारतातील तामिळनाडू राज्यात सर्वाधिक मंदिरे आहेत. तामिळनाडूमध्ये अंदाजे 79,154 नोंदणीकृत मंदिरे असून त्याचे व्यवस्थापन राज्य सरकारद्वारे केले जाते. त्यानंतर महाराष्ट्रात 77,283 नोंदणीकृत मंदिरे, मग पश्चिम बंगाल 53,६658 मंदिरांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.
बनारस आणि काशीमध्ये मंदिरांचे व्यवस्थापन कोण करते?
उत्तर प्रदेशात 37,500 हून अधिक नोंदणीकृत मंदिरे आणि धार्मिक विश्वस्त संस्था आहेत. या राज्यातील तीन सर्वात महत्त्वाची धार्मिक स्थळे – काशी, अयोध्या आणि मथुरा – पूर्णपणे किंवा अंशतः सरकारच्या अखत्यारीत आहेत. बनारसमधील काशी विश्वनाथ मंदिर पूर्णपणे सरकारच्या नियंत्रणाखाली असून व्यवस्थापनावर वाराणसीच्या आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील विश्वस्त मंडळाद्वारे देखरेख केली जाते. तसेच मथुरेतील प्रसिद्ध बांके बिहारी मंदिराचे कामकाज सुरळीत चालू राहण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने निवृत्त उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.
तिरुमला तिरुपती सर्वात श्रीमंत देवस्थान
देशभरातील मंदिरांपैकी तिरुमला तिरुपती देवस्थानमला सर्वाधिक देणग्या किंवा दान दिले जाते. या मंदिराला दरवर्षी 1,880 कोटींची देणगी मिळते, तसेच ऑनलाईन तिकीट विक्री आणि प्रसादातून अतिरिक्त 1000 कोटींचा महसूल मिळतो. आंध्र प्रदेश सरकारच्या नेतृत्वातील मजबूत ट्रस्ट या मंदिर संपत्तीचे व्यवस्थापन करते. याशिवाय फसवणूकीची शक्यता कमी करण्याच्या उद्देशाने तिरुपती मंदिराने एक मजबूत UPI-आधारित डिजिटल देणगी प्रणाली लागू केली असून सोने-चांदी दान करणाऱ्यांना थेट प्रशासकीय कार्यालयात जाऊन पावती घेणे अनिवार्य आहे.
9 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती
देशातील प्रमुख मंदिरांपैकी तिरुपती मंदिराला अंदाजे 1880 कोटी, माता वैष्णो देवी मंदिराला 250 कोटी, अयोध्या राम मंदिराला 150 कोटी, मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराला 100 कोटी, काशी विश्वनाथ मंदिराला 80 कोटी आणि जगन्नाथ पुरी मंदिराला वार्षिक 18 कोटींची देणगी मिळते. अशाप्रकारे, देशातील 10 सर्वात श्रीमंत मंदिरांची एकूण संपत्ती 9 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचा ग्लोबल वेल्थ इंडेक्सच्या आकडेवारीवरून उघड होते.
मंदिरांमध्ये कुठे ठेवली जाते देणगी, सोने-चांदी
गेल्या दोन वर्षात सोने-चांदीच्या किमतीत प्रचंड वाढ झाल्यामुळे या काळात मंदिरांच्या संपत्तीत लक्षणीय वाढ झाली आहे. तिरुपती देवस्थानमकडे 3 लाख कोटींच्या संपत्तीचा अंदाज असून मंदिर प्रशासनाने वेगवेगळ्या बँकांमध्ये 10 टनांहून अधिक सोने जमा केले आहे. त्यानंतर केरळमधील तिरुवनंतपुरम येथील पद्मनाभस्वामी मंदिर आपल्या गुप्त ‘तिजोऱ्यां’साठी जगभर प्रसिद्ध असून येथे प्राचीन सोन्याची नाणी, हिरे, रत्ने आणि मौल्यवान मूर्तींनी मंदिराची तिजोऱ्या भरलेल्या आहेत. तसेच मंदिर ट्रस्टकडे शेकडो एकर महागडी जमीनही आहे.

