Pakistani General Statement On Indian Missiles: भारताचा क्षेपणास्त्र कार्यक्रम आता इतका विकसित झाला आहे की, आता केवळ पाकिस्तान आणि चीनच नाही, तर युरोप-अमेरिकाही भारताच्या टप्प्यात येतील.

भारताच्या अग्नि मिसाइलने पाकिस्तान हादरला
सेंटर फॉर इंटरनेशनल स्ट्रॅटेजिक स्टडीज तर्फे आयोजित केलेल्या पाकिस्तानच्या अणूकार्यक्रमावरील एका कार्यक्रमात राष्ट्रीय कमान प्राधिकरणाचे सल्लागार लेफ्टिनेंट जनरल मजहर जमील यांनी एक वक्तव्य केले. त्यांनी दावा केला की, भारताच्या इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाइलचा उद्देश भारताला अशी जागतिक अणूशक्ती बनवणे आहे ज्याच्या टप्प्यात प्रमुख पाश्चिमात्य देशांच्या राजधान्या देखील येऊ शकतील.
पाश्चिमात्य देशांना सावध राहण्याचा सल्ला
तसेच मजहर यांनी पाश्चिमात्य देशांच्या सरकारांना भारताच्या या वाढत्या लष्करी आधुनिकीकरणाची गंभीर दखल घेण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी स्पष्ट केले की, भारताच्या या क्षेपणास्त्र प्रणाल्या पाश्चिमात्य देशांच्या राजधान्यांपर्यंत पोहोचू शकतात. हे भारताच्या लष्करी आधुनिकीकरणाचा एक महत्त्वाचा भाग आहे. त्यांनी पाश्चिमात्य देशांना या बाबतीत सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.
भारताकडे असलेली लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे
पाकिस्तानी जनरलच्या या वक्तव्यावरून स्पष्ट होते की, भारताने विकसित केलेल्या आणि सध्या प्रगत टप्प्यात असलेल्या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्रांमुळे पाश्चिमात्य जगाची झोप उडाली आहे. भारताच्या ताकदीची झलक दाखवणाऱ्या काही प्रमुख क्षेपणास्त्रांची माहिती खालीलप्रमाणे आहे:
- अग्नि-5 (Agni-V): अधिकृतपणे 5,500 किमी रेंज असलेली ही मिसाइल संरक्षण तज्ज्ञांच्या मते 8,000 किमीपर्यंत लक्ष्य करू शकते. यात वापरण्यात आलेले एमआयआपव्ही तंत्रज्ञान एकाच वेळी अनेक शहरांवर अचूक अणू हल्ला करण्यास सक्षम आहे.
- अग्नि-6 (Agni-VI): हे भारताचे नवीन सुपर अस्त्र बनवण्याचे काम शेवटच्या टप्प्यात आले आहे. जून 2026 मध्ये ओडिशा समुद्रकिनाऱ्यावर त्याची चाचणी होणार असल्याने तिथे सतर्कता बाळगण्यात आली आहे. हे क्षेपणास्त्र 8,000 ते 12,000 किमीपर्यंत जाऊ शकते. याचा अर्थ ते अमेरिका आणि युरोपलाही लक्ष्य करू शकते. हे क्षेपणास्त्र अमेरिकेच्या थाड (THAAD) सारख्या मजबूत संरक्षण यंत्रणेला देखील टक्कर देऊ शकते.
- K-सिरिज (K-4, K-5, K-6): ही खास क्षेपणास्त्रे जमिनीवरून नाही, तर पाण्याखालून पानबुडीतून डागली जातात. यांची रेंज 6,000 ते 8,000 किलोमीटर इतकी प्रचंड आहे. म्हणजेच पानबुडी हिंदी महासागरात कुठेही लपलेली असेल, तरीही तिथून जगातील कोणत्याही कोपऱ्यात असलेल्या शत्रूला अचूक लक्ष्य करू शकतो.
पाकिस्तानची भारताला धमकी देण्याची मजल
दरम्यान, भारताच्या या जागतिक ताकदीचा धसका घेत जनरल जमील यांनी मे महिन्यात भारतासोबत झालेल्या संघर्षचाही उल्लेख केला. त्यावेळी पाकिस्तानने निवडलेला शांत राहण्याचा एक सुविचारित निर्णय होता, असा दावा त्यांनी केला. मात्र, भारताच्या हातून इतक्या वेळा जोरदार मार खाऊनही, कोडगा पाकिस्तान कधीही सुधारणार नाही हे सिद्ध करताना, त्यांनी ‘भविष्यात भारताकडून कोणत्याही लष्करी कारवाईचा प्रयत्न झाल्यास पाकिस्तानकडून चोख आणि निर्णायक प्रत्युत्तर दिले जाईल’ अशी पोकळ धमकीही दिली.

