Sindhudurga internal conflict within bjp serious allegations against ravindra chavan and his brother in law; रवींद्र चव्हाणांनी पक्षाच्या उमेदवारांविरोधात रसद पुरवल्याचा आरोप
Sindhudurga internal conflict within bjp serious allegations against ravindra chavan and his brother in law; रवींद्र चव्हाणांनी पक्षाच्या उमेदवारांविरोधात रसद पुरवल्याचा आरोप
सिंधुदुर्ग: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळालं. कोकणातही राणेंच्या नेतृत्वात भाजपने विजय खेचून आणला. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात अपक्षांच्या विजयाने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं असून यातून भाजपमधील अंतर्गत वादही उफाळून आला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे महायुतीत मिठाचा खडा टाकत असल्याचा हल्लाबोल नगरपरिषद आणि नगरपालिका निवडणुकांवेळी शिवसेनेचे आमदार नीलेश राणे यांनी केला होता. त्यानंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीतही रवींद्र चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. रवींद्र चव्हाण यांनी मेहुणे विनोद राऊळ यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपच्या उमेदवारांविरोधातच अपक्षांना बळ देत निवडून आणल्याचा आरोप भाजपमधील एका गटाकडून केला जाऊ लागला आहे.
तळकोकणात दोन महिन्यांपूर्वी झालेल्या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत भाजपचा बोलबाला राहिला होता. राणेंच्या नेतृत्वाखाली महायुतीला विजय मिळाला. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतही भाजपचे खासदार नारायण राणे , मंत्री नितेश राणे व आमदार नीलेश राणे यांचा करिष्मा पाहायला मिळाला. पण या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात अपक्ष उमेदवार निवडून आल्याने राणेंच्या वर्चस्वाला काही प्रमाणात धक्का बसल्याची चर्चा सुरू आहे. सावंतवाडी तालुक्यात जिल्हा परिषद गटात काही अपक्ष निवडून आल्याने मंत्री नितेश राणे यांनी जाहीर नाराजी व्यक्त करत खडेबोल सुनावले. या अपक्षांच्या विजयामागे अदृश्य शक्तीचा हात असून छातीवर कमळ लावून काही नेते कमळ चिन्हाच्याच उमेदवारांना पाडण्यासाठी ताकद लावतात, अशा शब्दांत मंत्री नितेश राणे यांनी निकालाच्या दिवशीच आपली नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता राणेसमर्थक उमेदवारांनीही थेट नाव घेत आरोप केले आहेत.
या निवडणुकीत भाजपाचे जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांचा पराभव करून सावंतवाडी तालुक्यात कोलगाव जिल्हा परिषद गटातून मायकेल डिसूजा हे अपक्ष म्हणून निवडून आले. या विजयाचे श्रेय आमचे मार्गदर्शक रवींद्र चव्हाण यांना देणार, अशी प्रतिक्रिया मायकेल डिसूझा यांनी विजयानंतर दिल्याने आश्चर्य व्यक्त झाले. इतकंच नाही तर रवींद्र चव्हाण यांचे मेहुणे विनोद राऊळ यांच्या समर्थकांनी विजयाच्या घोषणा दिल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. तर मायकेल डिसूजा यांच्या विजयानंतरच्या बॅनरवर रवींद्र चव्हाण यांचे फोटो झळकल्याने उलट सुलट राजकीय चर्चा रंगली होती. मात्र हे बॅनर आता काढण्यात आले आहेत. हे बॅनर आपण नाही तर आपल्या कार्यकर्त्यांनी लावले होते, असं स्पष्टीकरण मायकल डिसूजा यांनी दिलं आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या अपक्ष उमेदवारांना अदृश्य शक्तीच्या हातांनी पुरवलेली रसद, याची चर्चा रंगली आहे.
दुसरीकडे, सावंतवाडी माडखोल गटातून सुप्रिया रविंद्र मडगावकर या भाजपच्या चिन्हावर उभ्या होत्या. सुप्रिया यांना भाजपकडून अधिकृत उमेदवारी मिळाली होती. मात्र असं असताना रवींद्र चव्हाण यांचे मेहुणे विनोद राऊळ यांनी अपक्ष उमेदवार उभे करून करून पक्षाच्या विरोधात उमेदवार निवडून आणले, असा खळबळजनक आरोप सुप्रिया मडगावकर यांचे पती आणि सावंतवाडीच्या पंचायत समितीचे माजी सभापती रविद्र मडगावकर यांनी केला आहे. “2019 मध्येच आम्ही राणेसाहेबांबरोबर भाजपामध्ये प्रवेश केला. त्यानंतर पक्षवाढीसाठी सातत्याने काम केलं. आम्ही राणे समर्थक असल्याने आमच्यासमोर अपक्ष उमेदवार उभे करण्यात आले,” असा आरोप मडगावकर यांनी केला आहे. सावंतवाडी तालुक्यात माडखोल, कोलगाव व इन्सुली या तीनही जिल्हा परिषद गटांमध्ये तर काही पंचायत समिती गणांमध्येही अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत.
दरम्यान, प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यापासून रवींद्र चव्हाण हे राज्यभर पक्षवाढीसाठी दौरे करत आहेत. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात ते पक्षातीलच नेत्यांचे पंख छाटण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा आरोप झाल्याने भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. या सगळ्या वादावर रवींद्र चव्हाण हे आगामी काळात नेमकं काय स्पष्टीकरण देतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा