या लेखमालेतून शब्दांच्या माध्यमातून साधनेचा मार्ग उलगडण्याचा अल्पसा प्रयत्न झाला. मात्र, आत्मानुभवाचे आकाश शब्दांच्या सीमांपलीकडे आहे.

मागील सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या या आत्मचिंतन यात्रेचा आज औपचारिक समारोप होत आहे; परंतु साधनेचा मार्ग कधीच समाप्त होत नाही. कारण आत्मशोधाच्या वाटेवर प्रत्येक समाप्ती ही नव्या अनुभूतीच्या उदयाची नांदी ठरत असते. बाह्य जगातील असंख्य आकर्षणे, अपेक्षा आणि संघर्ष यांच्या कोलाहलात मनुष्य स्वतःपासूनच दूर जातो. अशा वेळी आत्मदर्शी सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली केलेली साधना ही अंतर्मनाच्या गुहेत नेणारी दीपशिखा ठरते.
आत्मचिंतनाच्या निश्चल सरोवरात विचारांचे तरंग निवळू लागतात, तेव्हा मनाला स्वतःच्या अस्तित्वाचे सूक्ष्म स्पंदन ऐकू येऊ लागते. त्या नीरव क्षणांत साधकाला साक्षात्कार होतो की, खरे सुख बाहेर नव्हे, तर स्वतःच्या अंतर्यामीच दडलेले आहे. अष्टांगयोगाच्या प्रत्येक पायरीतून मन शुद्ध होत जाते, वासनांचे धुके विरळ होत जाते आणि चित्ताकाशात आत्मप्रकाशाचा अरुणोदय घडू लागतो. ध्यानाच्या अखंड साधनेतून अहंकाराची कवचे गळून पडतात आणि जीवाला आपल्या खऱ्या स्वरूपाची अर्थात आत्मस्वरूपाची ओळख होऊ लागते. हाच आत्मसाक्षात्काराचा प्रारंभ असतो.
आत्मस्वरूपाची प्राप्ती म्हणजे एखाद्या नवीन गोष्टीचा लाभ नव्हे; तर विस्मृतीत गेलेल्या चिरंतन सत्याचे पुनःस्मरण करणे होय. जसा मेघ दूर झाल्यावर सूर्य स्वतःचे तेज प्रकट करतो, तसा अज्ञानाचा पडदा दूर झाल्यावर आत्मतत्त्वाचे दिव्य वैभव स्वतःच प्रकट होते. तेथे सुख-दुःख, लाभ-हानी, यश-अपयश यांच्या द्वंद्वांना स्थान राहत नाही; उरते ती केवळ शाश्वत शांती, निर्मळ आनंद आणि चैतन्याचा अविरत झरा.
अखेर, ध्यानाच्या गहन नीरवतेत, आत्मचिंतनाच्या पवित्र प्रवाहात आणि समाधीच्या परमशांत अवस्थेत साधकाला उमगते की, ज्याचा शोध जन्मोजन्मी घेतला, तो परमात्मा आणि आत्मा वेगळे नसून, ‘अहं ब्रह्मास्मि’ या अनुभूतीतच जीवनाचे अंतिम सार दडलेले आहे. सद्गुरू जंगलीदास माऊली सांगतात, तो ‘आत्मा’च खरा या देहाचा ‘मालिक’ आहे. ही आत्मज्योत प्रत्येकाच्या अंतःकरणात अखंड प्रज्वलित राहो आणि जीवनाचा प्रत्येक श्वास आत्मस्वरूपाच्या अनुभूतीने सुवासित होवो, हीच सदिच्छा. आत्मा मालिक.

