Headlines

Sachin Ahir: सचिन अहिरांचं नाव घेताना शिंदे चुकले, सगळेच हसले; ठाकरेंना धक्का, 30 जूनचा योगायोगही सांगितला


Sachin Ahir: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का दिला आहे. ठाकरेसेनेचे विधान परिषदेचे आमदार, उपनेते सचिन अहिर यांना शिंदेंनी पक्षात घेत विधान परिषदच्या उपसभापतीपदाची उमेदवारी दिली आहे.

sachin ahir and shinde
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई: विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी महायुतीकडून सचिन अहिर यांनी अर्ज दाखल केला आहे. कालपर्यंत शिवसेना उबाठामध्ये असलेल्या सचिन अहिर यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. यानंतर शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत त्यांचं पक्षात स्वागत केलं. शिवसेना कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. त्यामुळेच आज बरेच जण पक्षात स्वत:हून येत असल्याचं त्यांनी सांगितलं.

आज आमदार सचिन तेंडुलकर, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेला सुरुवात केली. यानंतर त्यांनी आपली चूक दुरुस्त करत आमदार सचिन अहिर अशी सुधारणा केली. अहिर यांनी सचिन प्रमाणेच आज षटकार मारल्याचं म्हणत शिंदेंनी त्यांचं कौतुक केलं. गेल्या आठवड्यात ६ खासदारांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांनी षटकार ठोकले. आज सचिन अहिर यांनी षटकार ठोकल्याचं शिंदे म्हणाले.

सहा खासदार आमच्या पक्षात येताच काही लोक त्यांच्या मतदारसंघात गेले. तुडवण्याची भाषा केली. पण आम्ही जोडण्याची भाषा करतो. आम्ही तोडकाम नाही, जोडकाम करतो, अशा शब्दांत शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर नाव न घेता टीका केली. विधानसभेचे तीन टर्मचे आमदार, एक टर्म विधान परिषदेचे सदस्य, कामगारांचे नेते, गिरणी कामगारांच्या, कोळ्यांच्या समस्यांशी जाण असलेले नेते असलेले सचिन अहिर अशा शब्दांत शिंदे यांनी सचिन अहिर यांचं कौतुक केलं.

२२ जून २०२२ रोजी आम्ही शिवसेनेत उठाव केला. बाळासाहेबांचे विचार जपण्यासाठी, धनुष्यबाण जपण्यासाठी आम्ही उठाव केला. त्या उठावानंतर ३० जून २०२२ रोजी मी मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेतली. योगायोग म्हणजे आज त्याला ४ वर्षे पूर्ण झाली आहेत. आज ३० जून आहे. त्याच दिवशी सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो, असं शिंदे म्हणाले.

सचिन अहिर यांच्या पक्षप्रवेशामुळे कामगार क्षेत्रात शिवसेनेची ताकद वाढली आहे. महायुतीकडे विधानसभेत, विधान परिषदेत बहुमत आहे. त्यामुळे सचिन अहिर सहज निवडून येतील. यापुढे ते केवळ मुंबईत नव्हे, तर राज्यसभरात काम करताना दिसतील. शब्दाला पाळणाऱ्या, बाळासाहेबांचे विचार पुढे नेणाऱ्या पक्षात सचिन अहिरांचं स्वागत आहेत. शिवसेनेत त्यांना नक्की न्याय मिळेल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.

कुणाल गवाणकर

लेखकाबद्दलकुणाल गवाणकरकुणाल गवाणकर हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. मे २०२२ पासून ते मटा ऑनलाईनमध्ये काम करत आहेत. प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल अशा तिन्ही माध्यमांचा एकत्रित १४ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठिशी आहे. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचं लेखन करण्याचा अनुभव आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि त्यासंदर्भातील बातम्या यावरही त्यांचा हातखंडा आहे.

पत्रकारितेतील अनुभव
बीएमएमचं शिक्षण घेत असताना सकाळ वृत्तपत्रातून त्यांनी बातमीदारीला सुरुवात केली. वयाच्या १९ व्या वर्षी ते सकाळमध्ये अंशकालीन बातमीदार म्हणून रुजू झाले. शहरातील मुलभूत समस्या, लोकांना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या अडचणी यावर त्यांनी वृत्तांकन केलं. त्यांनी केलेल्या बातम्यांमुळे काही समस्या सुटण्यास मदत झाली. मुंबईच्या दहिसर येथील गोदावरी ही मराठी माध्यमाची शाळा बंद होणार होती. त्यामुळे गरीब घरातील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. हा प्रश्न त्यांनी बातमीच्या माध्यमातून मांडला. त्यामुळे ही शाळा वाचली. त्याबद्दल तिथल्या शिक्षकांनी ‘सकाळ’चं कौतुक केलं होतं.

मालाडमधील एका खासगी संस्थेला दहिसरमध्ये नाममात्र दरात रुग्णालयासाठी दिलेली जागा, तिथे त्यांनी नियम मोडून खासगी वापरासाठी, श्रीमंत रुग्णांसाठी केलेली व्यवस्था, त्या रुग्णालयाचं दोन आमदारांनी केलेलं उद्घाटन, या सगळ्याबद्दल सखोल माहिती देणारी वृत्तमालिका विशेष गाजली. आमदारांनी सार्वजनिक निधीचा खासगी इमारतींमध्ये केलेला वापर, नियम धाब्यावर बसवून केलेली कामं या बातम्यांचीदेखील विशेष चर्चा झाली. जनतेचे प्रश्न मांडण्याचं काम त्यांनी सातत्यानं केलं.

‘जय महाराष्ट्र’ च्या माध्यमातून २०१३ मध्ये टीव्ही मीडियात पाऊल टाकलं. सुरुवातीला फास्ट न्यूजच्या बुलेटिनची जबाबदारी सांभाळली. त्यानंतर जनरल बुलेटिन प्रोड्युसर म्हणून काम केलं. ‘मोहीम’ या प्राईम टाईममधील विशेष कार्यक्रमासाठी प्रोड्युसर म्हणून काम पाहिलं, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीशी संबंधित कार्यक्रमांचं संकलन केलं.

टीव्ही ९ मराठी वृत्तवाहिनीत स्पेशल पॅकेज लिहिण्याची जबाबदारी पार पडली. स्पेशल रिपोर्ट या प्राईम टाईम शोचा प्रोड्युसर म्हणून काम केलं. एकाच विषयाचे विविध पैलू प्रेक्षकांना उलगडून सांगण्याचं कौशल्य या शोमधून त्यांनी आत्मसात केलं.

लोकसत्ताच्या माध्यमातून त्यांनी २०१६ मध्ये ‘डिजिटल’ क्षेत्रात पदार्पण केलं. महाराष्ट्र, देश आणि आंतरराष्ट्रीय बातम्या करण्याची जबाबदारी त्यांना मिळाली. मुंबईसह महत्त्वाच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, त्यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांनी इथे मिळाली. डिजिटल माध्यमात पहिल्यांदाच न्यूजरुम बुलेटिनचा प्रयोग झाला. त्यात त्यांनी अनेकदा सूत्रसंचालनाची भूमिका बजावली. २०१७ मध्ये ‘लव्ह डायरीज’ नावाची प्रेमकथांना समर्पित असलेली मालिका सुरु करण्यात आली. त्यातील अनेक कथा त्यांनी लिहिल्या होत्या. या मालिकेतील बऱ्याचशा कथांचं कौतुक झालं.

लोकमत डिजिटलमध्ये त्यांनी २०१८ ते २०२२ अशी चार वर्षे काम केलं. लोकसभा, विधानसभा निवडणूक, प्रचारसभा, निकाल यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांना मिळाली. पाच राज्यांच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, निकालांचं विश्लेषण करण्याची, घडामोडींचे विविध कंगोरे उलगडून वाचकांपुढे ठेवण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली. जोक सेक्शनपासून ते अमेरिकेच्या व्हिसाशी संबंधित मालिकेपर्यंत सर्वदूर मुशाफिरी करण्याची संधी त्यांना इथे मिळाली. आकर्षक मथळ्यांमुळे त्यांच्या बातम्या वाचकांच्या पसंतीस उतरल्या.

२०२२ पासून महाराष्ट्र टाइम्ससाठी काम करताना त्यांनी राज्य ते राष्ट्रीय स्तरावरील राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, क्रीडा या क्षेत्रातील बातम्यांना प्राधान्य दिलं. बातमी मागील बातमी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सातत्यानं केला. घडामोडींचं विश्लेषण करणारे लेख त्यांनी लिहिले. एकनाथ शिंदे यांचं बंड, राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट, त्यामुळे बदललेलं राजकारण या नाट्यमय घडामोडींवर त्यांनी विस्तृत लिखाण केलं. सखोल माहिती घेऊन घडामोडींचं विश्लेषण करण्याची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली. घटनांमागील रंजक घडामोडी, वर्तमानातील बातम्यांची पार्श्वभूमी, त्यांचे होणारे परिणाम, सत्ताकारणासाठी सुरु असलेले शह-काटशह यावर त्यांनी सविस्तर लिखाण केलं. भाजपचे माजी खासदार आणि वरिष्ठ नेते किरीट सोमय्या यांना भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन रोखठोक सवाल करणारा त्यांचा व्हिडीओ समाज माध्यमांवर विशेष गाजला.

शैक्षणिक पात्रता
कुणाल गवाणकर यांनी २०१३ मध्ये पाटकर महाविद्यालयातून बीएमएमची पदवी संपादन केली. शालेय आणि बारावीपर्यंतचं शिक्षण दहिसरमधील शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीत झालं. विद्यार्थीदशेत असतानाच त्यांना लिखाणाची गोडी लागली. मराठी भाषेवर प्रभुत्व असल्यानं त्यांनी निबंध स्पर्धेत अनेक पारितोषिकं जिंकली. बारावीच्या बोर्ड परीक्षेमेध्ये मराठी विषयात कनिष्ठ महाविद्यालयातून सर्वाधिक गुणांनी उत्तीर्ण होण्याचा मान त्यांनी पटकावला. त्यानंतर त्यांनी पत्रकारिकेचं शिक्षण घेतलं. शिक्षण घेत असतानाचा त्यांनी या क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली होती.आणखी वाचा