चंद्रपूर जिल्ह्यात सध्या भाजपच्या गोटात जे काही सुरु आहे त्यावरुन राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. इथल्या नाराजीनाट्याची दखल अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घ्यावी लागली आहे. या प्रकरणात प्रदेश भाजपने मोठा निर्णय घेतला आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात भाजपच्या गोटात सध्या प्रचंड राजकीय हालचाली सुरु आहेत. राज्यात नुकत्याच नगर परिषदेच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत चंद्रपूर जिल्ह्यात भाजपचा पराभव झाला. या पराभवावरुन भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार हे आक्रमक झालेले बघायला मिळाले. सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीरपणे पक्षश्रेष्ठींच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. त्यांच्या नाराजीनंतर सुधीर मुनगंटीवार आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी मुंबईत ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी आले. दोन्ही नेत्यांमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील राजकीय घडामोडींबाबत चर्चा झाली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षातील होणारा डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला. पण त्यानंतरही आणखी काही अनपेक्षित घडामोडी घडताना बघायला मिळाल्या.
नेमकं काय-काय घडलं?
सुधीर मुनगंटीवार आणि भाजप नेते किशोर जोरगेवार यांच्यात चंद्रपूरमध्ये पक्षांतर्गत संघर्ष सुरु असल्याचं चव्हाट्यावर आलं आहे. चंद्रपूर महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रदेश भाजपने सुरुवातीला आमदार किशोर जोरगेवार यांना निवडणूक प्रमुख बनवलं होतं. पण यामुळे सुधीर मुनगंटीवार यांच्या समर्थकांच्या गोटात नाराजी असल्याची चर्चा होती. या दरम्यान मुनगंटीवार यांचं मुख्यमंत्र्यांसोबत बोलणं झालं. यानंतर पक्षाने चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या जागी माजी राज्यसभा खासदार अजय संचेती यांच्याकडे चंद्रपूर मनपाचे निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी दिली.
किशोर जोरगेवार आणि सुधीर मुनगंटीवार यांच्यात सुरू असलेल्या पक्षांतर्गत संघर्षाच्या पार्श्वभूमीवर प्रदेश भाजपने हा निर्णय घेतल्याचे बोलले जात होते. दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना उमेदवारी देताना पक्षपात होऊ नये, नेत्यांच्या गटबाजीचा फटका बसू नये, यासाठी पक्षाने बाहेरचा निवडणूक प्रमुख बनवला, असे सांगितले जात होते. पण यानंतर भाजपने पुन्हा निर्णय बदलला. किशोर जोरगेवार नाराज होतील किंवा हा निर्णय त्यांच्या जिव्हारी लागेल यामुळे पक्षाने पुन्हा जोरगेवार यांची निवडणूक प्रमुखपदी नियुक्ती केली. तर चैनसुख संचेती यांची निवडणूक निरीक्षक पदी नियुक्ती केली.
भाजपकडून डॅमेज कंट्रोल
विशेष म्हणजे चंद्रपुरात नाराजीनाट्यानंतर भाजपने डॅमेज कंट्रोल केलं आहे. चंद्रपूर महापालिका निवडणूक भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात लढवण्याचा निर्णय झाला आहे. किशोर जोरगेवार यांची पुन्हा एकदा निवडणूक प्रमुख म्हणून नेमणूक झाली आहे. तर चैनसुख संचेती यांची निवडणूक निरीक्षक पदी नियुक्ती पक्षाने केली आहे.
चंद्रपूरमध्ये नगर परिषद निवडणुकीत जे निकाल आले ते पाहून भाजप पक्ष अलर्ट झाला आहे. विशेष म्हणजे या निकालानंतर भाजपचे चंद्रपूर जिल्ह्यातील प्रमुख नेते सुधीर मुनगंटीवार यांनी पक्षश्रेष्ठींबद्दल उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. किशोर जोरगेवार यांच्या जागी अजय संचेती यांची निवडणूक प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली होती. पण त्यामुळे जोरगेवार दुखावले जातील, अशी भीती पक्षाला होती. त्यामुळे पक्षाने पुन्हा एकदा जोरगेवार यांची निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती केली. पण असं असताना चैनसुख संचेती यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. निवडणूक प्रक्रियेत केवळ जोरगेवार यांची ताकद राहू नये तर बॅलेन्स राहावं यासाठी चैनसुख संचेती यांचीदेखील नियुक्ती करण्यात आली आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पत्रक जारी केलं आहे. या पत्रकात आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूर महापालिकेची निवडणूक होईल, असा उल्लेख रवींद्र चव्हाण यांनी केला आहे. याचाच अर्थ सुधीर मुनगंटीवार यांचा मान पक्षाने राखला आहे. तसेच किशोर जोरगेवार दुखावू नये म्हणून त्यांची पुन्हा निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा