Vaibhav Sooryavanshi Duleep Trophy News : वैभव सूर्यवंशीने दुलीप ट्रॉफीच्या उपांत्य सामन्यात ८१ चेंडूंत ९२ धावांची तुफानी खेळी केली. एका मोठ्या विक्रमापासून तो थोडक्यात दूर राहिला, मात्र ५७ वर्षे जुना विक्रम मोडत इतिहास रचला.

सचिन तेंडुलकरचा विक्रम थोडक्यात हुकला
या सामन्यात वैभवने अत्यंत आक्रमक फलंदाजी करत अवघ्या ८१ चेंडूंत ९२ धावांची शानदार खेळी केली. या तुफानी खेळीत त्याने ७ चौकार आणि ७ गगनभेदी षटकार ठोकले. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट ११४ चा होता. पण, दुर्दैवाने तो केवळ ८ धावांमुळे आपल्या शतकापासून मुकला. जर त्याने हे शतक पूर्ण केले असते, तर तो दुलीप ट्रॉफीमध्ये शतक झळकावणारा सर्वात युवा खेळाडू ठरला असता. सध्या हा मोठा विक्रम ‘मास्टर ब्लास्टर‘ सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिनने १९९०-९१ मध्ये १७ वर्षे आणि २६२ दिवस वयाचा असताना हे शतक झळकावले होते.
५७ वर्षे जुना विक्रम उद्ध्वस्त
दरम्यान, शतक हुकले असले, तरी वैभवने या सामन्यात एक ऐतिहासिक विक्रम नक्कीच आपल्या नावे केला आहे. त्याने अवघ्या ४२ चेंडूंत आपले खणखणीत अर्धशतक पूर्ण केले.
IND W vs THAI W : शेफाली वर्माच्या अर्धशतकानंतर भारताची घसरगुंडी, थायलंडला दिलं १६० धावांचं आव्हान
सर्वात युवा अर्धशतकवीर
वैभव आता दुलीप ट्रॉफीच्या इतिहासात अर्धशतक झळकावणारा सर्वात युवा खेळाडू (१५ वर्षे आणि १५७ दिवस) बनला आहे. लक्ष्मण सिंग यांना टाकले मागे: याआधी हा विक्रम लक्ष्मण सिंग यांच्या नावावर होता. त्यांनी १९६९ मध्ये १६ वर्षे आणि २३ दिवस वयाचे असताना हा विक्रम केला होता. वैभवने त्यांचा हा ५७ वर्षे जुना विक्रम अखेर मोडीत काढला आहे.
फर्स्ट-क्लास क्रिकेटमधील सर्वात युवा शतकवीर कोण?
प्रथम श्रेणी क्रिकेटचा विचार केल्यास, भारताकडून सर्वात कमी वयात शतक झळकावण्याचा विक्रम पंजाबच्या ध्रुव पांडव यांच्या नावावर आहे. त्यांनी १९८८-८९ च्या रणजी हंगामात अवघ्या १४ वर्षे आणि २९३ दिवस वयात शतक ठोकले होते. जर वैभवने या सामन्यात शतक केले असते, तर तो भारताच्या प्रथम श्रेणी क्रिकेटच्या इतिहासात दुसरा सर्वात युवा शतकवीर ठरला असता.
संधी अजूनही संपलेली नाही
वैभव सूर्यवंशीचे वय सध्या केवळ १५ वर्षे आणि १५७ दिवस आहे. त्यामुळे सचिन तेंडुलकरचा दुलीप ट्रॉफीतील (१७ वर्षे, २६२ दिवस) सर्वात युवा शतकवीराचा विक्रम मोडण्यासाठी त्याच्याकडे अजूनही खूप वेळ आहे. याच सामन्याच्या दुसऱ्या डावात, संघ अंतिम फेरीत गेल्यास तिथे किंवा पुढच्या हंगामातही तो हा ऐतिहासिक रेकॉर्ड नक्कीच मोडू शकतो.

