सावंतवाडी / प्रतिनिधी : कुडाळ तालुक्यातील ओरोस परिसरातील पीठ ढवळ नदीत नारळी पौर्णिमेच्या दिवशी वाहून गेलेल्या विजय जंगले या युवकाचा मृतदेह शोधून बाहेर काढण्यात अखेर यश आले. केसरी येथील के.एस.आर. ग्लोबल एक्वेरियमच्या दोन स्कुबा डायव्हर्सनी पूरस्थितीतील खोल आणि गढूळ पाण्यात उतरून अत्यंत जोखमीचे शोधकार्य करत मृतदेह शोधून काढला.
नारळी पौर्णिमेनिमित्त पूजेचा नारळ वेचण्यासाठी विजय जंगले नदीकाठी गेले होते. यावेळी अचानक पाय घसरल्याने ते पीठ ढवळ नदीच्या खोल पात्रात पडले. पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे ते वाहून गेले आणि नदीच्या तळाशी त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पातळीवर शोधमोहीम सुरू करण्यात आली. मात्र, नदीला आलेला पूर, पाण्याचा प्रचंड वेग आणि गढूळ पाण्यामुळे शोधकार्यात मोठे अडथळे निर्माण झाले.
या कठीण परिस्थितीत केसरी येथील के.एस.आर. ग्लोबल एक्वेरियमचे स्कुबा डायव्हर्स सूरज खवणेकर आणि सुमित पराडकर मदतीसाठी पुढे आले. पूरस्थितीची पर्वा न करता दोन्ही तरुणांनी खोल पाण्यात उतरून शोधमोहीम राबवली. स्कुबा डायव्हिंगचे प्रशिक्षण घेतलेल्या या तरुणांच्या कौशल्यामुळे नदीच्या तळाशी मृतदेह शोधणे शक्य झाले.
या शोधमोहीमेत मालवणच्या जय बालाजी रेस्क्यू पथकासह एनडीआरएफच्या टीमचेही महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले. सर्वांच्या संयुक्त प्रयत्नांतून विजय जंगले यांचा मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात यश आले.
आपल्या जीवाची पर्वा न करता पूरस्थितीतील खोल आणि गढूळ पाण्यात उतरून धाडसी शोधकार्य करणारे सूरज खवणेकर आणि सुमित पराडकर तसेच या मदतकार्यात सहभागी झालेल्या संपूर्ण पथकाचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.
