- Marathi News
- National
- Uttarakhand: 13 Glacial Lakes Dangerous, But Warning System Delayed Due To Power Outage
मनमीत | डेहराडून6 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक

उत्तराखंडमधील प्रशासकीय यंत्रणेचा दिरंगाईपणा नेपाळसारख्या मोठ्या दुर्घटनेचे कारण ठरू शकतो. वास्तविक, राज्यातील ४२६ हिमनदी तलावांपैकी (ग्लेशियर लेक्स) १३ तलाव अतिसंवेदनशील आहेत. मात्र, त्यांच्यावर अर्ली वॉर्निंग सिस्टिम बसवण्याची योजना वीज आणि दळणवळणाच्या अडचणींमुळे रेंगाळली आहे. या अतिसंवेदनशील तलावांमध्ये वसुधारा, माबोंग, स्यूनतियांकती आणि प्युंगरौ हे प्रमुख आहेत. या तलावांचे काठ फुटल्यास सखल भागात वसलेल्या प्रदेशात अचानक पूर येऊन मोठी जीवित व वित्तहानी होऊ शकते.
हा धोका लक्षात घेऊन केंद्र सरकारने इशारा यंत्रणेसाठी ३० कोटी रु. मंजूर केले. त्यापैकी ८.१० कोटी रुपये वितरीतही करण्यात आले आहेत, तरीही एकाही तलावावर ही यंत्रणा कार्यान्वित होऊ शकलेली नाही.
या दिरंगाईच्या कारणावर वाडिया हिमालयन जिओलॉजीचे संचालक डॉ. विनीत गहलोत म्हणाले की, प्रचंड उंचीवर या यंत्रणेला २४ तास वीज पुरवणे व माहिती पाठवणे हे सर्वात मोठे आव्हान आहे.
वसुधारा तलाव फुटल्यास १८.६ किमीवरील नीती गावावर संकट
धौलीगंगा खोऱ्याच्या उंचावरील भागात वसुधारा तलाव आहे. राष्ट्रीय रिमोट सेन्सिंग सेंटरनुसार, तलावापासून १८.६ किलोमीटर अंतरावरील नीती हे जवळचे गाव आहे. वसुधारापासून नीती गावापर्यंत नदीचा मार्ग तीव्र उताराचा व अरुंद आहे. त्यामुळे पुराचे पाणी व राडारोडा वेगाने खाली पोहोचू शकतो. यानंतर गमसाली, कैलाशपूर, मलारी व गोटिंग यांसारखी गावे येतात. पुढे हा प्रवाह जोशीमठच्या खालपर्यंत पोहोचतो. दरम्यान, या खोऱ्यात जलविद्युत प्रकल्पांचे कामही सुरू आहे.
सौर किंवा पवनऊर्जेद्वारे वीज पुरवण्याची तयारी
या यंत्रणेला सौर किंवा पवनऊर्जेद्वारे सतत वीज उपलब्ध करून देण्याचा वैज्ञानिकांचा प्रयत्न आहे. यासाठी तेथील भौगोलिक आणि हवामानविषयक परिस्थिती लक्षात घेऊन तांत्रिक व्यवस्था विकसित केली जात आहे.
यासाठी तलावाजवळ पाणी पातळी मोजणारे सेन्सर, वेदर स्टेशन, कॅमेरे व इतर उपकरणे बसवली जातात. ही उपकरणे पाण्याच्या पातळीतील बदल, मुसळधार पाऊस, भूस्खलन आणि इतर हालचालींवर बारीक लक्ष ठेवतात.
- यातून मिळणारा डेटा बिनतार संदेश वा उपग्रहाद्वारे नियंत्रण कक्षापर्यंत पोहोचतो. धोक्याचे संकेत मिळताच यंत्रणा संबंधित यंत्रणांना सतर्कतेचा संदेश पाठवते.
- यानंतर सायरन, एसएमएस संदेश, बिनतार संदेश आणि प्रशासनाच्या माध्यमातून लोकांपर्यंत धोक्याचा इशारा पोहोचवला जातो. याने नागरिक सुरक्षित स्थळी पोहोचतील.
