सरसंघचालक भागवत यांची इस्कॉन मंदिराला भेट
► वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी न्यूयॉर्क येथील इस्कॉन संस्थेच्या मंदिराला भेट दिली आहे. अमेरिकेच्या दौऱ्यातील त्यांचा हा प्रथम सर्वात महत्वाचा कार्यकम आहे. या प्रसंगी केलेल्या भाषणात त्यांनी भगवद्गीतेच्या संदेशाचे महत्व, सध्याच्या जागतिक परिस्थितीत किती आहे, हे दर्शवून दिले आहे.
हे संपूर्ण जग भगवान श्रीकृष्णाच्या तत्वांपासून प्रेरणा घेऊन चालत आहे. आजच्या जागतिक परिस्थितीत प्रत्येकाने भगवद्गीतेतील संदेशाचे आचरण करण्याची आवश्यकता असून सर्व संकटातून मानवाला बाहेर काढण्याचे सामर्थ्य या ग्रंथात आहे. सध्या जगात सर्वत्र अनिश्चिततेचा अनुभव येत आहे. अशा स्थितीत प्रत्येकाच्या अंत:करणातील चेनतेचे समान धागा आपल्या साऱ्यांना एकत्र ठेवू शकतो. तसेच अस्थिरतेवर मात करु शकतो. ही चेतना खरे तर कृष्ण चेतनाच आहे. जगात कितीही वैविध्य, वाद, संघर्ष आणि मतभेद असले, तरी वास्तविकता अशी आहे, की हे सर्व कृष्णस्वरुपच आहे. भगवद्गीता आपल्याला हाच संदेश देते, असे प्रतिपादन त्यांनी इस्कॉनच्या कार्यक्रमात उपस्थितांशी संवाद साधताना केले. त्यांच्या कार्यक्रमाला असंख्य संघप्रेमी आणि इस्कॉन सदस्यांनी उपस्थिती दर्शविली. त्यांच्या भाषणाआधी सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरणाही केले गेले.
निर्भयपणे कर्तव्य निभावणे आवश्यक
परिस्थिती कितीही कठीण असली, तरी तिच्यापासून पळ न काढता किंवा तिला पाठ न दाखवता निर्भयपणे आपले कर्तव्य निष्ठेने पार पाडणे कसे आवश्यक असते, याची शिकवण आपल्याला भगवद्गीतेतून मिळतो. भगवद्गीता हा व्यवहार ग्रंथ असून तो कधीच उत्तरदायित्व टाळण्याचा संदेश देत नाही. आपली सांसारिक कृत्ये प्रत्येकाने केली पाहिजेत. उत्तरदायित्व टाळणे म्हणजे परमेश्वर भक्ती नव्हे. अवघड परिस्थितीत आपण अधिक नेटाने उभे राहिले पाहिजे. कारण आपण आपले कर्तव्य टाळू शकत नाही. आपल्याला कर्मापासून सुटका करुन घेता येत नाही, हे भगवद्गीतच्या उपदेशाचे सार आहे, अशी मांडणी त्यांनी त्यांच्या भाषणात केली.
दोन संघटना, एक संकल्प
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि इस्कॉन या दोन महान संघटना आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपले शतक साजरे करीत आहे, तर इस्कॉन आपला हिरक महोत्सव साजरा करीत आहे. या दोन्ही संघटनांचे मार्ग भिन्न असले, तरी त्यांचे ध्येय एकच आहे. दोन्ही संघटनांची कार्यपद्धती भिन्न असली, तरी त्यांची उद्दिष्ट्यो समानच आहेत. संपूर्ण जगात कृष्णचेतना प्रसारित करणे, हे या दोन्ही संघटनांचे समान ध्येय आहे, असे प्रतिपादन सरसंघचालक मोहन भागवत यांनी यावेळी केले.
वाद निर्माण करण्याचा प्रयत्न
सरसंघचालक मोहन भागवत यांच्या या अमेरिका दौऱ्यासंबंधी वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. न्यूयॉर्कचे महापौर झोहरान ममदानी यांनी या दौऱ्याला प्रारंभापासूनच विरोध केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर त्यांनी अनेक आरोप केले. तथापि, या दौऱ्यात आतापर्यंत सरसंघचालक मोहन भागवत यांना येथील हिंदू समाजात प्रचंड प्रतिसाद दिल्याचे दिसून येत आहे. भागवत आपल्या दौऱ्यात अमेरिका, कॅनडा आणि ब्रिटन या देशांना भेट देणार आहेत. भारताबाहेरील हिंदू समाजाशी संपर्क साधण्यासाठी त्यांचा हा दौरा योजिला आहे.
