स्मार्टफोनमधील ‘ Wi-Fi ऑटो-कनेक्ट’ हे फीचर सोयीचे वाटत असले, तरी ते सायबर गुन्हेगारांसाठी सोन्याची अंडी देणारी कोंबडी ठरत आहे. रेल्वे स्टेशन, मॉल किंवा हॉटेलमधील मोफत Wi-Fi शी तुमचा फोन परस्पर कनेक्ट झाल्यास, हॅकर्स काही सेकंदांत तुमचे बँक डिटेल्स आणि खाजगी डेटा चोरू शकतात, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. चला तर मग याविषयीची माहिती पुढे जाणून घेऊया.

रेल्वे स्टेशन, विमानतळ, हॉटेल्स किंवा मोठ्या मॉल्समध्ये मिळणारे मोफत Wi-Fi वापरणे आपल्या सर्वांनाच आवडते. अनेकदा आपल्या स्मार्टफोनमधील Wi-Fi चालू असल्यावर ते परिसरातील अशा खुल्या किंवा आधी कधीतरी वापरलेल्या नेटवर्कशी आपोआप कनेक्ट होते. कंपनीने हे फीचर ‘ऑटो-कनेक्ट’ किंवा ‘ऑटो-जॉईन’ या नावाने युजर्सच्या सुविधेसाठी दिले आहे. मात्र, सायबर सुरक्षा तज्ज्ञांनी आणि आघाडीच्या टेक नियतकालिकांनी या फीचरला स्मार्टफोनमधील “सर्वात धोकादायक सेटिंग” म्हटले आहे.
तुम्ही ही सेटिंग चालू ठेवली असेल, तर नकळतपणे तुम्ही हॅकर्सना तुमच्या मोबाईलमध्ये घुसखोरी करण्याचे उघडे आमंत्रण देत आहात.
‘इव्हिल ट्विन’ आणि AI हॅकिंगचा मोठा धोका
2026 मधील ताज्या सायबर सुरक्षा अहवालानुसार, हॅकर्स आता सार्वजनिक ठिकाणी अगदी हुबेहूब दिसणारे बनावट Wi-Fi नेटवर्क तयार करतात. उदाहरणार्थ, जर तुम्ही एखाद्या प्रसिद्ध हॉटेलमध्ये गेलात, तर हॅकर्स त्याच हॉटेलच्या नावाने ‘Free_Hotel_WiFi’ असे ओपन नेटवर्क सुरू करतात. तुमच्या फोनची ऑटो-कनेक्ट सिस्टीम जुने नेटवर्क ओळखून किंवा ओपन नेटवर्क पाहून थेट त्याला जोडली जाते. एकदा का तुमचा फोन हॅकर्सच्या या ‘इव्हिल ट्विन’ नेटवर्कशी जोडला गेला, की त्यानंतर तुमच्या मोबाईल स्क्रीनवर होणारी प्रत्येक हलचाल हॅकर्सच्या कॉम्प्युटरवर लाईव्ह दिसू लागते.
बँक खाती आणि वैयक्तिक डेटा काही सेकंदांत गायब
अनेक युजर्स पब्लिक वाय-फायशी कनेक्ट असतानाच गुगल पे, फोनपे किंवा नेट बँकिंगद्वारे पैशांचे व्यवहार करतात. अशा वेळी ‘मॅन-इन-द-मिडल’ (MITM) सायबर हल्ल्यांच्या माध्यमातून हॅकर्स युजर्सचे युझरनेम, पासवर्ड, क्रेडिट कार्ड डिटेल्स आणि OTP देखील सहज चोरतात. याशिवाय मोबाईलमधील खाजगी फोटो, व्हिडिओ आणि महत्त्वाचे डॉक्युमेंट्स हॅकर्सच्या सर्व्हरवर ट्रान्सफर केले जातात.
काय आहे उपाय? ‘अशी’ बदला मोबाईलची सेटिंग
ऑटो-कनेक्ट बंद करा: फोनच्या Settings > Network & Internet > Wi-Fi मध्ये जा. तिथे तुमच्या सेव्ह केलेल्या नेटवर्कच्या यादीतील प्रत्येक पब्लिक नेटवर्कवर टॅप करून ‘Auto-Reconnect’ किंवा ‘Auto-Join’ चा टॉगल बटन त्वरित बंद करा. ‘फॉरगेट नेटवर्क’ करा: रेल्वे स्टेशन किंवा हॉटेल सोडून निघताना तिथल्या वाय-फायला ‘Forget Network’ करण्याची सवय लावा, जेणेकरून फोन पुन्हा तिथे गेल्यावर आपोआप कनेक्ट होणार नाही. व्हीपीएन (VPN) चा वापर: जर अत्यंत महत्त्वाच्या कामासाठी पब्लिक वाय-फाय वापरावेच लागले, तर डेटा एन्क्रिप्ट करण्यासाठी चांगल्या ‘व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क’ (VPN) चा वापर करा.
सणासुदीच्या काळात लोक प्रवासात असताना मोफत इंटरनेटचा वापर जास्त करतात, त्यामुळे आजच्या दिवशी ही माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे अत्यंत गरजेचे आहे.

