वृत्तसंस्था, बेंगळूर
यजमान भारत आणि पनामा यांच्यात मित्रत्वाचा आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामना येथील श्री कंठीरेवा स्टेडियममध्ये 26 सप्टेंबर रोजी खेळविला जाईल, अशी घोषणा अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनतर्फे करण्यात आली आहे.
बेंगळूरमध्ये 2023 साली सॅफ फुटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय फुटबॉल संघाने घरच्या मैदानावर कुवेतचा पराभव करुन विजेतेपद पटकाविले होते. या सामन्यानंतर बेंगळूरमध्ये आता भारताच्या वरिष्ठ पुरुष फुटबॉल संघाचा सप्टेंबरमधील पहिला फुटबॉल सामना असेल. सध्या फिफाच्या मानांकनात पनामा 44 व्या स्थानावर आहे. अमेरिकेत नुकत्याच झालेल्या 2026 च्या फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत पनामा या मध्य अमेरिकन देशाच्या संघाने आपला सहभाग दर्शविला होता. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय फुटबॉल संघाचा विश्वचषक स्पर्धेतील सहभागी झालेल्या संघाबरोबरचा हा पहिला मित्रत्वाचा सामना आहे. यानंतर भारतीय फुटबॉल संघाचा आणखी एक मित्रत्वाचा सामना बलाढ्या ब्राझीलबरोबर 3 ऑक्टोबर रोजी कोलकातामध्ये खेळविला जाणार आहे.
