अंतराळ विज्ञानाच्या इतिहासात 30 ऑगस्ट रोजी एक नवा अध्याय लिहिला जाणार आहे. अमेरिकेची अंतराळ संस्था नासा आपले सर्वात शक्तिशाली ‘रोमन स्पेस टेलिस्कोप’ अवकाशात प्रक्षेपित करणार आहे. हबल दुर्बिणीपेक्षा तब्बल 100 पट मोठे दृष्टीक्षेत्र असलेल्या या टेलिस्कोपमुळे विश्वातील सर्वात गूढ मानल्या जाणाऱ्या ‘डार्क मॅटर’ आणि ‘डार्क एनर्जी’चे रहस्य उलगडण्यास मोठी मदत होणार आहे.

खगोलशास्त्र आणि अंतराळ विज्ञानाच्या इतिहासात एक अत्यंत महत्त्वपूर्ण टप्पा गाठला जात आहे. अमेरिकेची अंतराळ संस्था नासा तिचे सर्वात अत्याधुनिक आणि शक्तिशाली ‘नॅन्सी ग्रेस रोमन स्पेस टेलिस्कोप’ येत्या 30 ऑगस्ट २०२६ रोजी स्पेसएक्सच्या ‘फाल्कन हेवी’ रॉकेटद्वारे फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस सेंटरमधून अवकाशात लॉन्च करणार आहे. नासाने या मोहिमेच्या अंतिम टप्प्यातील पूर्वतयारीला अधिकृत मंजुरी दिली असून संपूर्ण वैज्ञानिक जगताचे लक्षया प्रक्षेपणाकडे लागले आहे.
हबलपेक्षा 100 पट मोठा व्ह्यू; डार्क मॅटरचे रहस्य उलगडणार
नासाचे हे नवीन टेलिस्कोप अंतराळातील अनेक अनुत्तरीत रहस्ये शोधून काढणार आहे. याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, याचा व्ह्यूईंग एरिया प्रसिद्ध ‘हबल स्पेस टेलिस्कोप’च्या तुलनेत तब्बल 100 पट अधिक मोठा आहे. म्हणजेच, हबल ज्या अंतराळाचा फोटो घेण्यासाठी अनेक दिवस लावायचा, तेवढाच विस्तीर्ण आणि स्पष्ट फोटो ‘रोमन टेलिस्कोप’ अवघ्या काही तासांत टिपू शकेल. या मोहिमेचा मुख्य उद्देश विश्वातील सर्वात गूढ घटक मानल्या जाणाऱ्या ‘डार्क एनर्जी’ आणि ‘डार्क मॅटर’ चा सखोल अभ्यास करणे हा आहे.
शोधणार 1,00,000 नवीन परग्रह
विज्ञान विश्वातील संशोधकांच्या मते, रोमन स्पेस टेलिस्कोप आपल्या आकाशगंगेच्या अतिशय खोलवर जाऊन संशोधन करेल. आपल्या सूर्यमालेबाहेर असलेल्या आणि इतर ताऱ्यांभोवती फिरणाऱ्या सुमारे 1,00,000 नवीन परग्रहांचा शोध या एकाच दुर्बिणीमुळे लागण्याची शक्यता आहे. यामध्ये अनेक ग्रहांवर पृथ्वीसारखे वातावरण किंवा पाण्याचे अस्तित्व असण्याची शक्यता तपासली जाईल.
युरोपियन स्पेस एजन्सीचे मोठे सहकार्य
या महाकाय आंतरराष्ट्रीय सायन्स प्रोजेक्टमध्ये युरोपियन स्पेस एजन्सी (ESA) देखील नासाला महत्त्वाची मदत करत आहे. टेलिस्कोपमधील बॅटरीज, स्टार ट्रॅकर्स आणि अवकाशातून वेगाने डेटा पृथ्वीवर डाऊनलोड करण्यासाठी ऑस्ट्रेलियातील प्रगत अँटेना नेटवर्क या मोहिमेसाठी तैनात करण्यात आले आहे. 30 ऑगस्ट रोजी भारतीय वेळेनुसार दुपारी या ऐतिहासिक प्रक्षेपणाचे थेट प्रक्षेपण नासाच्या अधिकृत चॅनेलवर केले जाणार आहे.

