महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) अन्न व औषध प्रशासनातील औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणात दिवसेंदिवस धक्कादायक माहिती समोर येत आहे. या प्रकरणात आतापर्यंत पेपरफुटीसाठी 5 लाख रुपयांचा व्यवहार झाल्याची माहिती तपासातून पुढे आली होती. म
.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सरकारवर निशाणा साधत, पेपरफुटीच्या व्यवहारातील ‘बड्या किड्यां’पर्यंत तपास पोहोचला पाहिजे, अशी मागणी केली आहे. त्यामुळे या प्रकरणातील आर्थिक व्यवहार नेमके किती रुपयांचे होते आणि हा पैसा कुणाकुणापर्यंत पोहोचला, याचा तपास आता महत्त्वाचा ठरणार आहे.
5 लाख की 50 लाख? तपासासमोर मोठा प्रश्न
एमपीएससीच्या औषध निरीक्षक पदाची चाळणी परीक्षा 22 मार्च 2026 रोजी घेण्यात आली होती. परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न बाहेर आल्याचे तपासात निष्पन्न झाल्यानंतर मुंबई गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास सुरू केला. आतापर्यंतच्या तपासात प्रश्न मिळवण्यासाठी 12 लाख रुपयांचा व्यवहार झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, आता ऋतुजा पाटीलच्या कथित व्हॉट्सअॅप संभाषणातील माहितीमुळे पेपरफुटीच्या व्यवहाराची व्याप्ती अधिक मोठी असल्याचा संशय निर्माण झाला आहे. ऋतुजाने मैत्रिणीसोबत केलेल्या संभाषणात औषध निरीक्षक पदाचा पेपर मिळवण्यासाठी 50 लाख रुपये दिल्याचा दावा केल्याचे सांगितले जात आहे.
जर हा दावा तपासात खरा ठरला, तर आतापर्यंत समोर आलेल्या 5 लाख किंवा 12 लाख रुपयांच्या व्यवहारापेक्षा या प्रकरणातील आर्थिक व्यवहार कितीतरी मोठा असल्याचे स्पष्ट होऊ शकते. त्यामुळे ५० लाख रुपये नेमके कुणाला देण्यात आले, त्यातील किती रक्कम पुढे पोहोचली आणि या साखळीत आणखी कोणाचा सहभाग होता, याचा शोध पोलिसांना घ्यावा लागणार आहे.
12 लाख रुपयांत 77 प्रश्न मिळाल्याचा तपास
या प्रकरणात ऋतुजा पाटील हिला परीक्षेपूर्वी 77 प्रश्न मिळाल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. तिचे वडील अमृत पाटील यांनी या प्रश्नांसाठी १२ लाख रुपये दिल्याचा पोलिसांचा प्राथमिक निष्कर्ष असल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे, ऋतुजाच्या लग्नासाठी जमवलेली रक्कम तिच्या औषध निरीक्षक होण्यासाठी वापरण्यात आल्याचेही तपासात समोर आले आहे. ऋतुजाला मिळालेल्या प्रश्नांपैकी मोठ्या संख्येने प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेत आल्याचा दावा तपास यंत्रणेकडून करण्यात आला आहे. त्यामुळे प्रश्नपत्रिकेची गोपनीयता नेमकी कुठे भंग झाली आणि एमपीएससीच्या यंत्रणेतील कोणत्या स्तरावरून प्रश्न बाहेर गेले, हा तपासाचा मुख्य मुद्दा बनला आहे.
संशय येऊ नये म्हणून 10 प्रश्न चुकीचे सोडव
या प्रकरणातील कथित व्हॉट्सअप संभाषणातून आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे. ऋतुजाला प्रश्नांचा संच दिल्यानंतर त्यातील काही प्रश्न मुद्दाम चुकीचे सोडवण्याचा सल्ला देण्यात आला, जेणेकरून तिच्यावर संशय येणार नाही, अशी माहिती समोर आली आहे. ऋतुजाने संभाषणात तिला मिळालेल्या प्रश्नांपैकी अनेक प्रश्न परीक्षेत आल्याचे सांगितल्याचे नमूद करण्यात आले आहे. तिने मिळालेल्या प्रश्नांपैकी 78 प्रश्नांची उत्तरे खात्रीने सोडवल्याचा उल्लेख संभाषणात असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे प्रश्नपत्रिका किंवा प्रश्नसंच केवळ एका उमेदवारापर्यंतच मर्यादित होता का, की तो अनेक उमेदवारांना पुरवण्यात आला होता, याचा तपास आता महत्त्वाचा ठरणार आहे.
12 लाखांच्या व्यवहारात मयूर ठाकरेचा दुवा?
या प्रकरणातील आर्थिक व्यवहाराचा तपास करताना मयूर ठाकरे हे नावही समोर आल्याचे सांगितले जात आहे. अमृत पाटील आणि प्रवीण पाटील यांच्यातील संपर्काचा दुवा म्हणून त्याच्याकडे पाहिले जात असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. तपासानुसार अमृत पाटील यांनी प्रवीण पाटीलकडे पैसे दिले आणि ते पुढे एमपीएससीशी संबंधित व्यक्तींपर्यंत पोहोचल्याचा संशय आहे. त्यामुळे पैशांचा संपूर्ण प्रवास शोधणे हे तपास यंत्रणेसमोर मोठे आव्हान आहे.
एमपीएससीचे तीन अधिकारी अटकेत
पेपरफुटी प्रकरणात आतापर्यंत एमपीएससीशी संबंधित तीन अधिकारी पोलिसांच्या ताब्यात आहेत. याशिवाय नंदुरबार येथील कौटिल्य अकादमीचे संचालक प्रवीण पाटील, ऋतुजा पाटीलचे वडील अमृत पाटील आणि लोकेश ऊर्फ गौरव राजेंद्र पाटील यांनाही अटक करण्यात आली आहे. या आरोपींच्या चौकशीतून पेपरफुटीची पद्धत, आर्थिक व्यवहार आणि प्रश्न किती जणांना पुरवण्यात आले याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. या प्रकरणात आणखी काही संशयितांचा सहभाग असल्याचा पोलिसांना संशय असून त्यांचा शोध सुरू आहे.
आरोपींनी जुने मोबाइल खराब झाल्याचे सांगितले
तपासादरम्यान मोबाइलमधील पुरावेही महत्त्वाचे ठरत आहेत. काही आरोपींनी पोलिसांना जुने मोबाइल देण्याऐवजी नवीन मोबाइल दिल्याचे समोर आले आहे. परीक्षेच्या काळात वापरलेले मोबाइल खराब झाल्याचे कारण आरोपींकडून सांगण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे जुन्या मोबाइलमधील डेटा, संभाषण आणि आर्थिक व्यवहाराशी संबंधित डिजिटल पुरावे मिळवणे तपासासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.
50 लाखांचा दावा असेल तर पैसा कुठे गेला?
ऋतुजाच्या कथित चॅटमध्ये 50 लाख रुपयांचा उल्लेख असल्याने आता पोलिसांसमोर सर्वात मोठा प्रश्न आहे तो म्हणजे ही रक्कम प्रत्यक्षात कुठे गेली? आतापर्यंत तपासात 5 लाख रुपये आणि 12 लाख रुपयांच्या व्यवहाराचे धागेदोरे समोर आले आहेत. मात्र 50 लाख रुपयांचा दावा खरा असल्यास या रकमेची स्वतंत्र आर्थिक साखळी तपासावी लागणार आहे. या पैशांमध्ये एमपीएससीतील आणखी अधिकारी, मध्यस्थ किंवा इतर उमेदवारांचा सहभाग आहे का, याचा शोध घेणे आवश्यक ठरणार आहे.
रोहित पवारांचा सरकारला इशारा
या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी सोशल मीडियावरून सरकारला थेट इशारा दिला आहे. पेपरफुटीच्या तपासातून पुढे येणारे तपशील अत्यंत धक्कादायक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. “50 लाख घेऊन पेपर देणाऱ्या सिस्टिममधील या किड्यांपर्यंत तपास पोहोचला पाहिजे. अन्यथा एकही किडा लपून राहिला किंवा सरकारने त्याला वाचवला तर तो आणखी किड्यांची पैदास केल्याशिवाय राहणार नाही,” असा घणाघात रोहित पवार यांनी केला.
व्यवस्था पोखरणारी ही ‘कीड’ मुळापासून नष्ट झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. पोलिसांचा तपास योग्य दिशेने सुरू असला तरी तो मोठ्या आरोपींपर्यंत पोहोचतोय की नाही, यावर आपले बारकाईने लक्ष असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
एमपीएससीच्या इतर परीक्षांवरही प्रश्नचिन्ह
औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेतील पेपरफुटीच्या तपासात जर 50 लाख रुपयांचा व्यवहार खरा ठरला, तर त्याचे पडसाद एमपीएससीच्या इतर परीक्षांवरही उमटण्याची शक्यता आहे. राज्यातील हजारो विद्यार्थी एमपीएससीच्या परीक्षांची तयारी करतात. अशा प्रकारच्या घटनांमुळे परीक्षेच्या पारदर्शकतेबाबत विद्यार्थ्यांच्या मनात संशय निर्माण होऊ शकतो. त्यामुळे केवळ आरोपींना अटक करण्यापेक्षा प्रश्नपत्रिका तयार करण्यापासून ती परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचेपर्यंतच्या संपूर्ण प्रक्रियेतील सुरक्षा व्यवस्था तपासण्याची गरज निर्माण झाली आहे. आता ऋतुजा पाटीलच्या कथित चॅटमधील 50 लाख रुपयांचा दावा तपासात कितपत खरा ठरतो, 12 लाखांच्या व्यवहारामागील संपूर्ण साखळी कुठपर्यंत पोहोचते आणि या प्रकरणात एमपीएससीतील आणखी कोणाचा सहभाग आहे का, याकडे विद्यार्थ्यांसह संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा…
हे सरकार मराठ्यांच्या लेकरांचे वाटोळे करतंय:जरांगे पाटलांचा संताप, थेट मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर धडक देण्याचा इशारा

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेला अल्टिमेटम आज संपत असून, उद्यापासून अंतरवाली सराटी येथे निर्णायक आंदोलनाला सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेत सरकारच्या भूमिकेवर जोरदार टीका केली. कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज केलेले, मात्र अधिकाऱ्यांनी अर्ज स्वीकारले नाहीत किंवा नोंदी सापडूनही प्रमाणपत्र दिले नाही, अशा सर्व मराठा बांधवांनी अंतरवाली सराटीत दाखल व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. येथे वाचा संपूर्ण बातमी
