Headlines

Lok Sabha Election Survey: भाजप, काँग्रेसच्या जागा वाढणार; मग फटका कोणाला? आज लोकसभा निवडणूक झाली तर काय? सर्व्हे आला


देश पातळीवर सुरू असलेली आंदोलनं, बेरोजगारी, पेपरफुटीच्या घटना, इथेनॉल मिश्रित पेट्रोल, महागाई यांच्यासारखे प्रश्न पाहता आता निवडणूक झाल्यास कोणाची सत्ता येणार, याबद्दलचा एक सर्व्हे करण्यात आला आहे.

modi rahul survey
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
नवी दिल्ली: देशात आज लोकसभेची निवडणूक झाल्यास कोणत्या पक्षाला, कोणत्या आघाडीला किती जागा मिळणार, याबद्दलचा सर्व्हे करण्यात आला आहे. गेल्या काही महिन्यांत देशभरात सातत्यानं आंदोलनं सुरू आहेत. आम आदमी पक्ष, तृणमूल काँग्रेसचे खासदार फोडून ते सत्ताधारी बाकांवर गेले आहेत. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सर्वेक्षण करण्यात आलं आहे.

आज लोकसभेची निवडणूक झाल्यास केंद्रात पुन्हा एकदा भाजपप्रणित एनडीएची सत्ता येऊ शकते, असा इंडिया टुडे आणि सी व्होटरचा सर्व्हे सांगतो. या सर्व्हेनुसार, एनडीएला ३२६, इंडिया आघाडीला १८५, तर अन्य पक्षांना ३२ जागा मिळण्याचा अंदाज आहे. याचा अर्थ एनडीएला स्पष्ट बहुमत मिळेल. मागील लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत त्यांच्या जागा वाढतील. तर इंडिया आघाडीच्या जागा कमी होण्याचा अंदाज आहे.

व्होट शेअरचा विचार केल्यास एनडीएला ४५ टक्के, तर इंडिया आघाडीला ३९ टक्के जागा मिळण्याची शक्यता आहे. तर १६ टक्के मतं अन्य पक्षांच्या खात्यात जाऊ शकतात. एकट्या भाजप ला २६१ जागा, तर काँग्रेसला १०६ जागा मिळण्याचा अंदाज आहे. २०२४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत २४०, तर काँग्रेसला ९९ जागा मिळाल्या आहेत. त्या तुलनेत दोन्ही पक्षांच्या जागा वाढण्याचा अंदाज आहे. पण भाजप स्वबळावर सत्तेचा सोपान गाठताना दिसत नाही.

मागील लोकसभा निवडणुकीत एनडीएला २९३ जागा मिळाल्या. २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीच्या तुलनेत त्यांच्या जागा ६० नं कमी झाल्या. तर दुसरीकडे इंडिया आघाडीनं २३४ पर्यंत मजल मारली. एनडीएला ४२.५ टक्के मतदान झालं. तर इंडिया आघाडीला ४०.६ टक्के मतं मिळाली होती.

देशाच्या सगळ्या राज्यांमध्ये आणि लोकसभा मतदारसंघांमध्ये १ जुलै २०२६ ते २५ ऑगस्ट २०२६ या कालावधीत सर्व्हे करण्यात आला. विविध वयोगटातील, वेगवेगळ्या जाती-धर्मांच्या २५,१८४ जणांनी संवाद साधून सर्व्हे करण्यात आला. यासोबतच गेल्या २४ आठवड्यांमध्ये ९१,७९५ जणांची मतं घेऊन त्यांचं विश्लेषण करण्यात आलं. म्हणजे एकूण १,१६,६४४ जणांची मतं नोंदवण्यात आली.